Jalgaon News : जळगाव जिल्ह्याती राजकारणात महिलांनी आपले वर्चस्व वेळोवेळी सिध्द केले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी जिल्ह्यात आमदारकीपासून राजकारणास सुरवात करून थेट देशातील सर्वोच्चपद भूषविले.. शरच्चंद्रिका पाटील यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात तर माजी आमदार पारूताई वाघ, मीराबाई तडवी यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्व करून ठसा उमटविला.
खासदार रक्षा खडसे गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत रावेरचे प्रतिनिधीत्व करून कार्याची चुणूक दाखवित आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची लढाई लढण्यासाठी जिल्ह्यात महिला सज्ज होत आहेत.- कैलास शिंदे (Women warriors ready for election of jalgaon news)
जळगाव जिल्ह्यात रावेर व जळगाव हे दोन लोकसभेचे मतदारसंघ आहे, तर अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांच्याच भाषेत सांगावयाचे झाल्यास निवडणूक आता राजकीय लोकांच्या अंगावर जाणवायला लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे जागा वाटप सुरू झाले आहे. जळगाव व रावेर लोकसभेसाठीही उमेदवारीची तयारी सुरू झाली आहे. पुरूष उमेदवाराप्रमाणे महिला उमेदवारही तयारी करीत आहेत.
खासदार रक्षा खडसे
जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या खासदार रक्षा खडसे या आता खासदारकीची हॅटट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. रक्षा खडसे यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळण्याची खात्री असली तरी पक्षाने अद्याप त्यांची उमेदवारी निश्चित केलेली नाही. त्यांचा जनसंपर्क आणि मतदारसंघात केलेले कार्य पाहता त्या उमेदवारीबाबत मागे हटतील असे वाटत नाही, त्यामुळे पक्षाचे गणित त्यांचे कसे जुळणार हे फिरणाऱ्या वेळेच्या घड्याळाच्या काट्यावर अवलंबून असणार आहे.
डॉ.केतकी पाटील
कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी यांचीही राजकारणात प्रवेशाची आणि लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. डॉ.उल्हास पाटील यांचे रावेर मतदारसंघात सामाजिक कार्य आहे, तसेच त्याचा जनसंपर्कही चांगला आहे. ते कॉंग्रेस पक्षाचे असले तरी डॉ. केतकी या अद्याप कॉंग्रेसच्या व्यासपीठावर आलेल्या नाहीत. परंतु त्यांचाही सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू आहे. त्या कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी करणार, हे मात्र आगामी काळातील राजकीय स्थितीवरच अवलंबून असणार आहे.
प्रतिभा शिंदे
सामाजिक कार्यातून प्रथम राजकीय क्षेत्रात उडी घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनीही आता लोकसभेच्या आखाड्यात उडी घेण्याची तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. नवी दिल्ली येथे कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
नर्मदा बचाओ आंदोलनापासून तर आदिवासींसाठी ‘जंगल बचाव’साठी त्यांचे कार्य आहे. त्यांनी अद्याप निवडणूक लढण्याबाबत घोषणा केली नसली तरी त्यांची त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. जळगाव किवा रावेर या लोकसभा मतदारसंघातून किंवा पुढे विधानसभाही त्या लढू शकतात.
वैशाली सूर्यवंशी
शिवसेनेत फूट पडली आणि राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय स्थित्यंतर घडले. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी शिंदे गटाची वाट धरली. परंतु याठिकाणी ठाकरे गटात निर्माण झालेली पोकळी त्यांच्या भगिनी व माजी आमदार (कै.)आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी भरून काढली.
त्यांनी आपल्या बंधूशी थेट विरोध पत्करून ठाकरे गटासाठी लढा सुरू केला. आगामी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची त्यांचीही तयारी आहे. पक्षाने जळगाव लोकसभा लढविण्याचे ठरविल्यास त्यांचेही नाव उमेदवारीच्या चर्चेत राहील, किंवा विधानसभेसाठीही त्या सज्ज असतील.
ॲड.रोहिणी खडसे
राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भाजपांतर्गत कोंडी करण्यात आल्याने त्यांना पक्ष सोडावा लागल्याचा त्यांचा दावा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली त्यानंतर भाजपत अनेक वाद झाल्यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.
वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. त्यांना राष्ट्रवादी प्रदेश महिला आघाडीचे अध्यक्षपदही मिळाले आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात त्यांची उमेदवारी निश्चीत मानली जात आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून त्यांना कार्याचा ठसा उमटवावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.