सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोल्हापूर वनविभागाने राबवलेला "वन अमृत प्रकल्प" आता सिंधुदुर्ग वनविभागही राबवणार आहे. येथील जंगलात मिळणारी साधन संपत्ती विशिष्ट प्रक्रियेद्वारे वनविभाग "वन अमृत ब्रॅंड' खाली संपूर्ण राज्यात पोचणार आहे. यातून जंगल भागातील गाव, वाडीवस्तीत राहणाऱ्या महिला बचत गटांच्या हाताला काम मिळणार आहे. महीलांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच वनसंवर्धन करण्याचा वनविभागाचा यामागे प्रमुख उद्देश आहे.
जिल्ह्यातील सहा गावातील तब्बल 900 कुटुंबांना यातून रोजगार उपलब्ध होणार आहे. फेब्रुवारीपासून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात येणार असून पुढील दीड वर्षांत पूर्ण क्षमतेने प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती पाच जिल्ह्यांचे प्रकल्प प्रमुख डॉ. योगेश फोंडे यांनी दिली.
जिल्ह्याला मोठी साधन संपत्ती लाभली आहे. येथील जंगल खोऱ्यात विविध प्रकारची फळे आढळून येतात. आजही या फळांना मोठी मागणी आहे; मात्र योग्य बाजारपेठ उपलब्ध नसल्याने ही फळे, साधन संपत्ती लोकांपर्यंत पोहोचत नाही. जंगलात मिळणाऱ्या फळांमध्ये असणारा औषधी गुणधर्म ओळखता येथील महिला बचत गटांना शाश्वत रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी नजीकच्या कोल्हापूर जिल्ह्यात 2018 पासून यशस्वीरित्या सुरू असलेला हा प्रकल्प महाराष्ट्र वन विभाग संपूर्ण राज्यात राबवित आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रकल्पप्रमुख डॉ. फोंडे यांच्याकडे आहे. पायलेट प्रोजेक्ट म्हणून गेल्यावर्षी जूनमध्ये दुर्मिळ होत चाललेल्या तब्बल 40 ते 45 भाताच्या बियाण्यांवर आंबोली-चौकुळ या गावात चिखलवाड-बेरडकी येथे बेरड समाजातील लोकांकडून प्रयोग करण्यात आले.
यामध्ये ज्या भागात बियाणांमधून जास्त उत्पन्न मिळाले, अशा सहा प्रकारच्या भात बियाण्यांची निवड "वन अमृत ब्रॅंड'साठी करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये येथील जंगलात मिळणारा हिरडा, आवळा, बेरडा या फळांवर प्रक्रिया करून पॅकेजिंगद्वारे त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यात येणार आहे. यातून मिळणारा फायदा हा 90 टक्के बचतगटांना येणार आहे तर 10 टक्के वनविभाग ठेवणार आहे. यामध्ये आवळ्यापासून लोणचे, आवळा कॅन्डी, हिरड्यापासून चूर्ण आदी प्रोडक्ट बनविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सहा गावांमध्ये प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून चौकुळ हे मुख्य प्रक्रिया केंद्र असणार आहे.
यासाठी आवश्यक मशनरीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सावंतवाडीमधील चौकुळ, तांबोळी, दोडामार्गमधील हेवाळे, वेगुर्लेमधील मठ, कुडाळमधील नारूर, कणकवलीमधील दिगवळे या गावांचा समावेश केला आहे. एका गावातून 15 बचतगट असे जवळपास 90 महिलाबचत गटांची निवड या प्रकल्पासाठी केली आहे. एका बचत गटामध्ये 10 महिलांचा समावेश असून 900 कुटुंबीयांना यातून रोजगार मिळणार आहे. जंगल भागात राहणाऱ्या गावातील महिला बचत गटांचा यामध्ये समावेश असून या बचत गटातील महिलांनी जंगलात मिळणारे आंबा, कोकम, करवंदे, हिरडा, बेरडा, शिकेकाई, चारोळी, जांभूळ आदी प्रकारची फळे गोळा करून आणून त्यावर प्रक्रिया करायची आहे.
प्रक्रिया झाल्यानंतर पॅकेजिंग करून वनविभागाकडे सोपवायची आहेत. वनविभाग या प्रक्रिया मालाची विक्री करणार आहे. 14 फेब्रुवारीपासून महिला बचतगटांना यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी राज्याची उमेद अभियान काम करणार आहे. कुठल्या फळावर कोणती प्रक्रिया केली जाणार हे उमेदचे अधिकारी-कर्मचारी शिकवणार आहेत. याठिकाणी तयार करण्यात येणारा प्रॉडक्ट भविष्यात मोठ्या शहरातील मॉलमध्ये तसेच डी-मार्टला टाईप करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील साधनसंपत्तीला असलेले मागणी आपसूकच लोकांपर्यंत पोहोचणार आहे. हे सगळे प्रोडक्ट वनअमृत सिंधुदुर्ग या नावाखाली विकले जाणार आहे.
वनअमृतहर्बल प्रॉडक्ट
जिल्ह्यातील जंगलात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या फळांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. हे गुणधर्म ओळखून वन अमृत हर्बल प्रोडक्टसुद्धा भविष्यात बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. यामध्ये आंबा पावडर, जांभूळ पावडर, फणस पावडर, आवळा पावडर आदी प्रॉडक्ट तयार करण्यात येणार आहे.
भात बियाण्यांचीही होणार विक्री
कोकणात सुरुवातीला सर्रास वापरले जाणारी भात बियाणे आता दुर्लक्षित केली जात आहेत. सद्यस्थितीत ही भात बियाणे येथील शेतकऱ्यांकडे मिळणार नाहीत; मात्र वनविभागाकडून पायलट प्रोजेक्ट म्हणून याठिकाणी जास्त उत्पन्न येणारी भात बियाणे वन अमृत ब्रांड खाली निवडण्यात आली आहेत. तब्बल 40 प्रकारच्या भात बियाण्यावर प्रयोग केल्यानंतर सहा जातीची भात बियाणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये तांबडी तायचुन, काळाजिरा, मनीभोग, चिमनसाय, लक्ष्मी, सोरटी या भात बियाणांची समावेश आहे.
"वन अमृत' प्रकल्पामुळे आपोआपच जंगलाचे संरक्षण होणार आहे. शिवाय जंगलात मिळणाऱ्या साधन संपत्तीचा वापर करून रोजगार उपलब्ध होत असल्याने रोजगाराचे साधन म्हणून फळ-झाडांची लागवड करण्यासाठी माणसे पुढे येणार आहेत आणि माणसं मनाचं जीवन जगणार आहे. वनविभागाचा हाच यामागचा उद्देश आहे.
- डॉ. योगेश फोंडे, प्रकल्प प्रमुख
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.