जळगाव : चार दिवसांपासून शेतकऱ्यांना अवकाळीने त्रस्त केले होते. मात्र, आता अवकाळीने माघार घेतल्याने शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळणार आहे. मार्चमध्ये ५ ते ७ व १५ ते १८ मार्च, असे सात दिवस अवकाळीने शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान केले. एकूण ११ हजार १९२ हेक्टरवरील रब्बीचे पावसामुळे नुकसान झाले आहे.
जून ते सप्टेंबर असा पावसाचा कालावधी असला, तरी दर वर्षी अवकाळी पाऊस होतोय. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस जूनऐवजी जुलैत सुरू होतो अन् ऑक्टोबरमध्ये परततो, असे असले तरी उत्तरेकडील वादळ, ‘पश्चिमी विक्षोभ’ आदी कारणांमुळे महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातही पावसाचा मुक्काम वाढतो. उत्तरेकडील प्रदेशांत होणारी हिमवृष्टी, पश्चिमी विक्षोभामुळे अवकाळी पाउऊस केव्हाही पडत असल्याचे हवामान अभ्यासक सांगतात.
यंदा अवघ्या सहा दिवस अवकाळीने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला गहू, हरभरा, मका, ज्वारीचे मोठे नुकसान केले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे.
हवामानाच्या अंदाजानुसारही शेती केली, तरी अवकाळीचे संकट कायम असते. जिल्ह्यात यंदा ११० टक्के पाऊस झाला. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टीने कापसाचे मोठे नुकसान झाले.
एकीकडे कापसाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी कापसाची साठवणूक करून चांगला दर मिळण्याची वाट पाहतात, तर दुसरीकडे हातात येणारे गहू, मका, ज्वारीला अवकाळीचा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांपुढे करावे तरी काय, असा प्रश्न आहे.
शासन पंचनामे करून मदत जाहीर करेल, ती शेतकऱ्याच्या हातात मिळेपर्यंत पुढील खरीप हंगाम येईल. ती मदतही वेळेवर मिळाली नाही, तर शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी होण्याची वेळ येईल, असे विदारक चित्र सध्या शेतकऱ्यांचे आहे.
हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
''निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस केव्हाही पडतो. यामुळे हंगामानुसार शेती करणे जिकिरीचे झाले आहे. मात्र परंपरेनुसार हंगामनिहाय पिकेही घेणे आता बदलविता येणार नाही. शासनाने सर्व पिकांसाठी बारामाही ‘पीक योजना’ सुरू करावी. शेतकऱ्यांचे जेवढ्या पिकांचे नुकसान होईल, तेवढा पीकविमा त्याला द्यावा. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळेल.'' -एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी कृती समिती
आकडे बोलतात...
-मार्चमध्ये अवकाळीने झालेले नुकसान- ११ हजार १९२ हेक्टर
-एकूण बाधित गावे- ३४१
-एकूण बाधित शेतकरी- १४ हजार ३८१
-गव्हाचे नुकसान- दोन हजार ५५५ हेक्टर
-मका नुकसान- सहा हजार ६१५
-ज्वारीचे नुकसान- एक हजार ६६०
-बाजरीचे नुकसान- १५६
-हरभऱ्याचे नुकसान- ४५३
-केळीचे नुकसान- ८९.८३
-इतर- ६०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.