चिपळूण : जिवंतपणी आपण सामाजिक कार्यात योगदान देतो. मात्र, मरणानंतरही देहाचा उपयोग समाजासाठी व्हावा, या विचाराने तालुक्यातील कुशिवडे येथील विलास डिके यांच्या एकाच कुटुंबातील ९ जणांनी देहदानाचा निर्णय घेतला आहे. आई, वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डेरवण रुग्णालयास देहदान करण्याचा संकल्प डिके कुटुंबीयांनी केली. याचवेळी डिके यांच्या मित्र परिवारातील तोंडली येथील प्रा. येलये दाम्पत्य, कडवई येथील शिक्षक कडवईकर दाम्पत्य आणि दिपीका जोशी अशा १४ जणांनी एकाच वेळी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
मरणानंतरही आपल्या शरीरातील अवयव गरजूंसाठी उपयोगात यावेत, याबाबत तितकीशी जागरूकता समाजात झालेली नाही. त्यामुळे एकाच वेळी कुटुबांतील सर्वांनी देहदान करण्याच्या निर्णयावर कुशिवडे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास डिके म्हणाले, आम्ही नेहमीच सामाजिक कार्यासाठी योगदान देत असतो. मात्र, मरणानंतरही आमचा देह समाजातील गरजूंच्या उपयोगी पडावा, अशी आमची भावना आहे. मुलगी मुंबईत नर्सिंगचे शिक्षण घेत असतानाच तिने देहदानाचा संकल्प केला होता. आता ती चंद्रपूर येथे नोकरीला असून देहदानाचे महत्व ती समजावून सांगते. देहदान करण्याबाबत कुटुंबातील सर्व व्यक्तींशी चर्चा झाली. मरणानंतर देह जळून खाक होण्यापेक्षा आपल्या शरीरातील अवयव एखाद्या गरजूंच्या कामी आले, तर या देहाचे अधिक सार्थक होईल. हा विचार कुटुंबांतील सर्वांना पटला. त्यानुसार विलास डिके यांच्या पत्नी व मुले, भावाची पत्नी व मुले, आई वडील अशा ९ जणांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला.
आई वडिलांच्या विवाहाचा वाढदिवस १९ फेब्रुवारीला. याच दिवशी शिवजयंत्ती असल्याने मान्यवरांना वेळ मिळणार नाही म्हणून २० फेब्रुवारीस घरगुती कार्यक्रम घेत देहदानाचे फॉर्म भरण्यात आले. याचवेळी तोंडली येथील प्रा. संदीप येलये, शिल्पा येलये, कडवई येथील शिक्षक मिलींद कडवईकर, मिताली कडवईकर आणि म्हाबळे येथील दिपीका जोशी यांनी देहदानास संमती दिली. यावेळी देवरूख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, साखरपा येथील काका जोशी, सुरेश भायजे, डेरवण रुग्णालयाचे डॉ. अविनाश शेवाळे, स्वरा चव्हाण, कोंडमळा सरपंच रमेश म्हादे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रसिका म्हादे आदी उपस्थित होते.
सरकारने मृतदेह ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केली पाहिजे. अनेक गावांत स्मशानभूमीवरून वाद होतात. सर्वांनीच देहदान केल्यावर गावांत स्मशानभूमीची गरज भासणार नाही. अस्थी विसर्जनावर अनाठायी खर्च होतो. नदीचे प्रदूषण केले जाते. मरणानंतही आपला देह दुसऱ्याच्या उपयोगी पडावा, ही भावना रूजायला हवी.
-विलास डिके, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.