कऱ्हाड (जि. सातारा) : शहरात कोरोनाचा कहर वाढत असताना त्यावर मात करण्यासाठी समाजातील विविध संस्था, व्यक्ती, संघटना या प्रशासनाच्या खांद्याला खांदा देवून काम करत आहेत. पालिकेला तब्बल दहा पोर्टेबल मशिन्स विविध नागरिक, संस्थांनी भेट दिल्या. विविध व्यक्तींसह संस्थाही 20 हून अधिक पोर्टेबल मशिन्स घेऊन लोकांचे जीव वाचविण्यासाठी धावत आहेत. तब्बल 200 नागरिकांच्या घरी जावून ऑक्सिजन लावून त्यांना जीवदान दिले आहे. जैन समाजाने तर कोविड सेंटरही उभे करून वेगळा आदर्श निर्माण केला.
प्रशासकीय पातळीवर कोरोनाला आवरण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. शहरात ऑक्सिजन बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, साधे बेडही शिल्लक नाहीत. अशा विदारक स्थितीशी सामना करावा लागतो आहे. आजअखेर तब्बल 12 नागरिकांना व्हेंटिलेटर नसल्याने किंवा उपचार न मिळाल्याने जीव गमावावा लागला. चार दिवसांतही दोघांचा अशाच कारणांनी मृत्यू झाला आहे. ती स्थिती लक्षात घेऊन सर्व भिंती विसरून समाज एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत आहे.
सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने समाजातील शेकडो हात आता पुढे सरसावले आहेत. पोर्टेबल मशिन्सव्दारे जीवदान दिले जात आहे. रुग्णवाहिका उपलब्ध करून देवून वेगळा पायंडा पाडला आहे. कऱ्हाड जिमखाना, समविचारी सामाजिक संस्था, गब्बर ओन्ली गब्बर, दक्ष कऱ्हाडकर, ऑक्सिजन ग्रुप, किराणा भुसार संघटना, जैन समाज अशा विविध संघटनांसह समाजातील अनेक नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवर अशा मशिन्स देवून कोरोनाग्रस्तांना जीवदान दिले आहे. अनेकांनी व्यक्तिगत पातळीवर कोरोना लढा देण्यासाठी समाजोपयोगी काम हाती घेतले आहे. अनेक युवक स्वतः पोर्टेबल ऑक्सिजन पुरवत आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व भिंती विसरून समाज मात्र एकवटला आहे.
ऑक्सिजन'द्वारे 200 जणांना जीवदान : पोर्टेबल ऑक्सिजन मशिन्सद्वारे शहरात 200 हून अधिक नागरिकांना जीवदान मिळाले आहे. ज्यांच्याकडे ऑक्सिजन किट आहे, त्या व्यक्ती, संस्थाही वेळ-काळाचा विचार न करता कॉल आला की, जिवाचाही पर्वा न करता थेट त्या गरजूंपर्यंत पोचत आहेत. त्यांना ऑक्सिजन देवून जीवदानही दिले जात आहे. ऑक्सिजन किट एका दिवसात तब्बल सहापेक्षाही जास्त जणांना उपयोगी पडत आहे. हॉस्पिटलमध्ये जागा रिकामी होईपर्यंत ते ऑक्सिजन किट त्या नागरिकांचा जीव वाचवत आहे.
साताऱ्यातील "वात्सल्य'ची सामाजिक जाणीव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून, अनेकांनी यात प्राण गमावला आहे. अनेकांना ऑक्सिजन मिळत नाही. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्यांना वाचविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची संख्या वाढत चाललेली आहे. सामाजिक भान जपत सातारच्या वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यांनी रुग्णांसाठी 15 पोर्टेबल ऑक्सिजन मशिन उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे कऱ्हाडपाठोपाठ आता सातारा शहरातही ज्या नागरिकांना आवश्यकता आहे, त्यांच्या घरी जाऊन पोर्टेबल ऑक्सिजनची सुविधा देण्यात येत असल्याने नागरिकांना जीवदान मिळणार आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.