मंडणगड : तालुक्यातील गावोगावच्या शेकडो भातशेतीच्या खलाट्या पडीक आहेत. वीस खंडींपेक्षा अधिक भाताचे हमखास उत्पन्न देणाऱ्या खलाट्या पडीक राहिल्याचे गंभीर चित्र आहे. शेतीची आर्थिक गणिते जुळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली असून, रोजगारासाठी महानगराकडे स्थलांतर केले आहे. सामूहिक शेती हा यावरील उपाय ठरू शकतो.
वर्षानुवर्षे तालुक्यातील शेतकरी कष्टप्रद शेती करीत आला; मात्र काळाबरोबर शेतीत झालेले बदल, आधुनिक तंत्र स्वीकारण्याची मानसिकता तयार झाली नाही. परिणामी शेतीतील उत्पादने आणि त्यासाठी होणारा खर्च याचा मेळ जमून आला नाही. अन्य रोजगार उपलब्ध न झाल्याने नोकरी, धंद्यानिमित्त येथील नागरिकांनी पाच तासांच्या अंतरावर असणाऱ्या मुंबई, पुणे, नालासोपारा अशा महानगराकडे स्थलांतर केले. त्याठिकाणी महिन्याला मिळणारा पगार हा वर्षभर शेतात केलेल्या कष्टाच्या बरोबरीने होऊ लागला. हळूहळू स्थलांतराचे प्रमाण वाढत गेले. आज तालुक्यातील कर्ती लोकसंख्या महानगराकडे स्थलांतरित झाली आहे.
८० हजारांची लोकसंख्या ६० हजारांवर..!
ऐंशीच्या दशकात ८० हजारांची तालुक्याची लोकसंख्या वाढण्याऐवजी आज ६० हजारांवर आली आहे. आजच्या घडीला करण्यात येणारी शेती ही स्थानिक कुटुंबाच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहापुरती मर्यादित राहिली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेती क्षेत्र दरवर्षी कमी कमी होत गेले. त्यातच जंगली श्वापदांचा शेतीत उपद्रव वाढून उत्पादनात घट होऊ लागली. मागील काही वर्षांपासून आंबा, काजू व अन्य फळझाडे लागवडीकडे कल आहे.
खाडीचे खारे पाणी शेतात
सावित्री खाडी व समुद्र किनारी असणाऱ्या गावांचे धूपप्रतिबंधक बंधारे निकामी झाल्याने खारे पाणी शेतात घुसून उंबरशेत, पेवे, पणदेरी, पडवे, लोकरवण, कोंडगाव, उमरोली, निगडी, घुमरी, किंजळघर, गोठे खलाटी, वेळास, साखरी, आंबवली, खारी, जावळे गावांना त्याचा फटका बसला असून शेकडो एकरची जमीन नापीक बनत चालली आहे.
भौगोलिक क्षेत्र- ४२५७५ हेक्टर
पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र-५९४७.४५ हेक्टर
फळ पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र- ८२४५ हेक्टर
लागवडयोग्य असूनही पडीक क्षेत्र- ४७२०.२१ हेक्टर
लागवडीस अयोग्य पडीक क्षेत्र- ६५६७.९४ हेक्टर
पाणथळ खलाट्या
तुळशी, कोन्हवली, देव्हारे, पाले, कलकवणे, वडवली, चिंचघर, शेवरे, केरील, माहू, नारगोली, कुंबळे, दहागाव, तिडे, शेनाळे, चिंचाळी, कोंजर, पालवणी अशा अनेक गावांच्या भातशेती होणाऱ्या खलाट्या पडीक आहेत. शेतात वावर न राहिल्याने ही जमीन गाळाने भरून नापीक बनत आहे.
"वर्षाअखेर शेतीतून पदरी पडणारे उत्पन्न हे असून नसल्यासारखे आहे. नैसर्गिक संपन्न तालुक्यात कृषी क्रांती होणे अपेक्षित होते; मात्र त्याऐवजी कृषीचे क्षेत्रच कमी होऊ लागले आहे. घटते पशुधन व मनुष्यबळाची वानवा यामुळे गट व सामूहिक शेती करून दुबार पिकांचा पर्याय अंमलात आणणे अनिवार्य आहे."
- संजय रेवाळे, शेती अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.