पावस - रत्नागिरी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या पावस ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सेना पॅनेलचे दोन सदस्यांसमोर कोणी उमेदवार उभा न राहिल्याने बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 11 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येकाला निवडणूक चिन्ह प्राप्त झाल्याने वाडीमध्ये प्रचाराला सुरवात झाली आहे. निवडणूक चिन्ह प्राप्त झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी पावस येथील नवलादेवी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली.
पावस ग्रामपंचायत निवडणुकीत 13 जागांसाठी निवडणूक लढवली जाणार होती. त्यात दोन जागा बिनविरोध झाल्याने 11 जागांसाठी निवडणूक लढवली जाणार आहे. गावामध्ये तंटामुक्तीच्या माध्यमातून कोणतेही प्रयत्न न झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते सेनेत गेल्याने सध्यातरी सेनेच्या पॅनेलचे वर्चस्व गावामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे प्रथमच सेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे आहेत. यातील दोन प्रभागात भाजपाने उमेदवार न दिल्याने दोन अपक्ष उमेदवारांना थेट सेना उमेदवाराशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मूळचे शिवसैनिक असलेले अपक्ष उमेदवार यांना पक्षाने तिकीट न दिल्याने आपली ताकद आजमावण्याची संधी मिळणार आहे. या उमेदवारांसमोर एका प्रभागात माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य रिंगणात आहेत.
दुसऱ्या प्रभागात माजी सरपंच यांच्या पतीला सेनेतर्फे उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नव्या-जुन्याचा मेळ कसा बसतो, यावर सगळं अवलंबून आहे. प्रभाग 1 मध्ये तीन जागांपैकी एक महिला ओपनमधील सौ. सामंत बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दोन जागांसाठी निवडणूक होणार असून त्यात भाजपाच्या सौ. साळुंखेविरुद्ध सेनेच्या सौ. गुरव यांच्यात सामना आहे. सेनेचे माजी सरपंच श्री. पावसकर यांचा सामना युवा सेनेचे संचित विलणकर यांच्याशी होणार आहे. प्रभाग 2 मध्ये एक जागा बिनविरोध झाल्याने एका जागेसाठी सेनेचे मनीष भाटकर यांचा सामना अपक्ष उमेदवार चिंतामण पावसकर यांच्याशी होणार आहे. प्रभाग तीनमध्ये दोन जागांसाठी भाजपाचे संतोष सुर्वे व सौ. वर्वडकर, सेनेतर्फे फजल सावकार, सौ. नाखवा व अपक्ष उमेदवार उत्तम लांजेकर यांच्यात सामना होणार आहे. प्रभाग चारमध्ये तीन जागांसाठी निवडणूक होणार असून भाजपातर्फे अजय पांगले, शारदा चव्हाण, अर्चना आखाडे, तर सेनेतर्फे हेमंत खातू, मनीषा शिंदे, सरिता चव्हाण यांच्यात कॉंटे की टक्कर आहे. प्रभाग पाचमध्ये भाजपातर्फे कृष्णा नैकर, विक्रम भरणकर, शिवानी आगरे तर सेनेतर्फे प्रवीण शिंदे, दत्तात्रय बाणे, सौ. नार्वेकर यांच्यात सामना होईल. चिन्ह प्राप्त झाल्याने प्रचाराला सुरवात झाली असल्याने निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे.
हे पण वाचा - पैशाशिवाय निवडणूक नाही, यंदा मात्र खर्च वाचला
पावस जिल्हा परिषद गटातील पाच ग्रामपंचायत निवडणुकीत चिन्हांचे वाटप झाल्यानंतर भाजपाचे वर्चस्व असलेल्या गटामध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने व प्रा. नाना शिंदे यांनी प्रचाराचा शुभारंभ करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून तळागाळात पोचलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराकडे विकासकामांचा पाढा वाचण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने फिरले पाहिजे. झालेल्या कामाची माहिती देऊन पक्षसंघटना वाढीच्यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी प्रत्येकाने उतरले पाहिजे, असे माजी आमदार बाळ माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.