ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनांमुळे मिठबांवमध्ये खळबळ उडाली आहे.
देवगड : तालुक्यातील मिठबांव (Mithbav in Devgad) येथील खून झालेल्या प्रसाद लोके यांच्या पत्नीचा घरात गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनवा प्रसाद लोके (वय २७) असे तिचे नाव आहे. तिने (Manwa Loke) आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
ही घटना आज पहाटेच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मिठबांव येथील प्रसाद लोके यांचा मृतदेह सोमवारी पहाटेच्या सुमारास मुणगे ते मशवी जाणाऱ्या रस्त्यावर आढळला होता. त्यावर हत्याराने वार केल्याच्या खुणा होत्या.
त्यांचा मोबाईल व गाडीची किल्ली घटनास्थळी नव्हती. हा खून असल्याचे पुढे आले होते. पोलिसांनी सायबर शाखेची मदत घेत या प्रकरणाचा वेगात तपास केला. घटना उघड झाल्यानंतर बारा तासांत कुंभारमाठ (ता. मालवण) येथील संशयित किशोर पवार याला ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले होते.
पोलिसांनी या प्रकरणाचे विविध कंगोरे तपासायला सुरुवात केली. किशोर पवार फोंडा (ता. कणकवली) येथील एका संस्थेत नोकरी करतो. त्याची आणि प्रसाद यांची चांगली ओळख होती. असे असले तरी खुनामागचे ठोस कारण तपासात पुढे आले नव्हते. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता प्रसादची पत्नी मनवा घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
ती बुधवारी (ता. २०) घरात कुटुंबीयांसोबत झोपली होती. आज पहाटेच्या सुमारास ती घरात दिसली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. गच्चीवरील शेडच्या लोखंडी बारला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत तिचा मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, उपनिरीक्षक सुधीर कदम, हवालदार आशिष कदम, अमित हळदणकर, कॉन्स्टेबल विशाल वैजल, देवगडकर आदींनी पंचनामा केला.
ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनांमुळे मिठबांवमध्ये खळबळ उडाली आहे. मनवाचे पूर्वाश्रमीचे नाव अंकिता अरविंद घाडीगावकर असे आहे. पतीच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्येमधून तिने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती अर्चना अरविंद घाडीगांवकर (वय ५३) यांनी येथील पोलिसांना दिली.
प्रसाद लोके खून प्रकरणाचा तपास सुरू आहे. संशयिताकडून कारण स्पष्ट झालेले नाही. तपासाचा भाग म्हणून सर्व माहिती उघड करता येत नाही. परिणामी, आणखी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
-नीळकंठ बगळे, पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.