सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेली रानगव्यांची संख्या शेतकऱ्यांना डोईजड झाली आहे. भात शेती सोडाच, आता आंबा, काजू बागेतही या वन्यजीवांकडून हैदोस सुरू आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू तारणारी शेती, बागायती गव्यांच्या सावटाखाली अडचणीत सापडली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे शेतीकडे होणारे दुर्लक्ष पडीक जमिनीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या गव्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.
- रुपेश हिराप
विस्तारलेला अधिवास
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये रानगव्यांचा वावर मोठ्या संख्येने आढळून येतो. गेली कित्येक वर्षे त्याचा येथील जंगलात त्यांचा अधिवास होता; पण ते आता वस्तीकडे सरकत आहेत. आज गव्यांची संख्या खूप वाढली असून सह्याद्री पट्ट्यातील आंबोली, दोडामार्ग तालुका, माणगाव खोरे, सावंतवाडी तालुक्यातील बऱ्याच गावांत गव्यांचे वास्तव्य ठळक आहे.
शेतीत आक्रमक
येथील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा भातशेती आहे. यापलीकडे जाऊन आज शेतकरी काजू, आंबा बागायतीकडे वळू लागला आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून जंगल परिसरातील शेती सोडाच, आता भर वस्तीतही गव्या रेड्यांकडून शेतीची नुकसानी होत असल्याने शेतकरी डबघाईला आला आहे. शासन दरबारी ओरड मारूनही काहीच हाती लागत नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी आज केवळ शासनाच्या नावाने टाहो फोडण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. शासनाकडून केवळ तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जाते. त्यामुळे लाखोंचा पोशिंदा असलेल्या या शेतकऱ्याच्या दुःखाला शासन दरबारी हवा तसा न्याय आजही मिळत नाही.
का येतात जंगलाबाहेर?
गवा हा रवंथ करणारा प्राणी आहे. तो सकाळी, पहाटे किंवा सायंकाळी उशीरा चरायला बाहेर पडतो. दुपारच्या उन्हात तो निवांत दाट झाडीत रवंथ करत बसतो. मोकळ्या कुरणातील गवत, झाडपाला, कोवळ्या फांद्या, कोवळे बांबू हे त्याचे आवडीचे खाद्य. खारट जमीन, खडक चाटायला त्याला आवडतात. त्यामुळे जंगलात ज्या ठिकाणी खारट जमीन, खडक असतात, तेथे त्याचा वावर जास्त असतो; मात्र जिल्ह्यातील खासगी जंगलाचा विचार करता या ठिकाणी गव्याचे आवडते खाद्य नष्ट होत आले. त्यामुळे त्याच्या अन्नाचा प्रश्न पुढे आला आहे. खासगी जंगलात पाणवठ्यांची सोय नसल्याने हा प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात आता जंगलाबाहेर शेतीकडे हळूहळू भरवस्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे.
रक्षण आवाक्याबाहेर
लाखो रुपये खर्च करून वनविभागाने वन हद्दीमध्ये उभारलेले सौर कुंपण दुरुस्तीअभावी धूळ खात पडले आहे. आज सावंतवाडी तालुक्यातील नेमळे, सोनुर्ली, वेत्ये, पाडलोस, मडुरा, मळगाव, निरवडे, न्हावेली, आदी भागात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. पावसाळी शेती सोडाच, आता उन्हाळी शेती करणेही गव्याच्या आक्रमणापुढे कठीण बनले आहे. त्यामुळे शेतीचे संरक्षण करायचे कसे? हा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे. पूर्वी माचोळी उभारून शेतीचे संरक्षण केले जात असे. आजही काही ठिकाणी ही पद्धत आहे; मात्र हे किती दिवस चालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील एकूण जंगलापैकी १० टक्के जंगल वनविभागाच्या ताब्यात आहे. उर्वरित जंगल हे खासगी आहे. त्यामुळेच गव्यांवर नियंत्रण ठेवणे वनविभागालाही कठीण होत आहे.
का वाढतेय संख्या?
गवा हा अतिशय ताकदवान प्राणी समजला जातो. पूर्ण वाढ झालेल्या गव्याचे वजन एका टनाबाहेर असते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करता याठिकाणी जवळपास २५ ते ३० वर्षांपासून गव्यांचा अधिवास आहे; मात्र बलाढ्य असलेल्या या प्राण्याचा भक्षक पट्टेरी वाघ आहे. कोळसुंदे गटाने या प्राण्याची शिकार करू शकतात; मात्र या ठिकाणी वाघाचा अधिवास कायम नसल्याने व त्यांची संख्या मर्यादित असल्याने गव्याला येथे शत्रूच नाही. परिणामी या ठिकाणी गव्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अलीकडच्या काळात अनेक कायद्यांमध्ये प्रभावी बदल झाल्याने मानवाकडून होणारी शिकार व जंगलांमध्ये त्यांचा असलेला वावर यावर मर्यादा आल्या आहेत. याचा फायदा वन्यजीववाढीसाठी झाला आहे. आजच्या स्थितीमध्ये जंगलातून गवा भरवस्तीपर्यंत येऊ लागला आहे; मात्र त्यांची वाढती संख्या शेती बागायती नव्हे, तर भविष्यात मानवासाठीही धोकादायक ठरू शकते.
काय आहेत उपाय?
सिंधुदुर्गातील गव्यांची वाढती संख्या आणि शेतीवर होणारे आक्रमण यात वनविभागाकडून होणारी निराशा लक्षात घेता शेतकऱ्यांकडून आता स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या शेतीचे संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे. यासाठी शेतीची एकत्ररित्या आळीपाळीने राखण करणे, आवाज करण्याच्या वस्तूचा वापर शेतीच्या ठिकाणी करणे याशिवाय वनविभागाने गव्यासाठी जंगलात पाणवठे, खाद्य तयार केल्यास हे गवे जंगलातच राहू शकतात. जंगलाशेजारील शेतीच्या संरक्षणासाठी माचोळी बांधून रक्षण केल्यास शेती वाचू शकते. शक्यतो गव्यावर हल्ले करणे टाळले पाहिजे. खासगी तत्वावर शेतकऱ्यांनी एकत्र येत सौर कुंपण उभारल्यास त्याची देखभाल दुरुस्ती नित्यनियमाने होऊन शेतीचे संरक्षण होऊ शकते.
पडीक जमिनीत वाढ
दिवसेंदिवस वन्यजीवांचे शेतीवर होणारे आक्रमण लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेती करणेच सोडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता बहुतेक शेतजमिनीला लागून जंगलभाग आहे. दोन डोंगरांच्या खोबणीत असलेल्या भागात भातशेती केली जाते. याठिकाणी पाणथळ जमीन असल्याने या भागाला ‘शेळ’ असेही म्हटले जाते. भरपूर उत्पन्न देणारी शेती म्हणूनही याकडे पाहिले जाते; मात्र आज ही अन्नदाती शेतीच पडीक ठेवण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. जंगलाला लागूनच अशी शेती असल्याने गव्यांकडून रात्रीच्या वेळी शेतीची नासधूस केली जाते. बऱ्याचवेळा राखण करूनही गव्यांनी शेती नष्ट केल्याने कंटाळून आज ही जमीन कसण्याचे शेतकऱ्यांनी सोडून दिले आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हीच स्थिती असल्याने पर्यायाने पडीक जमिनीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. आंबा, काजू बागायतींमध्येही गव्यांचा वावर असल्याने कलमांच्या फांद्या तोडणे आदी नुकसानी या प्राण्यांकडून होत असल्याने पठार, भराडी जमीनही विनावापर पडून आहे.
गव्याच्या सततच्या नुकसानीमुळे शेती करण्याचा उत्साहच राहिला नाही. पेरलेले पीक हातात मिळणार की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे चांगली पीक देणाऱ्या शेतजमिनी पडीक सोडण्याची वेळ आली आहे. वनविभागाकडून तुटपुंजी नुकसानी भेटते; मात्र त्यासाठी अनेक कागदपत्रे नाचवावी लागतात. यात वेळ जातो. त्यामुळे गेली कित्येक वर्षे गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीची झळ शेतकरी सोसत आहेत. उन्हाळी शेती सुद्धा अडचणीत आली असून, मिरची, चवळी आदी पिके गव्यांकडून नष्ट होत आहेत.
- सूर्यकांत नाईक, शेतकरी, पाडलोस
भातशेतीची होणारे नुकसान पाहून काजू शेतीकडे वळलो; मात्र तेथेही गव्यांकडून नुकसानी सोसावी लागली. गेली तीन-चार वर्षे मेहनतीने वाढविलेली काजू कलमे गव्यांकडून मोडली जातात; अंगाला माशी चावल्यानंतर गवे काजूच्या झाडाला अंग चोळतात. यात झाडे मोडतात. तीन वर्षे काजू झाड जपण्यासाठी मोठा खर्च येतो; मात्र मिळणारी नुकसान भरपाई टीचभर असते. सामाईक जमीन असल्यास अनेक अडचणी येतात. वनविभागावरचा शेतकऱ्यांचा विश्वासच उडाला आहे.
-राघोबा गावडे, शेतकरी, पाडलोस
वन्यप्राण्यांना सीमा नसतात. ते कुठेही फिरू शकतात. गव्यांची झपाट्याने वाढलेली संख्या लक्षात घेता वनविभागाकडून त्यांना आवश्यक असलेले अन्न व पाणी जंगलाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात आहे. वनविभागाच्या हद्दीत हे प्रयोग राबविले जात आहेत; मात्र शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतीचे संरक्षण करावे. त्यासाठी शेतीच्या बांधावर बांबूची लागवड केल्यास फायदा होईल. त्यासाठी आवश्यक बियाणे वनविभाग देईल.
- शहाजी नारनवर, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.