बापूसाहेब महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. मात्र त्यांच्या प्रत्येक कृतीमागे लोकांचे हित जपणे हा मुख्य हेतू असायचा. यातील काही कामे छोटीही असायची, पण त्यातून त्यांच्या स्वभावातील मोठेपणा उठून दिसायचा. महाराजांच्या या पैलूची ओळख पटवणाऱ्या अनेक घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या असतील, पण इतक्या वर्षांनंतर त्यातील काही घटना आजही सावंतवाडीकरांच्या स्मरणात आहेत.असाच एक प्रसंग त्यांच्या कुडाळ ते सावंतवाडी प्रवासादरम्यान घडला.
त्या काळात एखाद्या राजाच्या गाडीला एक वेगळेच महत्त्व असायचे. महाराजांची गाडी मात्र अनेकांसाठी सुखद अनुभव देणारी असायची. एकदा ते कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने येत होते. याचवेळी जोशी आडनावाचे एक गरीब ब्राह्मण सावंतवाडीत पायी येत होते. सावंतवाडीत मुक्काम करून त्यांना पुढच्या गावी जायचे होते. साधारण सहा-सात मैल चालल्यावर त्यांना थकल्यासारखे वाटू लागले. इतक्यात मागून मोटारीचा आवाज ऐकू आला. पायी सावंतवाडीपर्यंत जाणे अशक्य वाटल्याने त्यांनी मोटारीला हात दाखवला.
त्या काळात भाडे देऊन प्रवासी आणणाऱ्या मोटारी नुकत्याच सुरू झाल्या होत्या. जोशीबुवांना ही त्यातलीच मोटार वाटली. त्यांनी हात दाखवताच गाडी थांबली. त्यात महाराज, राणीसाहेब आणि चालक, अशी तीन माणसे होती. जोशी यांनी त्यांना ओळखले नाही. मोटार थांबताच, ‘‘ही गाडी कोणाची आहे ओळखली का?’’ असा प्रश्न महाराजांनी केला. समोरून उत्तर आले ‘‘नाही.’’ महाराज म्हणाले, ‘‘तुम्हाला कोठे जायचे आहे?’’ ते म्हणाले, ‘‘सावंतवाडी’’. महाराज ‘‘बसा’’ म्हणाले. जोशीबुवा बसल्यानंतर मोटार सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. महाराजांनी त्यांना नाव-गाव विचारले. सावंतवाडीत कुठे उतरायचे आहे, हेही विचारून घेतले.
मोटार शहरात येताच भटवाडीच्या दिशेने जाणाऱ्या नाक्यावर थांबण्यास महाराजांनी चालकाला सांगितले. जोशीबुवा उतरले. इतक्या प्रवासानंतर ही मोटार कोणा थोरामोठ्याची आहे, असा अंदाज त्यांना आला होता; पण ते खुद्द सरकार असतील असे त्यांना वाटले नाही. मोटारीतून उतरताच त्यांनी भाडे न विचारता महाराजांना लवून मुजरा केला आणि भटवाडीच्या दिशेने चालायला लागले. पुढे मुक्कामी गेल्यावर तेथील ओळखीच्यांना या सगळ्या प्रवासाचे वर्णन सांगितल्यानंतर जोशीबुवांना ते खुद्द महाराज होते, हे कळले.
बांदा येथील आणखी एक आठवण लोकहिताबाबत ते किती झटपट निर्णय घ्यायचे, याची कल्पना देणारी आहे. तेथील शां. क. नाडकर्णी यांनी ही आठवण लिहून ठेवली आहे. बांद्यात १९२९ च्या दरम्यान विषमज्वराची साथ आली होती. त्यावेळी सरकारी दवाखान्यात डॉ. माने हे कार्यरत होते. त्यांनी अनेक रुग्ण बरे केले होते. आपल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी चांगली सेवा देऊन लोकांचा विश्वास मिळविला होता. ही साथ सुरू असताना प्रशासकीय धोरणातून त्यांची अचानक सावंतवाडीत बदली झाली. त्यांच्या जागी नव्या डॉक्टरची नियुक्ती होणार होती. याचदरम्यान बांद्यातील तीन-चार माणसे विषमज्वराने अत्यवस्थ होती. अशावेळी नवीन डॉक्टरने उपचार सुरू केले तर त्यांना कितपत फरक पडेल, याबाबत लोकांना शंका होती.
यामुळे त्या रुग्णांचे नातेवाईक आणि गावातील ज्येष्ठ मंडळींनी महाराजांना साकडे घालण्याचे ठरविले. सर्वजण प्रथम राजवाड्यात गेले. रीतसर दिवाणसाहेबांना भेटले; मात्र त्याचा काही उपयोग होईना. यामुळे महाराजांना भेटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी महाराज दाणोलीला गेले होते. हे सर्व बांदावासीय थेट दाणोलीत पोहोचले. तेथे गेल्यावर समजले की महाराज आंघोळीसाठी माडखोल येथील नदीवर गेले आहेत. त्यांनी महाराजांच्या येण्याच्या मार्गावरच थांबायचे ठरवले. स्नान उरकून परतणाऱ्या महाराजांना हे सर्व बांदावासीय दिसले. त्यांनी आश्चर्यचकीत होत त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारले. त्यांनी नम्रपणे महाराजांना अडचण सांगितली.
ती ऐकून घेत महाराजांनी डॉ. माने यांची बदली तहकूब करण्याचा तोंडी हुकूम त्या मंडळींकडेच दिवाणसाहेबांना दिला. महाराजांनी खेड्यापाड्यातील अनेक मुलांना शिक्षण दिले. त्यांची राहण्याची व्यवस्था अगदी राजवाड्यातही केली. यातून शेकडो तरुणांचे करियर घडले. आजही याची उदाहरणे गावोगाव ऐकायला मिळतात. कणकवलीतील डॉ. बी. डी. गायतोंडे यांनी आपल्या शिक्षणाबाबतचा अनुभव लिहून ठेवला आहे. ते एम.बी.बी.एस. डॉक्टर होते. महाराज राज्याधिकार मिळाल्यानंतर लोकांची स्थिती समजून घेण्यासाठी गावोगाव दौरा करत होते. असेच ते एकदा वर्दे या ठिकाणी आले. यावेळी डॉ. गायतोंडे एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला होते; मात्र घरची आर्थिक स्थिती कमजोर होती. शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज होती. वर्दे येथे त्यांची महाराजांशी तोंडओळख झाली.
आपला प्रश्न महाराजांपुढे मांडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ते राजवाड्यात महाराजांना भेटायला गेले. आत जाताच महाराजांनी समोरच्या कोचावर बसण्यासाठी बोट दाखवून खूण केली; मात्र गायतोंडे यांना सरकारांसमोर बसण्याचा धीर होईना. ही गोष्ट लक्षात येताच महाराज म्हणाले, ‘‘आधी बसा आणि नंतरच जे काही सांगायचे आहे ते सांगा.’’ पुढे महाराजांना त्यांची सगळी हकीकत समजली. महाराजांनी त्यांना ४४० रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. अट एकच घातली की, पास झाल्यानंतर दरवर्षी ११० प्रमाणे चार हप्त्यात या कर्जाची परतफेड करावी. पुढे डॉ. गायतोंडे यांनी शिक्षण पूर्ण केले. कणकवलीमध्ये शैक्षणिक कार्य सुरू केले. महाराजांच्या ते सतत संपर्कात असायचे.
प्रजेच्या हितासाठी बापूसाहेब महाराज काहीही करायला तयार असायचे. यासाठीचे निर्णय वेगाने घ्यायचे. यात सार्वजनिक हिताबरोबरच एखाद्या प्रजाजनाचे वैयक्तिक हित जपण्यासाठीही ते तितकेच तत्पर असायचे. मग एखाद्या वाटसरूला आपल्या गाडीत घेऊन त्याचा प्रवास सुखकर करण्यापासून ते एखाद्या गरिबाच्या मुलाचे शिक्षण पूर्ण करून त्याचे आयुष्य उभे करण्यापर्यंतच्या कामांचा समावेश असायचा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.