Jalgaon News : चौपदरी महामार्ग आता वाहनधारकांच्या सोईचे राहिले नसून ते महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक विभागाच्या लुटीचे साधन झाले आहेत. (Vehicle owners have to bear huge financial burden due to innumerable looting by government agencies jalgaon news)
तरसोद- चिखली या नव्याने तयार झालेल्या महामार्गासाठी दीड वर्षात महामार्ग प्राधिकरणाने चारवेळा टोलचे दर वाढवत वाहनधारकांचे कंबरडे मोडलेय, तर दुसरीकडे वेग मर्यादेच्या नावाखाली रस्ते वाहतूक विभागही आर्थिक दंड करत लूट करीत आहे.
दिवसाढवळ्या शासकीय यंत्रणांकडून होणाऱ्या या बेसुमार लुटीमुळे वाहनधारकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने त्यांचा संताप अनावर होतोय. याबाबत काही वाहनधारक सामूहिकपणे जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
चौपदरी रस्त्यांचे ‘नेटवर्क’
भारतभर चौपदरी रस्त्यांचे नेटवर्क तयार होतेय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरी महामार्ग, ‘एक्स्प्रेस वे’च्या माध्यमातून देशाचे चित्रच बदलण्याचा संकल्प केला असून, तो बऱ्याच अंशी यशस्वीही ठरतोय. महाराष्ट्रत नव्यानेच कार्यान्वित झालेला (स्व.) बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे त्याचेच मोठे उदाहरण.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
टोल, दंडाद्वारे बेसुमार लूट
या चौपदरी महामार्गांवरून वाहने सुसाट धावत आहेत. चांगल्या रस्त्यांसाठी दोन पैसे खर्च करण्याची वाहनधारकांची मानसिकता आहे. असे असताना, महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक विभागाने मात्र या चौपदरी मार्गांवर टोल वसुलीच्या दरवाढीतून आणि वेगमर्यादा ओलांडली, तर दंड करत प्रामाणिक वाहनधारकांची अक्षरश: लूट चालवली आहे.
तरसोद-चिखलीवर मनमानी टोल वसुली
जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर ‘फागणे- तरसोद’ व ‘तरसोद- चिखली’, असे दोन चौपदरी टप्पे आहेत. पैकी तरसोद- चिखली टप्पा पूर्ण होऊन १५ ऑगस्ट २०२१ ला तो कार्यान्वितही करण्यात आला.
मात्र, महामार्ग वाहतुकीस खुला झाल्यापासून गेल्या दीड वर्षात यासाठी चार वेळा टोलची दरवाढ करण्यात आली. नशिराबाद नाक्यावर कारचे उदाहरण घेतल्यास जेव्हा महामार्ग सुरू झाला, तेव्हा एकीकडून ७५ रुपये टोल लागायचा तो आता तब्बल १०५ रुपये द्यावा लागतोय. अशीच वसुली अन्य वाहनांनाही आहे.
नेमका नियम काय?
साधारणपणे ७० किलोमीटरच्या अंतरात किमान एकदा टोल भरावा लागतो. तो टोल किती असावा, याबाबत काही नियमावली नाही. महामार्ग प्राधिकरण व टोल वसूल करणाऱ्या एजन्सीला तो अधिकार आहे, असे सांगितले जाते. एजन्सी टोल ठरवते, त्यास महामार्ग विभागाकडून मंजुरी घेऊन तो लागू करते.
वेग वाढला, तर दंड
एकीकडे चौपदरी, गुळगुळीत रस्ते तयार करायचे. वेळ व त्रास वाचतो, म्हणून वाहनधारक प्रामाणिकपणे टोल भरायलाही तयार असतात. मात्र, त्या टोलचा दर असा टप्प्याटप्प्याने वाढवत लूट केली जाते. तरसोद- चिखली टप्प्यातील महामार्गावर वेगमर्यादा ८० निश्चित करण्यात आली आहे. हा वेग ओलांडला, की थेट दोन हजारांच्या दंडाचा मेसेज येतो, अशी बेसुमार लूट महामार्गावर सुरू आहे.
असे आहेत नवे दर
वाहनाचा प्रकार---------एकीकडून--- दुहेरी
कार, जीप (एलएमव्ही)--१०५-----१५५
व्यावसायिक लहान वाहन--१६५----२५०
बस/ट्रक (दोन धुरीवाले)---३५०---५२५
तीन धुरी व्यावायिक वाहन--- ३८०---५७०
मोठे अवजड वाहन------६६५-----१०००
"तरसोद- चिखली महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर त्यांची लांबी वाढविल्यावर टोल वाढविण्यात आला. शिवाय, प्रत्येक नव्या आर्थिक वर्षात काहीतरी प्रमाणात टोल दरवाढ केली जाते. त्यानुसार एप्रिल महिन्यात दरवाढ झाली." -सी. एम. सिन्हा, प्रकल्प अधिकारी, महामार्ग प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.