मुक्ताईनगर : अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सरहद्दीवरील महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटचे गाव. येथून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशची हद्द सुरू होते. या सीमावर्ती भागातून प्रामुख्याने दोन्ही हद्दींमधील उपलब्ध सुविधांच्या दृष्टीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. दोन्ही हद्दीतील नागरिक मात्र गुण्यागोविंदाने राहतात.
औरंगाबाद-अंकलेश्वर राज्य मार्गावर हे गाव तापी नदीच्या काठावर वसले आहे. कृषिप्रधान क्षेत्र असल्याने विकसित शेतकऱ्यांचे गाव आहे. प्राथमिक सुविधांच्या बाबतीत या गावात फारशा अडीअडचणी नसल्या तरीही मध्य प्रदेश शासनाच्या शेतीसाठी वीज, रस्ते आणि बाजारपेठ यांच्या सुविधा महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक चांगल्या आहेत. असे असले तरी महाराष्ट्रीयन चालीरीती, रूढी-परंपरा यामुळे महाराष्ट्रातच सुखीसमाधानी असल्याची सीमावर्ती भागातील लोकांची भावना आहे.
हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
पंधरा किलोमीटर सीमा जोडून
मुक्ताईनगर तालुक्याची किमान १५ किलोमीटरची सीमा मध्य प्रदेशाला जोडलेली आहे. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाण्यासाठी रावेर तालुक्यातून दोन मार्ग आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव कर्की, लोहरखेडा मध्य प्रदेशातील गाव-वायली, इच्छापूर, बऱ्हाणपूर, तसेच औरंगाबाद-अंकलेश्वर महामार्गाने मुक्ताईनगर-अंतुर्ली फाटा- इच्छापूर- शहापूर- बऱ्हाणपूर असे दोन मार्ग आहेत.
सुविधांबाबत समाधानी
मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रस्त्यावर २० किलोमीटर अंतरावर अंतुर्ली फाटा हे गाव आहे. हे गाव तेथील आरटीओ बॅरियरसाठी जास्त प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्यांना येथे थांबवून त्यांची तपासणी केली जाते आणि त्यांच्याकडून आवश्यक तो कर घेतला जातो. येथील रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी रांग लागलेली असते. राज्याच्या आणि जळगाव जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर हे गाव असले तरीही दळणवळणाच्या सुविधेमुळे येथे मूलभूत सुविधांची फारशी अडचण नाही. अंतुर्लीसह मुक्ताईनगर तालुक्यातील गावरस्ते, गटारी, पथदीप आदी सुविधांबद्दल ग्रामस्थांची फारशी तक्रार नाही.
बऱ्हाणपूरची बाजारपेठ चांगली
या सीमावर्ती भागातील लोक बाजारपेठेत मुक्ताईनगर येण्याऐवजी बऱ्हाणपूर येथे जाणे पसंत करतात. रावेरच्या तुलनेने बऱ्हाणपूर जवळ आहे आणि तेथील बाजारपेठ ही मोठी असल्याने वस्तूंच्या किमती कमी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र सगळ्या प्रकारच्या शासकीय कामांसाठी, दाखले, उतारे यासाठी ग्रामस्थांना मुक्ताईनगर यावे लागते.
विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी येणे-जाणे
शिक्षणासाठी मध्य प्रदेशात बऱ्हाणपूर येथील केंद्रीय इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्थांत तालुक्याच्या विविध सीमावर्ती भागातून विद्यार्थी जातात. त्यांना ने-आण करण्यासाठी तेथील शिक्षण संस्था त्यांच्या बसगाड्या पाठवितात. तर महाराष्ट्राच्या शिक्षण धोरणातील काही सवलतींमुळे मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागातील बरेच विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी येत असतात.
गुटखा, गिरची तस्करी मोठ्या प्रमाणावर
महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी आहे. तर मध्य प्रदेशात व्यापाराला परवानगी असल्याने मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अंतुर्लीमार्गे मोठ्या प्रमाणावर विमलची व कत्तलखान्यात जाणाऱ्या गुरांची तस्करी होत असते. तालुक्यात येण्यासाठी बऱ्हाणपूर- मुक्ताईनगर या मुख्य मार्गासह ग्रामीण भागातूनही अनेक मार्ग आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर जीएसटी चुकवून त्यांचा माल विक्रीसाठी तालुक्यात आणतात. टॅक्स चुकविल्याने ते कमी दरात मालाची विक्री करतात. यामुळे स्थानिक विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो.
''महाराष्ट्रातील चाली, रूढी-परंपरा यामुळे महाराष्ट्राशी नाळ जुळली आहे. मध्य प्रदेशात शेतीविषयक योजना फायदेशीर आहेत; तरीही आवश्यक गरजा महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात असल्याचा आनंद आणि अभिमान आहे.'' -एस. ए. भोई (सर), शेतकरी, अंतुर्ली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.