आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ बेरडकी येथे शनिवारी पुन्हा अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केला. अस्वलाने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. बुधाजी सैना नाईक (वय 62) असे त्यांचे नाव आहे. ही सलग दुसरी घटना असून, काल (ता. 30) याच अस्वलाने त्यांच्याच शेजारील नागेश रिमू नाईक यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेमुळे तेथील परिसरात खळबळ उडा आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी : बुधाजी नाईक बेरडकी येथील घराजवळच्या परिसरात जनावरे चरायला घेऊन गेले होते. या वेळी त्यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. अस्वलाने त्यांच्या पायाला चावा घेतला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. त्या वेळी जवळ असणारे त्यांचे नातेवाईक विष्णू नाईक यांनी जाऊन अस्वलाला हुसकावून लावले. त्या अस्वलाबरोबर एक पिलू होते. त्यामुळे अस्वल आक्रमक झाले. अर्जुन नाईक आणि सागर नाईक यांनी 108 रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर रुग्णवाहिकेला उशीर होत असल्याने वन समिती अध्यक्ष पांडुरंग गावडे यांनी वन विभागाला कळविले. त्यानंतर त्यांना वन विभागाच्या गाडीने आरोग्य केंद्रात आणण्यात आले.
आरोग्य केंद्रात डॉ. महेश जाधव यांनी प्राथमिक उपचार केले. या वेळी आरोग्य परिचारिका अस्मिता कोठावळे, वनिता देशमुख यांनी उपचार केले. वन विभागाच्या गाडीतून वनपाल सदानंद कदम, वनरक्षक गोरख भिंगारदिवे, शिवराम गावडे, चालक एकनाथ पारधी यांनी आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्याठिकाणी वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, अमोल पाटेकर, वनरक्षक दयानंद शिंदे यांनी आरोग्य केंद्रात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जखमी नाईक यांना अधिक उपचारांसाठी सावंतवाडी येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या चिखलव्हाळ बेरडकी, कानूर, हलकर्णी येथील नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. दरम्यान, चौकुळ ग्रामपंचायत सदस्य केशव गावडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांनीही भेट देऊन त्यांची विचारपूस केली.
नागेश नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा
अस्वलाच्या हल्ल्यात काल जखमी झालेले नागेश नाईक यांची तब्येत चांगली असल्याचे गोवा-बांबोळी येथून त्यांचा मुलगा योगेश नाईक याने सांगितले. त्यांना गंभीर दुखापत असल्याने एक लाख 25 हजार रुपये भरपाई वन विभागाकडून देण्यात येणार आहे.
तेथील परिसर अस्वलांचा आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सायंकाळी, रात्री फिरू नये. आवश्यक असेल तर बॅटरी आणि काठी सोबत घ्यावी. आजच्या घटनेतील दुखापत काय आहे, हे आरोग्य अधिकाऱ्यांना विचारून नुकसान भरपाई देण्यात येईल. किरकोळ दुखापत असेल तर 20 हजार वन विभागाकडून देण्यात येतात.
- दिगंबर जाधव, वनक्षेत्रपाल, वन विभाग, आंबोली
शेतकऱ्यांवर अनेकदा हल्ले
चौकुळ बोरिवाडी येथील सोनी मया पाटील यांच्यावरही अस्वलाने 18 मे रोजी हल्ला केला होता. काल नागेश नाईक यांच्यावर हल्ला झाला होता. वर्षभरापूर्वीही सात ते आठ वेळा चौकुळमध्ये अस्वलाचे बरेच हल्ले झाले. गवा-रेड्यांनी हल्ला केल्याचे प्रकार बऱ्याचदा घडले आहेत.
संपादन : विजय वेदपाठक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.