Konkan : ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व मिळविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथे सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी आमदार नीतेश राणे यांना उचलून धरत आनंदोत्सव साजरा केला. सिंधुदुर्गात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने वर्चस्व राखले आहे. जिल्ह्यातील २४ पैकी भाजपने १५, शिवसेनेच्या ठाकरे गटाने ५ तर गावविकास पॅनलने ४ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. आचऱ्यासारखी मोठी ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकाविला. हा ठाकरे शिवसेनेच्या आमदार वैभव नाईक यांना धक्का मानला जात आहे.
जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर पाच सरपंचपदाच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. यात २४ सरपंच तर ७६ सदस्यांचा समावेश होता. पोटनिवडणुकांमध्ये ५२ ग्रामपंचायतीमध्ये पाच सरपंच आणि ५६ सदस्यांचा समावेश होता. यातील दोन ग्रामपंचायत सरपंच व सदस्य निवडी बिनविरोध झाल्या. अन्य ठिकाणी काही सदस्य निवडीही बिनविरोध झाल्या. त्यामुळे २२ सरपंच पदांसाठी ६४ आणि सदस्य पदांसाठी ३४२ उमेदवार रिंगणात होते. पोटनिवडणुकीत पाच सरपंचपदापैकी केवळ एका पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. सदस्य पदांसाठी २२ जण रिंगणात होते. यासाठी रविवारी मतदान झाले. आज सकाळी त्या त्या तहसील कार्यालयांत मतमोजणी झाली.
निकालात भाजपने वर्चस्व राखले. मतदान झालेल्या २२ पैकी १४ ठिकाणी भाजपचे सरपंच विजयी झाले. ठाकरे शिवसेनेला (उबाठा) पाच ग्रामपंचायतींवर सरपंच निवडून आणता आले. चार ग्रामपंचायतींवर गाव विकास पॅनेलने बाजी मारली. यामुळे जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघातील असताना जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचा एकही सरपंच निवडून आणता आलेला नाही.
सर्वाधिक नऊ ठिकाणी मतदान झालेल्या देवगड तालुक्यांत शिवसेनेला एक तर भाजपला उर्वरित ९ ठिकाणी वर्चस्व मिळाले. मालवणमधील एकमेव आचरा ग्रामपंचायत भाजपकडे गेली. कुडाळमध्ये ठाकरे गट आणि भाजपला प्रत्येकी दोन तर गाव पॅनेलला एका ग्रामपंचायतीत वर्चस्व राखता आले. वेंगुर्लेत भाजपकडे तीन आणि ठाकरे गटाकडे एक, कणकवलीत भाजप आणि ठाकरे गटाकडे प्रत्येकी एक तर दोडामार्गमधील तिन्ही ग्रामपंचायतींत गावविकास पॅनेलकडे गेल्या.
चाफेखोलच्या वर्चस्वावर राजकीय दावेदारीमालवण तालुक्यातील चाफेखोल ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत रविना घाडीगावकर विजयी झाल्या. त्या गावविकास पॅनेलमधून विजयी झाल्याचा दावा ठाकरे शिवसेनेने केला, तर त्या आपल्या पक्षाच्या उमेदवार असल्याचा दावा भाजप व शिंदे शिवसेनेने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.