साडेचार मिनिटांत दाखविले नकाशातील २०८ देश; ‘गिनेस बुक’कडे विश्वविक्रमासाठी नोंद
पिंपरी - नकाशावर जागतिक भरारी घेणाऱ्या अडीच वर्षे वयाच्या अवीर जाधव याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. कौतुकामुळे प्रोत्साहित झालेल्या अवीरने अवघ्या साडेचार मिनिटांत जागतिक नकाशावरील २०८ देश दाखविण्याचा नवा विक्रम केला आहे. देश दाखवितानाच अंगुलिनिर्देश करताच नावे सांगण्याचा नवा विक्रमही त्याने प्रस्थापित केला आहे. हा विश्वविक्रम ठरावा या उद्देशाने त्याचे वडील प्रदीप जाधव यांनी गिनेस बुक ऑफ रेकार्डकडे नोंद केली आहे.
‘जगाच्या नकाशावर अवीरची भरारी’ या शीर्षकाखालील वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच अवीरवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. पिंपळे निलख येथील नगरसेवकांनी त्याचे निवासस्थानी जाऊन त्याचे कौतुक केले. तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनाही त्याला भेटण्याचा मोह आवरता आला नाही. प्रदीप जाधव यांच्याशी संपर्क साधून अवीरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
महापौर कक्षात त्याचा सन्मान केला. तसेच, येत्या १५ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या ध्वजारोहण कार्यक्रमात त्याचा जाहीर सत्कार करण्याचे नियोजन केले. त्या पाठोपाठ खासदार अमर साबळे यांनीदेखील अवीरला ‘पृथ्वी’ची प्रतिकृती भेट म्हणून दिली. पृथ्वी हातात मिळताच अवीरने त्यावरील देश सांगण्यास सुरवात केली. त्याची हुशारी पाहून साबळेदेखील थक्क झाले व पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून राष्ट्रीय स्तरावर त्याला गौरविण्यात येईल का, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आमदार लक्ष्मण जगताप यांनीदेखील अवीरची भेट घेऊन विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
न्यूयॉर्कमधील एका पावणेतीन वर्षांच्या मुलाच्या नावावर साडेचार मिनिटांत देश दाखविण्याचा विश्वविक्रम आहे. यापूर्वी अवीर या विश्वविक्रमाच्या केवळ एक पाऊल मागे होता. मात्र, मागील दोन दिवसांत साडेचार मिनिटांत नकाशावरील २०४ देश दाखवून त्याने हे उद्दिष्ट पूर्ण केले.
याबाबतचे सर्व व्हिडिओ तसेच पुरावे गिनेस बुककडे पाठविले आहेत. येत्या काही दिवसांत त्यांचे उत्तर येणे अपेक्षित आहे. मात्र, अवीरच्या नावावर या विश्वविक्रमाची निश्चितच नोंद होईल, असा विश्वासही जाधव यांना वाटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.