Rajya Natya Spardha 2023 : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी जगत असलेला माणूस आणि प्रत्यक्ष जीवनात इच्छा पूर्ण न झाल्यामुळे भूत बनून राहिलेला माणूस या मधील संबंध दाखवताना नाटकात, आपण असेल त्यात समाधानी जगलं पाहिजे, जीवनात लालसेपायी आपण सुखाऐवजी दुःख पदरी पाडून घेतो आणि मेल्यानंतरही आपल्यास सुख प्राप्त होत नाही, असा संदेश ‘विठ्ठला' नाटकातून देण्यात आला. (Theater surrendered Vithala drama rajya natya spardha 2023 jalgaon news)
विजय तेंडूलकर लिखित, रमेश भोळे दिग्दर्शित नाट्य जळगावच्या इंदाई फाउंडेशनने राज्य नाट्य स्पर्धेत सादर केले. विठ्ठलाच्या भजनात दंग झालेला नामा शिंपी आपल्या कामात सावळा गोंधळ घालत असताना विठ्ठल हे भूत त्याला सहानुभूतीपूर्वक मदत करते.
नामा या मदतीतून आत्मकेंद्रित होताना दिसतो. तो भोंदू कीर्तनकार तुंबाजी आणि त्याचा साथीदार जटायूच्या मदतीने विठ्ठलाने केलेल्या चमत्कारांचा दुरुपयोग करून द्रव्य कमावतो. पण अंती त्याला पश्चात्ताप होतो. खऱ्या जीवनाचा अर्थ समजताच, तो आपल्या पूर्वीच्या शिंपी कामास जुंपून घेतो.
चमत्कृतीपूर्ण घटना, स्वभावातील विसंगतीचे व्यंगचित्रात्मक दर्शन, गोंधळ, संभ्रम, गैरसमज या घटकांचा विशेष वापर करून अभिनय व कोटीप्रचूर संवादांद्वारे विनोद निर्मिती करणारे हे नाट्य सिद्धहस्त नाटककार विजय तेंडूलकर यांच्या लेखणीतून साकारले आहे.
मात्र सशक्त संहिता हाती असताना, दिग्दर्शकीय कौशल्याचा अभाव, कलावंतांमध्ये तालमींअभावी उडालेला गोंधळ यात हे प्रेक्षकसुलभ नाट्य हरवत गेले. २०१४ मध्ये रमेश भोळे यांनीच दिग्दर्शित केलेल्या विठ्ठला या नाटकाने त्यावर्षी अभिनय रौप्यपदकासह अनेक पारितोषिके पटकावली होती. यावेळेस मात्र पात्रांच्या देहरुपाचा तपशील, स्वभावजन्य लकबींनुसार पात्र निवड करण्याचे त्यांचे कसब दिसले नाही. केवळ सादरीकरण करणे हाच उद्देश पदोपदी नाट्यात जाणवत होता.
विठ्ठला नाटकातील कलावंतांच्या अंगी शरीराचा लवचीक वापर, अभिनय छटांचे प्रदर्शन अपेक्षित असताना कलावंतांनी केलेल्या संथ आणि विस्कळीत अभिनयामुळे नाट्यातील सहजता हरवत गेली. प्रत्यक्ष नाट्यात असलेला गोंधळ, संभ्रम आणि गैरसमजाची अभिव्यक्ती नाट्यात नव्हे, तर कलावंतांतच दिसून आल्याने नाट्य हरवत या प्रयोगावर पडदा पडला.
यात भूषण खैरनार (नामा), प्रेम बडगुजर (भूत), नेहा महाजन (बायको), योगेश शिंदे (तुंबाजी), स्वप्निल गडे (जटायू), श्वेता रील (जानकी) यांच्यासह सुभाष मराठे, प्रशांत बोरसे, मनोज चंद्रात्रे, राजेश पाटील, जगदीश गंगावणे, गुरुप्रसाद पाटील, आनंद ढिवरे, हेमंत सोनवणे यांनी अभिनय केला.
नाट्याचा आत्मा आहे तो म्हणजे, संगीत तसेच वातावरण निर्मिती करणारी प्रकाशयोजना. संगीताने काही क्षण संतकालीन नाटकाचा प्रत्यय आणून दिला असला, तरी आवश्यक वातावरणनिर्मिती होऊ शकली नाही. प्रकाशयोजनेच्या माध्यमातून दृश्यबंध सलगपणे प्रेक्षकांपर्यंत पोचू शकला नाही.
तांत्रिक बाजूत सचिन कापडे (नेपथ्य), राहुल पवार, संहिता जोशी, कैलास परदेशी, सागर चौधरी (पार्श्वसंगीत), महेंद्र खेडकर (प्रकाशयोजना), तर उज्ज्वला पाटील (रंग व वेशभूषा) यांचा समावेश होता. नितीन देशमुख व सचिन महाजन यांची रंगमंच व्यवस्था होती. चिकाटीने प्रयत्न करून आलेल्या अडचणींवर मात करत प्रयोगाचे सादरीकरण केल्याबद्दल इंदाई फाउंडेशनच्या कलावंत व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.