या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Ratnagiri News : वाढदिवसाचा बॅनर काढल्याच्या रागातून मिरजोळेत शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन गटांत राडा झाल्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. यावेळी जमावाने माजी सरपंच संदीप ऊर्फ बावा नाचणकर व बंधूंना मारहाण केली.
यावेळी एकाने चॉपरने नाचणकर यांच्या डोक्यात वार केला. रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी (Ratnagiri) शहरानजीक असलेल्या मिरजोळे गावात शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटामध्येच दोन गट पडले आहेत.
पाटीलवाडी येथील तरुणांनी मुख्य रस्त्यावर वाढदिवसाचा बॅनर लावला होता. तो बॅनर संदीप नाचणकर यांनी मंगळवारी सायंकाळी काढला. त्यावरून वाद झाला होता; परंतु चर्चेनंतर तो वाद संपुष्टात आला. काल (ता. २३) रात्री आठच्या सुमारास काही तरुणांनी संदीप नाचणकर यांना एमआयडीसी मजगाव रोड येथील मुख्य रस्त्यावर बोलावले. बॅनर काढण्यावरून पुन्हा त्यांच्याशी वाद घातला.
याचवेळी पाटीलवाडीतून मोठा जमाव संदीप नाचणकर यांच्या दिशेने आला. यावेळी संदीप नाचणकर यांचे बंधूही त्यांना पाहण्यासाठी तेथे आले होते. चर्चा सुरू असतानाच जमावातील एकाने नाचणकर यांच्यावर हल्ला करा, असे सांगितल्यावर जमावाने त्यांना मारहाण केली. यावेळी एकाने धारदार चॉपरने संदीप नाचणकर यांच्या डोक्यात वार करत त्यांना जखमी केले.
त्यांच्या बंधूंनाही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर जमाव पांगला. स्थानिकांनी संदीप नाचणकर यांना जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. ही घटना स्नेहल मेडिकलजवळ-जांभूळ फाटा येथे घडली. या प्रकरणी संदीप कृष्णा नाचणकर (वय ४५, रा. मिरजोळे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीवरून संशयित रत्नदीप पाटील, अभी पाटील, वैभव पाटील, हर्षराज पाटील व इतर ३० ते ४० जणांवर मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणप्रकरणी हर्षराज सुभाष पाटील (वय ३७, रा. मिरजोळे-पाटीलवाडी, रत्नागिरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यात म्हटले आहे की, आम्ही लावलेला खासगी बॅनर संशयितांनी फाडून नुकसान केले. याचा राग मनात धरून संशयित संदीप ऊर्फ बावा नाचणकर, योगेश भोसले, भाया कदम, नाना नाचणकर, प्रणय पावसकर व इतर दोन यांनी जमाव करून मारहाण केली.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत. दरम्यान, बॅनरवरून राडा झाला असला, तरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून हा वाद उफाळून आल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.