‘‘निवडणुका जवळ आल्या की केसरकरांना रोजगार दिसतो. आज इथल्या तरुणांना जर्मनीत नोकऱ्या देणार असल्याचे नवीन आमिष त्यांनी आणले आहे.''
सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना शिक्षण खाते कळालेच नाही; कदाचित यामुळेच त्यांनी राबविलेल्या उपक्रमाची नोंद गिनिज बुक रेकॉर्डमध्ये (Guinness Book of Records) घेतली असावी. त्यांनी माझ्या पक्षाकडे माझी तक्रार करावीच; परंतु केसरकरांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे करणार असल्याचे प्रत्युत्तर माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिले.
केसरकर यांनी तेली यांची भाजपमधून (BJP) हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याची टीका काल (ता. ७) केली होती. याला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेली यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘केसरकर यांनी माझी पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी भाजप नेत्यांकडे करणार असल्याचे वक्तव्य केले. मुळात मी कुठलीही पातळी सोडून केसरकर यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. संच मान्यतेच्या नवीन निकषानुसार मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, डीएड, बीएडधारक यांच्यावर होणाऱ्या अन्यायसंदर्भात मी बोललो.
हा निकष शिक्षण खात्यानेच काढला असून शिक्षण मंत्री केसरकरच याला जबाबदार असल्याने मी केसरकर यांना शिक्षण खाते कळाले नाही, असे म्हणालो. यामध्ये वैयक्तिक पातळी सोडून कुठलेही टीका झालेली नाही. त्यामुळे त्यांनी खुशाल माझ्या हकालपट्टीची मागणी करावी. उलट मीच त्यांना शिक्षण खाते समजत नसल्याने मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदेंकडे करणार आहे. केसरकर यांनी ज्या ज्यावेळी माझी तक्रार पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे.
त्यावेळी मला पक्षात चांगल्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केसरकर यांनी पुन्हा एकदा माझी तक्रार करावी.’’ ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातील शिक्षण संस्था टिकल्या पाहिजेत ही माझी अपेक्षा आहे. येथील मुलांवर होणारा अन्याय, शिक्षकांवर आलेल्या अडचणी याबाबत मी बोललो यात गैर कुठे, तुम्ही राज्याचे शिक्षण मंत्री आहात; त्यामुळे आम्ही तुमच्याकडे नाही तर कोणाकडे अपेक्षा करणार, त्यामुळे भविष्यातही मी यावर बोलत राहणार.’’
श्री. तेली पुढे म्हणाले, ‘‘युती धर्म मी सुद्धा पाळतो, म्हणूनच गप्प आहे. मला तिकीट मिळावे, असे मी कधीच बोललो नाही. भाजप पक्षाला तिकीट द्या, अशी माझी मागणी आहे. परंतु तुमच्यासारखे खोटे मला बोलता येत नाही, हीच माझी मोठी अडचण आहे. त्यामुळे मला बोलायला भाग पाडू नका. माझे तोंड उघडले तर तुम्हाला खूपच अडचणीच होईल हे लक्षात ठेवा.’’
ते म्हणाले, ‘‘निवडणुका जवळ आल्या की केसरकरांना रोजगार दिसतो. आज इथल्या तरुणांना जर्मनीत नोकऱ्या देणार असल्याचे नवीन आमिष त्यांनी आणले आहे. मात्र, याआधी त्यांनी येथील जनतेला चष्मा कारखाना, सेटअप बॉक्स, अम्युझमेंट पार्क आदी आश्वासनाचे काय झाले, याचे उत्तर द्यावे. जर्मनीला नोकऱ्या देण्यापेक्षा इथल्या रोजगारावर केसरकर यांनी बोलावे. त्यामुळे जनतेने आता तरी डोळे उघडावे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये केसरकारांना हद्दपार करण्यासाठी कोणालाही आमदार करा. परंतु, केसरकर चौथ्यांदा आमदार होऊ नये, यासाठी ठाम रहा. त्यांना पुन्हा निवडून दिल्यास हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत अजून मागे जाईल.’’
आजगाव, धाकोरे यासह नऊ गावांमध्ये मायनिंग प्रकल्प होऊ घातला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता या ठिकाणी हा प्रकल्प लादला जात असल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. मी सत्ताधारी पक्षात असलो तरी मी जनतेच्याच बाजूने राहणार आहे. प्रकल्पाला असलेला विरोध पाहता तो होऊ नये यासाठीही मी वरिष्ठांचे लक्ष वेधणार आहे, असेही श्री. तेली म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.