Bhaskar Jadhav vs Nilesh Rane esakal
कोकण

जाधव-राणे समर्थकांत तुफान राडा; पोलिसांकडून अश्रूधुरासह लाठीमार, 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

कणकवली दौऱ्यात भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर सडकून टीका केली होती.

सकाळ डिजिटल टीम

नीलेश राणे यांची गाडी भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर दाखल होताच जोरात घोषणाबाजी झाली आणि अचानक दगडफेक होऊ लागली.

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या संपर्क कार्यालयासमोरच माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) समर्थक आणि भास्कर जाधव समर्थक शुक्रवारी सायंकाळी एकमेकांना भिडले. जोरदार घोषणाबाजी सुरू असताना, अचानक तुफानी दगडफेक सुरू झाली. नीलेश राणेंच्या गाडीची काच फुटली. त्यामुळे जमाव अधिक आक्रमक झाल्यावर पोलिसांनी अश्रूधुराचा मारा, लाठीमार करीत जमावास पिटाळून लावले.

दरम्यान, चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजते. शुक्रवारी रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. जमावातील काही जणांसह पोलिस कर्मचारीही जखमी झाले. कणकवली दौऱ्यात भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याचा समाचार घेण्यासाठी नीलेश यांनी शृंगारतळीत जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या पार्श्वभूमीवर चिपळुणात फलकबाजीने तणावाचे वातावरण होते. राणेंच्या वाहनांचा ताफा पाग येथे दाखल झाला. त्यांच्या स्वागतासाठी समर्थक थांबले होते.

त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात घोषणाबाजी केली. त्याचवेळी आमदार जाधवांच्या कार्यालयासमोर शिवसैनिक जमा झाले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली. नीलेश राणे यांची गाडी भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर दाखल होताच जोरात घोषणाबाजी झाली आणि अचानक दगडफेक होऊ लागली. त्याला दगडफेकीने प्रत्युत्तर मिळाले. यात राणे यांच्या गाडीची मागची काच फुटली.

त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यामधील काहीजण जखमी झाले. त्यामुळे राणे समर्थक आक्रमकपणे जाधवांच्या कार्यालयाच्या दिशेने धावू लागले. पोलिसांनी त्यांना अटकाव केला; परंतु दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने तणाव वाढला. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करीत अश्रूधुरांचाही मारा सुरू केला. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची पांगापांग झाली.

राणे यांची गाडी तातडीने जमावातून बाहेर काढत पॉवर हाऊसच्या दिशेने पुढे पाठवली. त्यापाठोपाठ त्यांच्या ताफ्यातील अन्य गाड्याही बाजारपेठ दिशेने सोडल्या. राणेंचा ताफा निघून जाताच जाधव यांच्या कार्यालयासमोर पुन्हा त्यांच्या समर्थकांचा जमाव वाढला. त्यानंतरही कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरूच होती. या वेळी आमदार भास्कर जाधव, विक्रांत जाधव व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यालयात उपस्थित होते. काही वेळाने वातावरण शांत झाले, परंतु पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

कार्यकर्त्यांनाच फटका

या दगडफेकीत काहींच्या डोक्याला, हाताला, तोंडाला गंभीर दुखापत झाली. जमावास पांगवताना झालेल्या लाठीमाराचा फटका एका पत्रकारासही बसला. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या जखमीपैकी काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दगडफेकीचा फटका बसला.

दगडफेकीत पोलिसही जखमी

आमदार जाधवांच्या संपर्क कार्यालयासमोर दुपारनंतर पोलिस बंदोबस्तात वाढ केली. पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, सावर्डेचे जयंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस तैनात होते. आधीपासूनच तणावाचे वातावरण असल्याने पोलिस पूर्ण तयारीनीशी होते. अश्रूधुराच्या नळकांड्या, अग्निशमन यंत्रणा तैनात होती. तणाव वाढल्याने पोलिसांनी या यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. दगडफेकीत दोन पुरुष व एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिस निरीक्षक शिंदे यांनाही अश्रूधुराची मोठी झळ बसली.

वाहनांचीही तोडफोड

राणे व जाधव समर्थक एकमेकांना भिडल्यानंतर कार्यकर्त्यांनी महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांची तोफफोड करण्यास सुरुवात केली. वाहनांच्या काचेवर दगडफेक केली. यामध्ये अनेकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. टीव्हीएस शोरूमच्या बाहेर असलेल्या दुचाकींचेदेखील नुकसान झाले. रस्त्यालगत पार्किंग केलेल्या वाहनांना सर्वाधिक फटका बसला.

शिवसैनिकांना उचकवून शांतता भंग - भास्कर जाधव

चिपळूण: गुहागरमध्ये नीलेश राणे यांच्या सभेला माणसे जमली नाहीत म्हणून त्यांनी चिपळूणमध्ये शिवसैनिकांना उचकवून चिपळूणची शांतता भंग करण्याचा काहीअंशी प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली. पोलिसांनी एकतर्फी कारवाईचा आरोपही त्यांनी केला. जाधव म्हणाले, गुहागरमध्ये नीलेश राणे माझ्याविरोधात सभा घेणार होते. त्यासाठी ते मुंबईतून चिपळूणला आले. वास्तविक त्यांना गुहागरमध्ये जाण्यासाठी दापोलीमार्गे फेरीबोटने जाणे सोयीचे होते. पण ते मुद्दाम चिपळूणला आले.

कापसाळ येथील विश्रामगृहावर त्यांचा सत्कार होता. पण त्यांनी तो मुद्दाम महामार्गावर पागनाका येथे माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घेतला आणि महामार्ग बंद ठेवला. त्यांनी माझ्या विरोधात बॅनरबाजी केली होती. आम्ही कोणाच्याही झेंड्याला किंवा बॅनरला हात लावत नाही ती आमची संस्कृती नाही. पण निलेश राणे यांचे कार्यकर्ते मुद्दामहून हातवारे करत घोषणाबाजी करत आले. पहिली दगडफेक त्यांनी केली. त्याला उत्तर म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, घोषणाबाजी केली. सभेला कार्यकर्ते जमले नसल्यामुळे त्यांनी घरी जाणे अपेक्षित होते. मी माझ्या कार्यकर्त्यांना खुर्चीवर उभा राहून घरी जाण्यासाठी विनंती करत होतो. पण निलेश राणे यांचे कार्यकर्ते चाल करून आले त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिले. राणे चिपळूणची संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT