यावल : ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यास हिंदू जनजागृती समितीने विरोध केला असून, या दिवसाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदू जनजागृती समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की पाश्चात्त्यांची कुप्रथा आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. मात्र ‘प्रेम दिवस’ म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करू नका आणि लैंगिक अत्याचारांपासून स्वतःच्या पाल्यांना वाचवा. हिंदू जनजागृती समितीने येथील निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार तसेच पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना निवेदन दिले. या मागणीचे निवेदन प्रशासनसोबतच यावल कला व वाणिज्य महाविद्यालयात तसेच तालुक्यातील काही शाळांतही देण्यात आले.
‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याच्या नादात एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी अपराध घडतात, तसेच मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदीही वाईट कृत्ये केली जातात. हे अत्यंत गंभीर आहे.
‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने ७ ते १४ फेब्रुवारीच्या कालावधीत गर्भनिरोधाच्या (कंडोमच्या) विक्रीमध्ये २० ते २५ टक्के वाढ होते, तसेच गर्भनिरोधक औषधे आणि गर्भधारणा तपासणी संच (प्रेंग्नन्सी टेस्ट कीट) यांच्या विक्रीतही वाढ होते. या व्यतिरिक्त लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे, अल्पवयीन मुलींवर अत्याचार होणे, कुमारीमाता बनणे आदी गंभीर समस्याही निर्माण होत आहेत.
हिंदू संस्कृती ही सर्व प्राणीमात्रांवर सदासर्वकाळ प्रेम करण्यास शिकवते, तर ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘फ्रेंडशिप डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ हे एका दिवसापुरते प्रेम करायला शिकवतात. यातून युवापिढी व्यापक न होता संकुचितच होत आहे.
‘व्हॅलेंटाइन डे’चे स्तोम वाढण्यामागे विदेशी आस्थापने आहेत. युवापिढीला आकर्षित करण्यासाठी गुलाबाची फुले, हृदयाच्या आकाराचे लाल फुगे, चॉकलेट, भेटवस्तू आदींद्वारे मार्केटिंग करून गल्ला भरला जातो, हे समजून घ्यायला हवे, असे निवेदनात नमूद आहे. या वेळी समितीचे चेतन भोईटे, पियूष भोईटे, मयूर महाजन, नीलिमा नेवे, छाया भोळे, चैताली गाजरे, पायल नेवे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.