90175
शिवछत्रपतींच्या जयघोषाने हनुमंत गड दुमदुमला
शिवराज्याभिषेक सोहळा ः मर्दानी खेळांसह सजावट, वेशभूषा स्पर्धा ठरल्या लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १४ ः फुकेरी येथील ऐतिहासिक किल्ले हनुमंत गडावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्ग सेवक आणि शिवभक्तांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि फुकेरी ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या या दुसऱ्या शिवराजाभिषेक सोहळ्यात हनुमंत गड शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला. गडावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची केलेली लक्षवेधी सजावट, वेशभूषा स्पर्धा आणि मर्दानी खेळ हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरले.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नाट्य दिग्दर्शक तथा नाट्य कलाकार छत्रपती संभाजी महाराज फेम मास्टर गणेश ठाकूर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, फुकेरी सरपंच निलेश आईर, झोळंबे माजी सरपंच राजू गवस, ॲड. सोनु गवस, जगदिश सावंत, आनंद आईर प्रकाश राऊळ, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभागाचे प्रमोद मगर, सुनील राऊळ, दिनेश सावंत आदी उपस्थित होते. सकाळी ब्राह्मणाच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिषेक करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी दिवस-रात्र जागून स्मारकाची केलेली सजावट नेत्रांचे पारणे फेडणारे होती. अभिषेक झाल्यानंतर बिडवाडी, कणकवली बिडवाडीच्या एसएसएस योद्धा १+ समुहाने इतिहासाची साक्ष देणारे थरारक शिवकालीन मर्दानी लाठीकाठीचे खेळ सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी नाट्य कलाकार ठाकूर यांनी भावी पिढीला शिवचरित्राचा अर्थ समजला तर मराठ्यांचा इतिहास सुरक्षित करण्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज नसल्याचे सांगितले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील यांनी तमाम शिवप्रेमींना मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेत २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. एका पेक्षा एक सरस सादरीकरणाने उपस्थित शिवप्रेमी भारावून गेले. भावी पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गडकिल्ले संवर्धनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे परिक्षण ॲड. सोनु गवस आणि दुर्गसेवक प्राध्यापक सतिश सावंत यांनी केले. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी तसेच सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ‘घेतला वसा, दुर्गसंवर्धन चळवळीचा’ या अभियानांतर्गत गेल्यावर्षी किल्ले हनुमंत गडाचे १० फुटी प्रवेशद्वार मोकळे करून प्रत्यक्ष शिवस्मारक साकारले आहे. इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सर्व ग्रामस्थ, दुर्गसेवक, रणरागिणी, स्पर्धक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्ग सेवक सिद्धू परब यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.