सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बांदा ते संकेश्वर (कर्नाटक) या एनएच 548 या दोन हजार कोटी रुपयांच्या 108 किलोमीटर चौपदरी राष्ट्रीय महामार्गाला केंद्राने मान्यता दिली आहे. येत्या तीन वर्षांत या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार आहे; मात्र हा मार्ग सावंतवाडी शहरातून जाणार, की बावळाटमार्गे बांद्याला जोडणार? हा नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा संभ्रम आहे. यावर लवकरच केंद्राकडून शिक्कामोर्तब होणार असल्याचे पुणे येथील प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले; मात्र बावळाटमार्गे बांदा, असा मार्ग झाल्यास 10 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. शिवाय तांत्रिक अडचणीही कमी होतील. त्यामुळे बावळाटमार्गेच हा मार्ग नेण्याच्या हालचाली आहेत. तसे झाल्यास आधिच महामार्ग शहराबाहेरून गेल्याने अडचणीत आलेली सावंतवाडी आणखी एक संधी गमावणार आहे.
असा असणार नवा मार्ग
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी पोर्टला जोडण्यासाठी बांदा रेडी-संकेश्वर या राष्ट्रीय महामार्गाचे नाव समोर आले होते; मात्र रेडी पोर्ट पर्यंत महामार्ग नेण्याचा प्लॅन रद्द करत नव्या प्लॅननुसार संकेश्वर ते बांदा हा नवा महामार्ग होऊ घातला आहे. हा महामार्ग चौपदरी असुन जवळपास दोन हजार कोटी रुपये यावर खर्च करण्यात येणार आहे. या महामार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून जवळ जवळ 45 ते 60 मिटर रुंदीचा व 108 मीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. केंद्र शासनाच्या भारतमाला आणि सागरामाला या दोन्ही योजनेमध्ये या महामार्गाला स्थान मिळाल्याने याचे काम तातडीने सुरू होणार आहे.
दोन तासांत कोल्हापूर
या महामार्गाचा अहवाल येत्या नोव्हेंबरमध्ये पुण्याहून दिल्लीला जाणार असून येत्या 31 मार्चपर्यंत निधी केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडे जमा करण्यात येणार आहे. जवळपास अडीच ते तीन वर्षांत या महामार्गाचे काम पूर्णत्वास येणार असून कोल्हापूर ते गोवा हे अंतर अवघ्या दोन तासांवर येणार आहे. कारण हा महामार्ग थेट पुणे-बेंगलोर महामार्गाला जोडला जाणार आहे. शिवाय महामार्गाच्या कामासंदर्भातील सर्व नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून झाले आहे.
प्रश्न अनुत्तरीतच
हा महामार्ग होत असल्याने सावंतवाडी शहरातील नागरिक व्यापारी, उद्योजक यांना चांगले दिवस येऊ शकतात; मात्र अद्यापही हा महामार्ग सावंतवाडी शहरातून बांद्याला जोडणार की बावळाटमार्गे बांद्याला जोडणारा हा अनुत्तरित प्रश्न असून येथील जनता याच संभ्रमात आहे. केंद्राकडून या महामार्गाबाबत बनविण्यात आलेल्या नकाशात हा मार्ग बावळाटमार्गे व सावंतवाडी शहरामार्गे, अशा दोन्ही ठिकाणांवरुन दाखविण्यात आला आहे, त्यामुळे हा मार्ग नेमका कुठून जाणार? यावर अद्याप निर्णय झाला नाही असे पुणे येथील प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या मार्गाच्या कामांबाबत नियोजन झाले असुन महामार्गाचे अंतिम निर्णय हा केंद्राकडूनच होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
सावंतवाडीसाठी आशेचा किरण
सावंतवाडी शहराचा व बाजारपेठेचा विचार करता आधीच मुंबई गोवा एन एच 66 हा चौपदरी महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरुन गेल्याने या शहराला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यात संकेश्वर-बांदा महामार्ग शहराबाहेरुन गेल्यास सावंतवाडीतील बाजारपेठेचे एकप्रकारे अस्तित्वच मिटून जाणार आहे. सुरुवातीला झाराप ते इन्सुली हा जुना राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात होता. त्यावेळी गोव्याला जाणारा पर्यटक सावंतवाडीत थांबत होता. आज मुंबई-गोवा महामार्ग शहराबाहेरुन गेल्याने पर्यटक, प्रवासी हे बाहेरच्या बाहेर गोव्याला जात आहेत; मात्र संकेश्वर ते बांदा हा महामार्ग शहरातून गेल्यास सावंतवाडी ते माजगाव व पुढे इन्सुली व बांदा, अशी एक मोठी बाजारपेठ याठिकाणी निर्माण होणार आहे. त्यातुन बेरोजगारांना रोजगारही मिळणार आहे. अलिकडेच झालेल्या पालिकेच्या बैठकीत हा महामार्ग शहरातून जाण्यासाठी शासन दरबारी ही मागणी उचलून धरण्यात यावी यासाठी पालिकेतील सत्ताधारी विरोधकांनी तसा ठराविक संमत केला आहे.
व्यापाराला चालना
108 किलोमिटरच्या हा नवा मार्ग अस्तित्वास आल्यास सिंधुदुर्गातील व्यापार, व्यवसायाला एकप्रकारे चालना मिळणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संकेश्वर तसेच बेळगाव भाजीपाला तसेच इतर गोष्टी जिल्ह्यात दाखल होतात किंवा इथला व्यापारी जाऊन घेऊन येतो. महामार्ग झाल्यास हे दळणवळण सोपे होणार असुन व्यापाराला चालना मिळणार आहे. कोल्हापूर येथील पर्यटकांना गोव्याला जाण्यासाठी कमी वेळ लागणार असल्याने पर्यटकांची वर्दळ वाढून जिल्ह्यातील पर्यटन वाढीसही मदत होईल. सावंतवाडीतून हा मार्ग गेला तर शहराला पुन्हा चांगले दिवस येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा या मार्गामुळे कर्नाटकशी अधिक प्रभावीपणे जोडला जाणार आहे.
बावळाटला प्राधान्य?
याला दुसरीही बाजू आहे. हा मार्ग बावळाटमधून गेल्यास सह्याद्रीच्या रांगामध्ये काही नवी गावे विकास प्रवाहात येणार आहेत. शिवाय या भागात भूसंपादन करणे अधिक सोपे होईल. बावळाट मार्ग बांद्याला जोडल्यास तब्बल 10 किलोमीटर अंतर वाचणार आहे. ही स्थिती पाहता हा मार्ग बावळाट मार्गेच नेण्याबाबत हालचाली असल्याचे चित्र आहे. संकेश्वर ते बांदा, अशा 108 किलो मीटरच्या या महामार्गाबाबत प्रकल्पाचे अधिकारी लवकरच पाहणी दौरा करणार आहेत.
प्रस्तावित नवा महामार्ग
- बांदा, सावंतवाडी किंवा बावळाट, माडखोल, आंबोली, गवसे, आजरा, कोवाडे, गडहिंग्लज, संकेश्वर
- एकूण लांबी - 108 किलोमीटर
- प्रस्तावीत रूंदी - 45 ते 60 मीटर
- महामार्गाचे नाव - एन एच 548
- संभाव्य खर्च - 2000 कोटी
- कोल्हापूर ते सिंधुदुर्ग हे अंतर- दोन तासांच्या जवळपास
संकेश्वर ते रेडी असा होणारा मुळ महामार्ग हा व्हाया सावंतवाडी असाच होता आणि तो शहरातून प्रस्तावित असणाऱ्या रिंगरोडमार्गे जावा, असा प्रस्तावही शासनाला दिला होता; मात्र आत्ताच्या नव्या प्लॅननुसार हा महामार्ग बावळाट की सावंतवाडीमार्गे बांद्याला जोडणार हा केंद्राचा विषय आहे; मात्र तो शहरातून जावा यासाठी प्रयत्न राहील. महामार्ग शहरातून गेल्यास त्याची अधिमुल्य रक्कम महाराष्ट्र शासन देऊ शकते; मात्र महामार्ग तत्काळ होणे गरजेचे असून कोल्हापूर व सिंधुदुर्गची जवळीक वाढणार आहे.
- दीपक केसरकर, आमदार, सावंतवाडी
संकेश्वर बांदा हा रस्ता कसाही झाला तरी तो बांद्यालाच जोडणार आहे. त्यामुळे तो होताना सावंतवाडी शहरमार्गे व्हावा. जेणेकरुन बांद्यासोबतच सावंतवाडीचाही विकास होणार आहे.
- अक्रम खान, सरपंच बांदा
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.