पेण : कोकणातील महत्त्वाचा समजला जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी या वर्षी कोकण रेल्वेने तब्बल २४८ गणपती विशेष गाड्या सोडल्या आहेत. मात्र गणेशमूर्तींचे माहेरघर आणि रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या पेणमध्ये गाड्यांना थांबा मिळत नसल्याने प्रवासी वर्गात नाराजी होती.
कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या पेण रेल्वे स्थानकात थांबवाव्यात, अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून करण्यात आल्याने एक एक्स्प्रेस आणि दोन मेमू गाड्यांना पेणमध्ये थांबा दिल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या विशेष रेल्वेच्या गाड्यांना पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ याठिकाणी थांबे आहेत, मात्र ज्या पेणमधून गणपती बाप्पांचे भक्तांच्या घरी आगमन होते, त्या स्थानकाला कायम डावलल्या गेले आहे.
पेण शहर रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे गणेशमूर्ती तयार करण्याचे लहान-मोठे शेकडो कारखाने आहेत. गणेशोत्सवात तालुक्यात कोट्यवधींची उलाढाल होते तर लाखो गणेशमूर्ती देशासह जगभरात पाठवल्या जातात.
ताजी भाजी, ओली-सुकी मासळी, पेणचे पापड, पोहे, लोणची, कलात्मक वस्तू तसेच वाढत्या औद्योगीकरणामुळे पेणला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पेणवरून असंख्य नोकरवर्ग, विद्यार्थी पनवेल, नवी मुंबई, मुंबईत दररोज प्रवास करतात.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने जवळपास २४८ विशेष गाड्या सोडल्या आहेत, यातील सीएसएमटी ते सावंतवाडी एक्स्प्रेस, दिवा ते रत्नागिरी मेमू, दिवा ते चिपळूण मेमू या तीन गाड्या गुरुवार (ता.१४) ते ३ ऑक्टोबरपर्यंत थांबवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
पेण रेल्वे स्थानकात एक एक्स्प्रेस व दोन मेमू थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक्स्प्रेससाठी प्रवाशांना वर्गाला आरक्षण करून घेणे गरजेचे आहे. पेण रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर अनेकजण दुचाकी उभ्या करीत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. वाहनधारकांनी आपली वाहने व्यवस्थित लावावी जेणेकरून ये-जा करताना प्रवाशांना त्रास होणार नाही.
- बी.एस. मीना, स्थानक प्रबंधक, पेण
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.