बांदा (सिंधुदुर्ग) : नामांकित विमान कंपनीत हवाई सुंदरीची नोकरी मिळवून देतो, असे सांगून येथील युवतीची व तिच्या कुटुंबीयांची साडेपाच लाखांची फसवणूक करणाऱ्या नाशिक येथील दांपत्याला सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर यांनी धडा शिकविला.
अत्यंत सावधगिरीने सापळा रचून भामट्यांकडून संपूर्ण रक्कम तत्काळ बॅंक खात्यात जमा करून घेतली. संबंधित युवतीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार देण्यास असमर्थता दाखविल्याने पोलिसांत याबाबत फिर्याद दाखल करण्यात आलेली नाही. अधिक माहिती अशी, की कुडाळ तालुक्यातील दांपत्य मुलीसह बांद्यात राहते. मुलीने हवाई सुंदरीचा दोन वर्षांपूर्वी कोर्स पूर्ण केला आहे. तिच्या चुलत मामाच्या ओळखीतून नाशिक येथील भामट्या पती-पत्नीने मुलीच्या आई-वडिलांना बांद्यात गाठले. विमान उड्डाण खात्यात आपल्या ओळखीचे वरिष्ठ अधिकारी असून, मुलीला हवाई सुंदरीची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी तब्बल साडेपाच लाखांची मागणीही केली.
मुलीचे करिअर होईल, या आशेने वडिलांनी संपूर्ण आयुष्याची पुंजी त्यांच्या हवाली केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी मुलीच्या वडिलांनी त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. मात्र, दोन वर्षांपासून वारंवार चौकशी करूनही रणदिवे नामक दांपत्य केवळ आश्वासनेच देत होते. त्यानंतर पुरते फसलो गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. वेंगुर्ले येथील चुलत मामाच्या ही बाब कानावर घातली. त्यांच्या फोनलाही ते भामटे दांपत्य दाद देत नव्हते. अखेर त्यांनी सरपंच खान यांच्याकडे कैफियत मांडली.
सरपंच खान व ग्रामपंचायत सदस्य तोरसकर यांनी पत्रकारांच्या सहाय्याने हुशारीने बांद्यात सापळा रचला. भामट्या दांपत्याची बोगस गुंतवणूक कंपनी असल्याचे कळताच येथे त्यांना बोलावण्यात आले. या वेळी पत्रकारांना गुंतवणूकदार म्हणून सादर केले. त्यांनी कंपनीची माहिती देत तब्बल १८ टक्के परताव्याची हमी दिली. केवळ करारपत्र करून तीन वर्षांनंतर व्याजासह रक्कम परत देण्याचे मान्य केले. या वेळी दांपत्य भामटे असल्याचे पत्रकारांच्याही तत्काळ लक्षात आले.
हेही वाचा - जिल्हा परिषद सदस्यापेक्षा ग्रामपंचायतच बरी
..अन् धाबे दणाणले
संबंधित युवती आई-वडिलांसह त्याठिकाणी हजर होताच भामट्यांचे धाबे दणाणले. बांद्यात इंगा दाखविताच त्यांनी तातडीने सर्व रक्कम देण्याचे मान्य केले. काही तासांतच संबंधित युवतीच्या बॅंक खात्यात रक्कमही जमा केली. मात्र, संबंधित युवतीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार देण्यास असमर्थता दाखविल्याने याची नोंद पोलिसांत झाली नाही. गेली दोन वर्षे तगादा लावूनही रक्कम मिळत नसताना अक्रम खान व मकरंद तोरसकर यांच्या प्रयत्नाने रक्कम मिळाल्याने त्यांनी आभार मानले.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.