अपसंपदेच्या गुन्ह्याप्रकरणी २२ जानेवारीला दुपारी १२ वाजता मोठ्या बंधूंसह मला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मला वर्षभर चौकशीच्या फेऱ्या मारायला लावल्यानंतर आता एसीबीने (ACB) हा मोर्चा माझ्या मोठ्या बंधूंकडे वळवला आहे. अपसंपदेच्या गुन्ह्याप्रकरणी २२ जानेवारीला दुपारी १२ वाजता मोठ्या बंधूंसह मला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. कुटुंबाला वेठीस धरणे हा एकमेव कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केला.
माझ्याकडे साडेतीन कोटींची अपसंपदा कुठून आली हे मलाच माहिती नाही. त्यामुळे न्यायालयात एसीबीला याचे उत्तर द्यावेच लागेल. परंतु, आम्ही या चौकशीला घाबरणार नाही, हजर राहू, अशी प्रतिक्रियाही आमदार राजन साळवी यांनी दिली. झाडगाव येथे घेतलेल्या निवास्थानी पत्रकार परिषदेत श्री. साळवी बोलत होते. यावेळी त्यांचे छोटे बंधू संजू साळवी, पुतणे दुर्गेश साळवी आदी उपस्थित होते.
साळवी म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारीच माझ्या सात मालमत्तांची झडती घेतली. सुमारे १० तास चालेल्या या चौकशीचा मला अहवाल दिला. या कारवाईबाबतचा अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे. अटकेबाबत वरिष्ठांच्या आदेशानंतर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याला काही अवधी लोटला असताना, आज पुन्हा रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी मला नोटीस बजावली आहे. शहर पोलिस ठाण्यात आपल्या विरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पत्नी अनुजा, मुलगा शुभम याचाही समावेश आहे.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपल्याकडे व भाऊ दीपक प्रभाकर साळवी यांच्याकडे त्यांना तपास करायचा आहे. तरी आपण भाऊ दीपक साळवी यांच्यासह २२ जानेवारीला दुपारी १२ वाजता रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात (नाचणे) चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे, अशी नोटीस दिली असून, वर्षभरापासून माझ्याशी संबंधित ७० जणांची ‘एसीबी’ने चौकशी केली आहे. आता मोठ्या बंधूंना यामध्ये गोवले जात आहे. त्यानंतर छोट्या बंधूंनाही ते चौकशीला बोलावतील. यांना जनता माफ करणार नाही. आम्ही तिघे बंधू याला एकोप्याने सामोरे जाणार, असे साळवी यांनी सांगितले.
पंचनाम्यात माझ्याकडे असलेल्या मालमत्तेचा आकडा आहे. परंतु, त्या बंगल्यासाठी घेतलेले २५ लाखांचे कर्ज, हॉटेलसाठीचे १५ लाखांचे कर्ज आणि कार्यालयाच्या कामासाठीच्या कर्जाचा उल्लेखच नाही. न्यायालयात हे प्रकरणी गेल्यानंतर या अपसंपदेबाबत ‘एसीबी’ला उत्तर द्यावेच लागणार आहे. माझी बाजू भक्कम असल्याने आणि कुटुंब, पक्ष बाजूने असल्याने मी या कारवाईला घाबरत नाही, असे स्पष्टीकरण आमदार साळवी यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.