देवगड हापूसला देशाच्या विविध बाजारपेठांसह जगभरात मागणी असते; परंतु, यावर्षी आंबा थ्रीप्समुळे धोक्यात आला आहे.
वैभववाडी : जिल्ह्याचे प्रमुख पीक हापूस आंब्याला (Hapus Mango) ‘थ्रीप्स’चा (Thrips Disease) विळखा पडला असून मोहोर करपत चालला आहे. त्यामुळे फळे डागाळून जमिनीवर कोसळू लागली आहेत. कोणत्याही किटकनाशकांचा थ्रीप्स नियंत्रण आणण्यासाठी उपयोग होत नसल्याने आंबा बागायतदारांसमोर कधी नव्हे एवढे मोठे संकट उभे राहिले आहे. विद्यापीठ, कृषी विभागाचे अधिकारी देखील थ्रीप्सपुढे हतबल झाले आहेत.
यावर्षीचा आंबा हंगामच बागायतदारांच्या हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा हापूससाठी ओळखला जातो. जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील आंब्याला जगभरात मागणी आहे. देवगड (Devgad), वेंगुर्ले, मालवण या तालुक्यांसह जिल्ह्याच्या बहुतांशी भागात आंबा लागवड असून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. देवगड हापूसला देशाच्या विविध बाजारपेठांसह जगभरात मागणी असते; परंतु, यावर्षी आंबा थ्रीप्समुळे धोक्यात आला आहे.
जानेवारीतील चांगल्या थंडीमुळे आंब्याला प्रचंड मोहोर आला. या कालावधीत वातावरणातील बदल आणि इतर काही गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात थ्रीप्सचा प्रादुर्भाव देखील वाढू लागला. आतापर्यत कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात थ्रीप्सचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. थ्रीप्समुळे हजारो हेक्टर बागांमधील आंब्याचा मोहोर बागायतदारांच्या नजरेसमोर करपू लागला आहे. फळे डागाळली जात आहेत. एक- एक फळावर दोनशे- दोनशे थ्रीप्स घोंघावत आहेत. बागेतून किंवा देवगड तालुक्यातील काही रस्त्यावरून चालताना देखील थ्रीप्सच्या झुंडी दिसून येत आहेत.
आंबा बागायतदारांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्या विविध महागड्या किटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या; परंतु, थ्रीप्सचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. उलट तो वाढताना दिसत आहे. देवगड तालुक्यात थ्रीप्सचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या भागातील उत्पादनच बागायतदारांच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. यावर्षी पहिला टप्प्यात १५ ते २० टक्के, दुसऱ्या टप्प्यात २० ते २५ तर तिसऱ्या टप्प्यात ४० ते ५० टक्के मोहोर आला. हाच मोहोर थ्रीप्सचा बळी ठरत असल्याने मोठे नुकसान होणार आहे. कोणत्याच किटकनाशकांनी थ्रीप्स नियंत्रणात येत नसल्यामुळे नेमके काय करावे, हे बागायतदारांना सुचेनासे झाले आहे.
कधी नव्हे इतका थ्रीप्सचा प्रादुर्भाव आंबा बागांवर दिसत आहे. थ्रीप्स हवेत तरंगताना दिसत असून त्यावरून त्याच्या प्रमाणाची तीव्रता जाणवते. कोणत्याच किटकनाशकांना थ्रीप्स जुमानत नाही, ही वस्तुस्थिती आहे. थ्रीप्समुळे देवगड तालुक्यातील बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.
-बाळा मुळम, आंबा बागायतदार, देवगड
कमाल आणि किमान तपमानातील फरक, ठराविक किटकनाशकांची सतत फवारणी यांसह विविध कारणांमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्या किटकनाशकांची तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.
-डॉ. विजय दामोदर, फळसंशोधन उपक्रेंद, रामेश्वर देवगड
गेल्या दोन-तीन वर्षांपासून थ्रीप्सच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत होते; परंतु, यावर्षी थ्रीप्सने हद्दपार केली आहे. एका एका फळावर दोनशेपेक्षा जास्त थ्रीप्स आहेत. ते नियंत्रणात आणण्यासाठी बाजारपेठेतील कोणत्याही किटकनाशकांचा उपयोग होत नाही; परंतु, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.
-डॉ. अजय मुंज, शास्त्रज्ञ, फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले
आंब्यावर वाढलेल्या थ्रीप्सचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्यामुळे आज आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत देवगड येथे फळसंशोधन केंद्रांचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. त्यात उपाययोजनांवर चर्चा झाली.
वातावरणातील बदलाचा परिणाम थ्रीप्सच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरला आहे. उन्हाळ्यात जाणवणारे वातावरण हिवाळ्यात जाणवू लागले. कमाल आणि किमान तापमानातील फरक याच महिन्यात वाढला. त्यामुळे थ्रीप्स वाढला आहे. याशिवाय अनेक बागांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या बागांचा परिणाम आजूबाजूच्या बागांवर होत असल्याचे शेतकऱ्यांचे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
थ्रीप्सपुढे विद्यापीठ, कृषी विभाग हतबल
यावर्षीचा आंबा हंगाम हातातून निसटण्याचा अंदाज
थ्रीप्सला रोखणारी सर्व किटकनाशके कूचकामी
गेल्या सहा सात वर्षांत थ्रीप्सला नियंत्रणात आणणारी नवीन किटकनाशकांची निर्मिती नाही
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.