चिपळूण - शहरातील शिवनदी लगत एक चहाच्या दुकानाचे सोमवारी आमदारांच्या हस्ते उद्घाटन झाले. आज दुसर्या दिवशी पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पोलिस बंदोबस्तात हे दुकान तोडण्यासाठी गेले. कारवाई होऊ नये म्हणून दुकानमालक दुकानाच्या पत्र्यावर चढला. इथून आत्महत्या करतो असे सांगत त्याने पोलिस व पालिकेच्या कर्मचार्याना धमकावले. काही काळ गोंधळ उडाल्याने पालिकेची तेथील कारवाई थांबली. नंतर भोगाळेसह इतर भागातील अतिक्रमण तोडण्यास सुरवात झाली. त्यानंतरही कारवाईच्या भितीने दुकानमालक पत्र्यावरून खाली उतरला नाही.
माजी नगरसेवक रमेश खळे शिवनदीलगत हातगाडीवर वडापाव विक्रीचा व्यवसाय करायचे. त्याठिकाणी त्यांनी पत्र्याची कायमस्वरूपी शेड टाकून चहाच्या व्यवसायाला सुरवात केली होती. आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आदींच्या उपस्थितीत नव्या व्यवसायाचे सोमवारी उद्घाटन झाले. त्यानंतर दुसर्याच दिवशी पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी गेल्यामुळे खळे यांनी आक्रमक भूमिका घेत दुकानाच्या पत्र्यावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला. शहराला वीज पुरवठा करणारी 33 केव्हीची वाहिनी जवळून जात असल्यामुळे प्रशासन घाबरले. महावितरणशी संपर्क साधून तत्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला. वीज पुरवठा बंद झाल्याने व्यापार्यांची गैरसोय झाली. त्यामुळे अर्ध्या तासाने पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. पोलिस आणि पालिका कर्मचार्याना खळे यांनी आव्हान दिल्यामुळे प्रशासन हतबल झाले. नगरसेवक आशिष खातू, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे आदींनी खळे यांना पत्र्यावरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र त्यांनी कोणाचेच ऐकले नाही. मेलो तरी चालेल पण खाली उतरणार नाही. या भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शिवनदी पुलावरील कारवाई थांबवून भोगाळे परिसरात कारवाई सुरू केली. त्यानंतरही खळे दुकानाच्या पत्र्यावर उशिरापर्यंत उभे होते. खळे यांनी पोलिस आणि पालिकेला एकप्रकारे आव्हान दिल्यामुळे प्रशासन त्यांच्या विरोधात कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचा लक्ष लागले आहे.
मी ज्या जागेत व्यवसाय सुरू केला आहे ती खासगी मालकीची जागा आहे. मी जागा मालकाला त्याचे भाडे देतो. तरीही मला टार्गेट केले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत ती न तोडता माझ्याच स्टॉलवर जाणीवपूर्वक कारवाईचा प्रयत्न झाला. त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा पाऊल उचलला.
-रमेश खळे, व्यवसायिक
खळे यांनी शिवनदीच्या संरक्षण कठड्यावरच पत्र्याचे कायमस्वरूपी पक्के बांधकाम करून दुकान सुरू केले आहे. शिवनदी लगतची जागा ग्रीनबेल्डमध्ये आहे. त्यांनी हातगाडीवर पडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला त्याकडे पालिकेने दुलर्क्ष केले. आता त्यांनी पक्के बांधकाम केले आहे. त्यांना सवलत दिली तर शहरात अनधिकृत बांधकाम फोफावतील. म्हणून कारवाईसाठी गेलो.
-प्रमोद ठसाले, प्रशासकीय अधिकारी
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.