अलिबाग - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला सोने, मालमत्ता आणि वाहन खरेदीला प्राधान्य दिले जाते. मात्र, यंदा रायगडकर याला अपवाद ठरला आहे. कारण जिल्ह्यात सोने खरेदीबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांना अधिक प्राधान्य देण्यात आले असून दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच प्रदूषणावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक वाहनांच्या खरेदीचा शुभमुहूर्त साधला आहे.
महाड, रोहा, खोपोली, पेण, अलिबाग येथे इलेक्ट्रीक वाहनविक्रीला सध्या चांगली पसंती मिळत आहे. शंभरी पार झालेल्या पेट्रोलमुळे दुचाकी वाहन चालकांच्या खिशावर चांगलाच भुर्दंड पडत आहेत. भविष्यात पेट्रोल दर कमी होणार नाहीत, याची खात्री पटलेल्या ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक शोरूममध्ये गर्दी वाढत आहे. दसरा सणाच्या खरेदीसाठी रविवार सायंकाळी येथील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रस्त्यावरच विक्रीस बसलेल्या फूलविक्रेत्या महिलांमुळे कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी बाजारपेठांमध्ये वाहतुकीचे नियोजन केले आहे.
फुलांची आवक वाढली
दहा दिवसांपूर्वी १६० ते २०० रुपये प्रतिकिलो असलेल्या फुलांच्या किमती सरासरी ६० रुपयांपर्यंत आल्या आहेत. दसऱ्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे कोल्हापूर, पुणे, साताऱ्यातील व्यापारी जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये दाखल झाले आहेत. रस्त्याच्या बाजूला ढिगारे ओतून ही फुले विकली जात आहेत. आवक अचानक वाढल्याने किमती खाली आल्या आहेत. अलिबागमध्ये प्रतिकिलोमागे झेंडूची फुले ४० रुपये, तर शेवंतीची फुले ७० रुपयांनी विकली जात आहेत.
तयार घरांना पसंती
नेरळ, कर्जत, खालापूर, अलिबाग येथील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये कमी किमतीतील परवडणाऱ्या घरांना नवी मुंबई, मुंबईतील ग्राहकांकडून अधिक पसंती दिली जात आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर नोंदणी करण्याचा या ग्राहकांचा प्रयत्न आहे. यासाठी येथील विकसकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या सवलती दिल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील लहान घरांपेक्षा येथे प्रशस्त आणि हवेशीर घरे सर्वसामान्यांच्या आवाक्यातील झाली आहेत.
पेट्रोलच्या १०६ रुपयांच्या तुलनेत १७ रुपये ग्राहकांना परवडत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. शासनानेही आता इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवण्यास परवानगी दिली आहे. पर्यावरणपूरक, प्रदूषणविरहित आणि चार्जिंग करून चालणाऱ्या इलेक्ट्रिक बाईकमुळे पैशांची बचत होते.
- आर्यन वेंगुर्लेकर, ग्राहक
दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीची पद्धत कमी होत चालली आहे. कर्जत, खालापूर या परिसरात प्रकल्प आहेत. यंदा बांधकाम साहित्य, वाढलेल्या मजुरी खर्चामुळे तयार घराच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे.
- प्रसाद जोग, जोग इन्फ्रास्ट्रक्चर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.