काही सुखद

गावरान कोंबडीपालन शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत

गोपाल हागे

छोट्या शेतीपूरक व्यवसायामध्ये सातत्य असेल, तर तो कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचा चांगला मार्ग ठरतो, हे कारंजा लाड (जि. वाशीम) येथील दिलीप रामराव चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी गावरान कोंबडीपालनास सुरुवात केली. गेल्या चार वर्षांपासून त्यांना अंडी, पिले तसेच कोंबडा विक्रीतून आर्थिक स्रोत सापडला आहे. 

कारंजा लाड (जि. वाशीम) येथील दिलीप रामराव चव्हाण यांची खेर्डा शिवारात दोन एकर शेती आहे. परंतु पारंपरिक पिकातून त्यांना अपेक्षित आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे परिसरातील बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी पूरक व्यवसाय म्हणून घरगुती स्तरावर गावरान कोंबडीपालनास सुरुवात केली. गेल्या चार वर्षांत टप्प्याटप्प्याने यातून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळू लागले आहे.  

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोंबडीपालनाबाबत दिलीप चव्हाण म्हणाले, की लहानपणापासून मला कोंबडीपालनाची आवड होती. मध्यंतरी शेतीतील कामांमुळे याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन गेल्या चार वर्षांपासून मी गावरान कोंबडीपालनास सुरुवात केली. सुरुवातीला शेतामध्येच कोंबड्यांचे संगोपन केले. सध्या माझ्याकडे  ५०० गावरान कोंबड्या आहेत. या कोंबड्यापासून दिवसाला १०० ते १२५ अंडी मिळतात. गावामध्येच सरासरी एक अंडे ११ रुपये दराने विक्री होते. अंडी विक्रीतून महिन्याला खर्च वजा पंधरा हजार, पिले विक्रीतून पाच हजार आणि कोंबडा विक्रीतून चार हजार मिळतात. खर्च वजा जात दर महिन्याला अठरा हजारांची मिळकत होते. कुटुंबातील सदस्य कोंबड्यांचे व्यवस्थापन करतात, त्यामुळे मजुरांची गरज भासत नाही. गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याने बहुतांश अंड्यांची घरूनच विक्री होते. थेट ग्राहकांना अंडी विक्री केल्यानंतर जी शिल्लक राहतात, ती शहरातील काही दुकानदारांच्या माध्यमातून विक्रीसाठी दिली जातात. यासाठी करार केला आहे.

दिलीप चव्हाण यांच्या घराशेजारी साडेतीन गुंठे जागा आहे. ही जागा गावरान कोंबडीपालनासाठी त्यांनी निवडली. सुरुवातीला कोंबडीपालन हे शेतात सुरू केले होते. परंतु शेत दूर असल्याने मजूर समस्या, पशुपक्ष्यांपासून होणारा त्रास यामुळे ते बंद करून राहत्या घराजवळच कोंबड्यांचे संगोपन सुरू केले. कोंबड्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंजरे तयार केले. घराशेजारी झाडे वाढविल्याने चांगली सावली तयार झाली. तेथे कोंबड्यांना सोडले जाते. तेलाच्या मोकळ्या डब्यांचा वापर करून कोंबड्यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा तयार केली. त्या ठिकाणी कोंबड्या अंडी घालतात. काही ठिकाणी झुलत्या काठ्या बांधल्या असून, यावर कोंबड्या दिवसभर वावरतात.  

कमी खर्चामध्ये व्यवस्थापन 
कोंबडीपालन करताना कमीत कमी खर्च कसा होईल याकडे चव्हाण यांचा कटाक्ष आहे. प्रामुख्याने त्यांनी उपलब्ध साधनांचा अधिकाधिक वापर केला. छोटे शेड उभे केले. कोंबड्यांना ठेवण्यासाठी पत्र्याचे डबे वापरले. घराशेजारी असलेल्या झाडांच्या सावलीचा उपयोग करून घेतला. कोंबडी खाद्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी ते दिवसभरात एकदा भाजीपाल्याचा खाद्यामध्ये वापर करतात. बाजारपेठ किंवा शेतांमध्ये शिल्लक असलेल्या भाज्या आणून कोंबड्यांना खाऊ घालतात. भाजीपाल्यामुळे कोंबड्यांना पोषणमूल्ये मिळतात. यामुळे तयार खाद्यावर होणारा खर्च कमी होतो. दररोज ३० टक्क्यांपर्यंत खर्च वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चव्हाण यांनी कोंबड्यांचे लसीकरण, अंडी उबविणे, पिलांचे पोषण, कोंबड्यांना येणारे विविध आजार याबाबत तज्ज्ञांकडून संपूर्ण माहिती करून घेतली आहे. त्यामुळे कोंबड्यांचे व्यवस्थापन सोपे जाते. 

शेती झाली पूरक 
मागील चार वर्षांत चव्हाण यांना गावरान कोंबडीपालनातून दरमहा चांगली मिळकत होते. त्यामुळे शेती आता पूरक झाली आहे. चव्हाण यांची खेर्डा शिवारात दोन एकर शेती असून, त्यामध्ये दीड वर्षापूर्वी त्यांनी सीताफळ लागवड केली. त्यामुळे शेतीमधील व्यवस्थापन खर्चात बचत होत आहे. गावरान कोंबडीपालनातून दररोज मिळकत असल्याने फळबाग विकासाचे त्यांनी नियोजन केले आहे.

कुटुंबाची मिळाली साथ 
घरगुती स्तरावर कोंबडीपालनातून आर्थिक मिळकतीचे एक चांगले मॉडेल चव्हाण यांनी उभे केले. यामध्ये त्यांना पत्नी, मुलाचे चांगले सहकार्य मिळत आहे. दिलीप यांच्या पत्नी माला या कोंबड्यांची अंडी गोळा करण्यापासून ते विक्रीपर्यंतचे सर्व नियोजन सांभाळतात. दिलीप हे कोंबड्यांचे खाद्य तसेच दैनंदिन व्यवस्थापन सांभाळतात. त्यांचा मुलगा प्रतीक पुण्यामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये एमबीए शिकत आहे. मार्केटिंगचाही अभ्यास करत आहे. सध्या लॉकडाउनमुळे कॉलेज बंद असल्याने  तो घरूनच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेतो. मिळणाऱ्या वेळेत तो अंडी, कोंबडी विक्रीचे नियोजन पाहतो. 

कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन 
दिलीप चव्हाण यांनी चार वर्षांपूर्वी गावरान कोंबडीपालन व्यवसायाला छोटेखानी सुरुवात केली. त्यंाना करडा येथील कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. डी. एल. रामटेके यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार चव्हाण यांनी गावरान, कावेरी, डीपी क्रॉस जातीच्या कोंबड्यांची निवड केली. डॉ. रामटेके यांनी चव्हाण यांना कोंबड्यांचा औषधोपचार, पिलांचे ब्रूडिंग, खाद्यावरील खर्च कसा कमी करावा याबाबत माहिती दिली.अंडी उत्पादन जास्त होत असल्याने छोटे इनक्युबेटर घेऊन चव्हाण यांनी पिले निर्मितीला सुरुवात केली आहे. दरमहा २५० पिलांची ते विक्री करतात. 

  दिलीप  चव्हाण, ८४२१४००३८५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT