the existence of bherali mud dangerous in sindhudurg kokan marathi news 
कोकण

सिंधुदुर्गात भेरली माडचे अस्तित्व धोक्‍यात...

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : भेरली माड अर्थात सुरमाडाच्या पानांची बेसुमार कत्तल होत असल्याने या वृक्षाचे सिंधुदुर्गात अस्तित्व धोक्‍यात आले आहे. सुशोभिकरणासाठी या वृक्षाची कोवळी पाने तोडली जात आहेत. या प्रकाराकडे वनविभागाने लक्ष द्यावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. धामापूर तलावाच्या सर्वेक्षण करणाऱ्या अभ्यास गटातील तज्ञ व्यक्ती व स्थानिक लोकांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आले की, काही परराज्यातील लोक हे भेरली माडाची कोवळी पाने बेकायदेशीर तोडून त्याचा राजरोसपणे व्यापार करताहेत.स्थानिकांनी या भेरले माडाच्या पानांचे भारे वनखात्याच्या अधिकाऱ्यांस बोलावून त्याच्या निदर्शनास आणून दिले.

कोवळ्या पानांचीच तोड बेसूमारपणे व्यापारी तत्वावर राजरोसपणे होत राहिल्यास या वृक्षाच्या वाढीवर परीणाम होऊन तो फुला-फळांनी बहरणार नाही व पर्यायाने या वृक्षाच्या अस्तित्वात धोका पोहोचेल अशी स्थिती पूर्ण सिंधुदुर्गात आहे. निसर्गाच्या संपन्नतेला ओरबाडून होत असलेला व्यापार हा पर्यावरणास व पर्यायाने मानवी जीवनास घातक असल्याचे मत अभ्यासगटातील तज्ञांनी मांडले आहे.चुनखडजन्य खडकाळ जंगल भागात साधारणपणे 300 ते 1500 मीटर उंचीच्या वनक्षेत्रात भेरली माड हा वृक्ष आढळतो. हे वृक्ष पाम प्रकारातील असून त्याला इंग्रजीत फिशटेल पाम किंवा ज्यागरी पाम असे संबोधले जाते. हा सदाहरित वृक्ष प्रणालीत असून साधरणतः 20 मीटर उंच वाढतो.

भेरली माडचा आहारात होणारा वापर

सुरमाड, भेरली माड, बिरलो माड या नावाने परिचित वृक्षाला संस्कृतमध्ये श्रीताल असे संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव कॅरिओटा उरेन्स लीन असे असून हा आरकेसी या कुळातील असून समुद्रिय पट्टा ते सह्याद्रीची डोगररांग व पठारावर सर्वसाधारणपाने आढळून येतो. याचे खोड सरळ असून खोडावरील पानांची रचना अतिशय सुबक आणि वक्राकार पध्दतीची असते. पानांची लांबी साधारणतः 6 मीटर असते. या वृक्षाची लागवड उद्यानामध्ये केलीच जाते. त्याचबरोबर या वृक्षाच्या पुष्प संभाराच्या देठातून येणारा चीक साखर व मद्यार्क निर्मिती करिता वापर केला जातो. फुलांच्या रसापासून गूळ बनवला जातो. हॉर्नबील(धनेश), एशियन पाम सिव्हेट(कांड्याचोर) या सारख्या पशू-पक्षांचे याची पिकलेली फळे हे आवडते खाद्य आहे.


आजारामध्ये उपाय

याच्या बियाच्या पिठापासून बनविलेली लापशी ग्यास्ट्रिक अल्सर, अर्धशिशी, सापाचे विष उतरविण्यासाठी आणि संधीवताने येणारी सूज कमी करण्यासाठी वापर केला जातो. याच्या मुळाचा वापर दात व हिरड्यांच्या आजारामध्ये केला जातो. याची साल व बिया मूळव्याधीमध्ये वापरली जाते. याच्या फुलांच्या कळ्या केसांच्या वाढीमध्ये उपयुक्त आहेत. या व्यतिरिक्त याच्या पानांच्या देठा पासून मिळवलेल्या तंतूंतून दोरखंड तयार केले जातात. त्याचबरोबर पानांपासून झाडू, बास्केट बनविल्या जातात. खोडाच्या बाहेरील भागाचा वापर पारंपरिक बांधकामक्षेत्रात देखील केला जात असल्याबाबतची माहिती लोक सांगतात. 


प्राणी व पक्षांचे खाद्य संपुष्टात
या पाम प्रकारातील वृक्षाच्या पिकलेल्या फळांवर कित्येक प्राणी व पक्षी आपली उपजिविका करतात. वादळ वाऱ्यापासून संरक्षण करण्यामध्ये या वृक्षाचे महत्वपूर्ण योगदान असल्यामुळे हे वृक्ष वाडी वस्तीवर, घरांशेजारी आढळून येतात. इतके महत्त्व असताना देखील गेल्या कित्येक वर्षांपासून परप्रांतीय लोक या भागातील राखीव संरक्षित जंगलांमधून व खाजगी जंगलांमधून या वृक्षांच्या कमी उंचीच्या कोवळ्या वृक्षाची पाने बेसुमार पद्धत्तीने तोड करत आहेत. हजारो पाने एकत्र भाऱ्यामध्ये बांधून खाजगी बसने वाहतूक करून मुंबई सारख्या शहरांमध्ये पुष्पगुच्छ व समारंभात सुशोभीकरणाकरिता पाठवतात.

याबाबत अजूनही कारवाई नाही

राजरोसपणे बेसुमार, कत्तल व वाहतूक चालू असतानाही आजपर्यंत वन खात्याने लक्ष दिलेले नाही. याबाबतची सविस्तर माहिती राज्य शासनाच्या वनविभागाचे प्रधान मुख्य सचिव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली तरी सिंधुदुर्ग वनखात्याने याची दखल घेतली नाही. बांदयापासून ते सिंधुदुर्गच्या हद्दी पर्यंत मुंबई गोवा हायवेवर ठिक ठिकाणी या वनस्पतीचे भारे बांधून हे बाहेरील लोक गोव्यावरून येणाऱ्या खाजगी बसची वाट पाहताना निर्दशनास दिसून येतात. हे सर्व अनधिकृतपणे चालू असताना वनखात्याने याबाबत कारवाई केल्याचे अद्यापतरी निदर्शनास आलेले नाही.

हे असेच चालू राहिल्यास भेरली माड या वृक्षाची वाढ खुंटेल व पर्यायाने तो फुला फळांवर न आल्यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेले पक्षी व प्राणी यांचे जीवन धोक्‍यात येईल आणि अशा प्रकारे अन्न साखळीत एक जरी दुवा निखळला तरी त्याचे दुष्परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होईल याची दखल घेऊन या वृक्षांच्या पानांची होत असलेली बेकायदेशीर तोड, वाहतूक व व्यापार थांबवण्यासाठी वन खात्याने त्वरित कार्यवाही करावी असा आवाज स्थानिक जनतेतून उमटत आहे. 

हेही वाचा- याठिकाणी आले गवा आणि मगरींवर मुर्त्यूचे संकट....

काळसे परिसरात तोडीला मज्जाव 
रायनो बीटल (गेंडा भूंगा) नावाचा भूंगा भेरली माडाची कोवळी पाने खाऊन आपली गुजराण करतो. याच भूंग्याचा नारळाच्या कोवळ्या पानावर मोठ्या प्रमाणावर प्रदुर्भाव दिसतो याचे महत्वाचे कारण म्हणजे भेरली माडाची कोवळी पाने मिळत नसल्यामुळे या भूंग्यानी नारळाकडे मोर्चा वळवला आहे. हे लक्षात आल्याने काळसे, पेंडूर व हूबळीचा माळ या परिसरातील ग्रामस्थांनी भेरली माडाची पाने काढणाऱ्या मजूरांना या भागात येण्यास मज्जाव केलाय. 

असे होते पुनरूज्जीवन
भेरले माडचे वैशिष्ट्‌य असे की, त्याच्या खोडावर पिकलेल्या फळांचे घोस आसतात व त्यामध्ये हजारोंच्या संख्येने फळे असतात. पिकून गळून पडलेली फळे या वृक्षाच्या बुंध्याखाली पडलेली असली तरी त्यामधून क्वचित प्रसंगी वृक्ष निर्मिती होते. पण या वृक्षाचा प्रसार प्राणी आणि पक्षी यांच्या मार्फत योग्य प्रकारे होतो. अशा पध्दतीने या वृक्षाचे निसर्गतः पुनरुज्जीवन होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT