कोकण

ग्रँडफादर ट्री; वडाच्या झाडाचे आयुष्य शेकडो वर्ष असण्याचं कारण माहितीय का?

वडाचे वनस्पती शास्त्रीय नाव ''फायकस बेंगलेंसिस'' असे आहे. याला ''ग्रँडफादर ट्री'' म्हणून ओळखले जाते.

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : वटवृक्षाला हिंदू धर्मात पूजेचे स्थान मिळाले आहे. वटसावित्रीची कथा या वृक्षाबरोबर गुंफली गेली आणि हा वृक्ष पूजनीय ठरला. या कथेतील सावित्री जितकी मोठी आणि आदर्श मानली जाते तितकाच वडही निसर्गातील एक मोठा आणि आदर्श वृक्ष आहे. निसर्गातील वडाचे स्थान व उपयोग लक्षात घेतले तर तो निश्चितच पूजनीय असे म्हणता येईल.

वड हा मूळ अंजीर वर्गातील वृक्ष आहे. या वर्गात ६०० पेक्षा जास्त वृक्षप्रकार आहेत. पिंपळ, अष्टा, उंबर हे या वर्गातील इतर काही वृक्ष. वडाचे वनस्पती शास्त्रीय नाव ''फायकस बेंगलेंसिस'' असे आहे. अतिशय समर्पकपणे हा वृक्ष ''ग्रँडफादर ट्री'' म्हणून ओळखला जातो. इंग्रजीत या वृक्षाला बॅनयन ट्री असे म्हणतात. हे नाव युरोपियन लोकांनी पाडले आहे. इराणच्या आखाताच्या आसपासच्या प्रदेशात या प्रकारच्या वृक्षांच्या सावलीत बसून भारतातून आलेले व्यापारी वस्तूंची देवाण-घेवाण व इतर व्यवहार करीत असत. अशा बनिया म्हणजेच व्यापारी लोकांवरून बॅनयन ट्री हे नाव रूढ झाले.

भारतीय उपखंडात हा वृक्ष सर्वत्र आढळतो. हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जंगलात ही झाडे रानटी स्वरूपात आढळतात. भारतात इतरत्र सपाटीचा भाग, रस्त्यांच्या कडेला, माळराने व खेडोपाडी हा वृक्ष लावलेला आढळतो. या वृक्षाची उंची ७० ते १०० फुटापर्यंत असते. सदापर्णी या प्रकारात हा वृक्ष मोडतो. झाडाला नवी पालवी फेब्रुवारी व मार्चमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये येते. नोव्हेंबर ते जानेवारी हा फुले येण्याचा काळ आहे. आपण ज्याला फळे समजतो, ती प्रत्यक्षात फळे नसून लहान लहान फुले एकत्र असलेला फुलांचा एक बटवा असतो. यामध्ये काही मादी फुले व काही वंध्य फुले असतात. वडाच्या फुलातील परागीभवन अंजीरमाशी (फिगव्हास्प) या विशिष्ट माशीद्वारा होते. ही माशी आकाराने लहान असते. फळाला भोक पाडून ती आत जाते व त्यातील वंध्य फुलात आपली अंडी घालते आणि उबवते. याप्रमाणे फळातच माशीची नवनिर्मिती होते.

एकावेळी 30 ते 40 माशांचा जन्म होतो. या माशा पुंकेसर घेऊन फळाबाहेर पडतात व दुसऱ्या फळातील स्त्रीकेसराकडे नेतात. त्यानंतर फलधारणा होते. आपण ज्यांना फळे म्हणतो ते उन्हाळ्याच्या सुमारास पिकतात. तोपर्यंत त्यांच्यात फळधारणा झालेली असते व लहान आकाराच्या बिया तयार झालेल्या असतात. पिकलेली फळे लालसर व मऊ होतात व हळूहळू गळून पडतात. या फळातील बिया वाऱ्याने व इतर पक्षांमार्फत इतरत्र जातात आणि त्यांच्या विष्ठेमार्फत रुजून नवीन झाड तयार होते. वडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आडव्या वाढणाऱ्या फांद्यांना मुळे फुटून ती जमिनीत रुजतात व वृक्षाला आधार देतात. मुळे जमिनीत फार खोलवर जात नाहीत तर ती आडवी पसरतात. मुख्य खोड, उपखोडे व पारंब्या यांचे एक जाळे तयार होते. अशा वृक्षांचे आयुष्य शेकडो वर्षांचे असू शकते. विकासाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे या वृक्षांना स्वाभाविक मृत्यू नसतो.

निसर्गामध्ये या गुणधर्मामुळे त्यांचे एक खास असे स्थान आहे. त्यांचा प्रचंड विस्तार, दीर्घायुष्य यामुळे वडाची स्वतःची अशी एक स्वतंत्र प्रणाली तयार होते. परिस्थितीच्या दृष्टीने तुलनेने स्थिर स्वरूपाची ही प्रणाली पक्षी, कीटक व यासारख्या इतर जीवांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे. दीर्घायुषी वड विविध प्रकारच्या जीवांना आश्रय देतात. वडाची फळे अनेक पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे. वाघळांची आकाराने सर्वात मोठी अशी फलाहारी जात या वडाच्या आधाराने वस्ती करून राहते. यामुळे त्यांचे नावच वटवाघूळ असे पडले आहे. अशा विस्तीर्ण वृक्षाच्या खोडात धनेश (हॉर्नबिल) आपली लिंपून बंदिस्त केलेली घरटी बनवतात. पोपट, तांबट, सुतार, कावळे, साळुंक्या, घारी, गिधाडे, काही जातींचे ससाणे इत्यादी पक्षी वडाच्या जाड फांद्यांच्या बेचक्यातून आपली काट्याकुट्यांची घरटी बनवतात. तसेच साळुंकी, बुलबुल, कोकिळा, पारवे, पावशा, हळद्या, हरियाल यांची वडाची फळे खाण्यासाठी झुंबड लागलेली असते.

वडाच्या फांद्यांवर वाढणाऱ्या बांडगुळाच्या फुलातील मध चाखायला फुलटोचे येतात. सुभग, नाचरा, सातभाई, चष्मेवाला इत्यादी पक्षी पानामागे दडलेले व फळातील बारीक कीटक खाण्यासाठी वडाकडे येतात. वडावर मधमाशांचे एखादे पोळे असेल तर कोतवाल, वेडा राघू इत्यादी पक्षांची विशेष चंगळ असते. त्यामुळे अशा वडावर पक्ष्यांचा गलका जास्तच आढळतो. वडाच्या फांद्यांच्या बेचक्यात खारी शेवरीचा कापूस, मऊ गवत इत्यादी वापरून आपले घरटे बनवतात. जंगलातील मोठ्या वृक्षांच्या ढोलीचा उपयोग वाघ, कोल्हे, अस्वल, रानमांजर इत्यादींनी केल्याच्या नोंदी व निरीक्षणे आहेत. माकडं, वांदर यांचे कळप वडाची फळे फस्त करतात.

वडाखालच्या पालापाचोळ्यात सापसुरळी, गोम तसेच खोडावर पाली, धामण, हरणटोळ यासारखे साप, सरडे आणि बिळातून मुंग्या, वाळव्या इत्यादी जीव आसरा घेतात. एखाद्या वडाच्या झाडाच्या आधारे पक्षी, प्राणी, कीटकांच्या जास्तीत जास्त जाती एकमेकांच्या सहवासात राहताना आढळतात. विविध अधिवासात आढळणारे वडाचे झाड, प्रचंड विस्तार आणि खाद्याची विपुलता यामुळे वडाच्या अवतीभोवती एक मोठी परिसंस्था तयार झालेली आढळते. वडाच्या झाडाच्या सर्व भागात औषधी गुणधर्म आहेत. शेतकऱ्यांच्या हातापायास पावसाळ्यात भेगा पडतात. वडाचा चीक लावल्याने त्या भरून येतात. दात किडल्याने होणाऱ्या वेदना, हा चीक दातात भरल्यास थांबतात.

सांधेदुखी, कंबरदुखी अशा आजारात या चिकाचा लेप लावतात. ताप आला असता वडाची तीन-चार गळलेली पाने तांदळाच्या पेजेत उकळून देतात. त्यामुळे घाम लवकर येतो. वडाची फळे मधुमेहावर औषध म्हणून वापरतात. सर्पदंश झाला असता वडाची साल वाटून त्यावर लावतात. पारंब्यांचा उपयोग केसाच्या तेलामध्ये केला जातो. भारतीय संस्कृतीत वटवृक्षाला अखिल विश्वाचे प्रतीक मानले आहे. ते वटपौर्णिमेच्या आधी अमानुषपणे छाटले जातात. आपल्या पूर्वजांनी निसर्गचक्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या वृक्षाचे संरक्षण व्हावे या हेतूनेच वटपौर्णिमेसारखे सण सुरू केले; मात्र याच हेतूचा विसर आज पडलेला आहे.

"वटवृक्षाला हिंदू धर्मात पूजेचे स्थान मिळाले आहे. वटसावित्रीची कथा या वृक्षाबरोबर गुंफली गेली आणि हा वृक्ष पूजनीय ठरला. या कथेतील सावित्री जितकी मोठी आणि आदर्श मानली जाते तितकाच वडही निसर्गातील एक मोठा आणि आदर्श वृक्ष आहे. निसर्गातील वडाचे स्थान व उपयोग लक्षात घेतले तर तो निश्चितच पूजनीय असे म्हणता येईल."

- सौ. नेत्रा पालकर-आपटे, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT