सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः गेल्या एक ते दोन दशकात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बदलांमुळे असंतोष वाढला आहे व दवाखान्याच्या जागी तो बाहेर पडत असतो. वास्तविक अपघतात रस्त्याला पडलेले खड्डे, दळणवळणाची साधने नसल्यामुळे अडलेली गरोदर माता, महागाईमुळे व गरीबीमुळे औषधोपचार न परवडू शकणे, ही कारणे तेवढीच जबाबदार नाहीत का? त्यामुळे खापर केवळ डॉक्टरांवर फोडणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांनी केले.
‘सकाळ’शी बोलताना कोतकुंडे म्हणाल्या, ‘सामान्यांची अगदीच हतबल परिस्थिती, आर्थिक अडचण असल्यास गरीब जनतेसाठी मात्र शासकीय यंत्रणेला पर्याय नाही. परंतु बऱ्याचदा नाईलाजाने आलेले रुग्ण दवाखान्यात पोहोचायला उशीर करतात. रुग्ण गंभीर असल्यास, पुरेशा यंत्रणा नसल्यास डॉक्टर रुग्णाला जिल्हा रुग्णालय किंवा तत्सम उच्च दर्जाच्या रुग्णालयात जायला सांगतात. अशा परिस्थितीत रुग्ण दगावल्यास डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच रुग्ण दगावला असा लोकांचा समज होतो.
डॉक्टरला मारहाण व नांदेड सारखेच डॉक्टरची मानहानी करणे हे नियमित घडत असते. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कोणीही खंबीर भूमिका घेत नाही. डॉक्टर सॉफ्ट टार्गेट ठरतात, असे निरीक्षण आपल्या अभ्यासातून डॉक्टर कोतकुंडे यानी नोंदले.
जागतिकीकरणात, बाजार आधारित अर्थव्यवस्थेत इतर व्यवसायांसारखेच वैद्यकीय व्यवसायात व वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेत काही अनिष्ट प्रकार सुरू झाले आहेत, यात दुमत नाही. पण यासाठी फक्त आरोग्य रक्षकाला वेठीस धरून काहीच साध्य होणार नाही.
शासनाची सातत्याने बदलती धोरणे व आरोग्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा विचार न करता विकासाच्या नावाखाली आणलेले प्रकल्प हेही आरोग्याच्या मुळावरच उठले आहेत. ग्रामीण गरजांचा विचार न करता आणलेल्या नियमांमुळे छोट्या ठिकाणी असलेल्या प्रामाणिक डॉक्टरांना व्यवसाय करणे कठीण होत चालले आहे.
चौकट
उत्तम पगार तरी नोकरी नको
गेल्या तीन ते चार दशकात आरोग्यासाठी आर्थिक तरतूद कमी होते आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा मेटाकुटीस आली आहे. अपुरी संसाधने, निकृष्ट व अपुरा औषधसाठा, राजकीय दबावात वेळोवेळी वेठीस धरल्यामुळे डॉक्टर, नर्स उत्तम पगार असूनही शासकीय सेवेत काम करू इच्छित नाहीत. शासकीय आरोग्य यंत्रणेतील मरगळ व अनास्थेमुळे कर्मचारी जोखीम उचलण्यास तयार नसतात, अशी आजच्या शासकीय आरोग्य यंत्रणेची स्थिती असल्याकडे डॉ. कोतकुंडे यांनी लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.