विमान आकाशी; गरजा बाकी!  sakal
कोकण

विमान आकाशी; गरजा बाकी!

विमानतळामुळे विकासाचे स्वप्न; अत्यावश्यक सेवा सुविधांकडे लक्ष

प्रशांत हिंदळेकर

गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले चिपी विमानतळ अखेर सुरू झाले. या विमानतळामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनवाढीस चांगली संधी प्राप्त झाली आहे. या संधीचा सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांनी लाभ उठविण्याची गरज आहे; मात्र विमानतळ सुरू झाले तरी त्याचा सुरवातीसच चांगला फायदा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण मालवाहतुकीसाठी कार्गो विमानसेवा तसेच विमानफेऱ्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे.

या अनुषंगाने विमानतळ परिसरासह लगतच्या तालुक्यांमध्ये अत्यावश्यक सेवा सुविधा निर्माण करण्याबरोबरच देश, विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्यासाठी वेगळे पर्याय उपलब्ध करण्याची गरज असल्याचे मत सिंधुदुर्गातील या क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच अभ्यास असलेल्यांनी ‘सकाळ’कडे नोंदवले. विमानसेवा नियमित होवून आठवडा झाला आहे. त्या अनुषंगाने आणखी कशाची गरज आहे. याचा घेतलेला आढावा.

जिल्ह्याचा कायापालट शक्य

चिपी विमानतळ सुरू झाला ही विकासाची प्रक्रिया आहे. याचा रिझल्ट दिसायला काही कालावधी जावा लागेल. कोकण रेल्वे सुरू झाल्यावर लोकांच्या मनात शंका होती की, आता लक्झरी गाड्यांवर परिणाम होईल; मात्र लक्झरींमध्ये वाढ झाली. रेल्वेच्या संख्येतही वाढ झाली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने विकासाची ही प्रक्रिया सुरुच राहणार आहे. आता एक विमान सुरू झाले म्हणजे रोज ७२ प्रवासी आले. यातून जिल्ह्याचा कायापालट होईल, असे मनात ठेवले तर ती चुकीची संकल्पना ठरेल; पण सिंधुदुर्गात जाण्यासाठी विमानसेवा, हवाईमार्ग उपलब्ध आहे, याचा अर्थ सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर आला आहे. हा जिल्हा जगाशी हवाईमार्गाने जोडला गेला. या अनुषंगाने पर्यटन विश्वाचा सिंधुदुर्गकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हे बदल या विमानतळामुळे होतील, असे मत पर्यटन व्यावसायिक वाळके यांनी व्यक्त केले.

भविष्यात अन्य राज्यांतूनही विमाने

जल पर्यटन अभ्यासक डॉ. कुलकर्णी यांच्या मते, भविष्यात या विमानतळाला अन्य शहरेही जोडली जाणार आहेत. या अनुषंगाने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर भर द्यायला हवा. सध्या मुंबईतील विमानतळावरील लँडिंग व टेक ऑफच्या मर्यादेमुळे विमानाची वेळ दुपारच्या सत्रात आहे. भविष्यात या विमानतळावर पुणे, बेंगलोर अन्य राज्यातूनही विमाने येतील. त्यामुळे त्यादृष्टीने विमानतळ प्राधीकरणाकडून आवश्यक ते प्रयत्न होतील. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विमानतळाची सुविधा जिल्ह्याला उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनीही या संधीचे सोनं करावे.

पायाभूत सुविधांची गरज

पर्यटन व्यावसायिकांना फायदा होण्यासाठी विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा कशा मार्गी लागतील यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. सद्यःस्थितीत विमानतळावर उतरणारा पर्यटक असो किंवा अन्य मार्गाने येणारा पर्यटक असो त्यांना पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी ज्या प्रवाशी गाड्या उपलब्ध होतात, त्या गाड्यांच्या भाड्यांचे दर हे विविध तालुक्यात पर्यटकांना न परवडणारे असल्याचे दिसून येते. त्यामुळे कमी भाडे असलेल्या गाड्या पर्यटक उपलब्ध करून घेत पर्यटनाचा आनंद लुटतात. याचा फटका भाड्याने वाहन व्यवस्था पुरविणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना बसत आहे. याचा विचार करता स्थिर दर कसे राहतील यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे मत कृषी पर्यटन व्यावसायिक भाऊ सामंत यांनी व्यक्त केले.

विमानतळामुळे येणाऱ्या पर्यटकांची किंवा जे पर्यटक आणतात अशा व्यावसायिकांची जिल्ह्याकडे बघण्याची दृष्टी बदलणार आहे. पाच वर्षांत किमान २५ उड्डाणे व्हावीत, असा शासनाचा उद्देश आहे; पण मालवाहतूक सेवा (कार्गो) सुरू झाल्यास येथील आंबा, काजू, वनौषधी, ताजी मासळी बाहेरच्या जगाशी जोडली जाईल. यामुळे या जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योगांना वेगळा विश्वास मिळेल. एव्हीएशन प्रशिक्षण, विमान उड्डाण केंद्र या केंद्रामुळे मोठा फरक पडेल. तरुणांना या प्रशिक्षणाचा फायदा मिळेल. यामुळे स्थानिक व्यवसायही निश्‍चितच बहरतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे हेलिकॉप्टरची सुविधा सुरू झाली तर सिंधुदुर्ग दर्शन घडविण्याची वेगळी संधी निर्माण होईल. हेलिकॉप ॲम्ब्युलन्सची अडचणही दूर होईल. टूर ऑपरेटर, छोट्या व्यावसायिकांचा विकास होईल.

- नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक

पर्यटनासाठी आवश्यक दळणवळणाची साधने म्हणजे कोकण रेल्वे, मुंबई- गोवा महामार्ग ही होती. आता यात चिपी विमानतळाची भर पडली आहे. हे विमानतळ सुरू झाल्याने आता देश, विदेशातील पर्यटकांना येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येता येणार आहे. पर्यटक हे जास्त करून विमानाची सुविधा आहे का? याचा विचार करतो. त्यामुळे येथील पर्यटनाच्या वाढीत या विमानतळाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना विमानतळ परिसरात अत्यावश्यक, पायाभूत सुविधा देण्यावर भर द्यायला हवा. त्याचबरोबर नियमित पर्यटन स्थळांबरोबरच निरनिराळी आकर्षणे निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात हे आव्हान आणि संधी आहे. विमानतळाचा लाभ उठविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नियोजन करायला हवे.

- डॉ. सारंग कुलकर्णी, जल पर्यटन अभ्यासक

सध्या विमानतळाची वेळ ही दुपारच्या सत्रात आहे. त्यामुळे त्याचा आता पर्यटनाला फायदा कमी आहे. कारण येथे येणारा पर्यटक हा मालवणी जेवणाचा आस्वाद, जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यास येत असतो. सद्यःस्थितीत विमानतळावरून एकाच विमानाचे उड्डाण होत असून ती वेळ पर्यटकांना सोईस्कर नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटन करून माघारी जाण्यासाठी सायंकाळच्या सत्रात विमान फेरी गरजेची आहे. भविष्यातील पर्यटन विकासाचा विचार करता यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. मुंबईतील पर्यटक येथे येतीलच मात्र त्याचबरोबर पुणे, नागपूर तसेच अन्य राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना खासगी वाहनाने किंवा रेल्वे प्रवासात बराच कालावधी लागतो; मात्र अन्य मोठ्या शहरातील विमाने सुरू झाल्यास त्याचा येथील पर्यटन वाढीस निश्‍चितच फायदा मिळेल यादृष्टीने येत्या काळात प्रयत्न व्हायला हवेत.

-भाऊ सामंत, कृषी पर्यटन व्यावसायिक

यापूर्वी किनारपट्टी भागात छोट्या छोट्या व्यवसायांमधून स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत होता. आता नव्या विमानतळामुळे रोजगाराची संधी आहे. आज अनेक तरुण मुले खासगी छोट्या, मोठ्या गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. त्यामुळे या खासगी वाहनधारकांना या विमानतळावर वाहने भाड्यासाठी लावता यावीत यासाठी जी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे ती जिल्ह्यातील व्यक्तीलाच मिळावी. परजिल्ह्यातील, मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणच्या व्यावसायिकांना ही निविदा न देता स्थानिकांना देण्यासाठी शासनाने, संबंधित प्रशासनाने प्रयत्न करावेत. स्थानिकांनाच रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्गवासीयांचे स्वप्न सत्यात उतरले. आता या विमानतळाच्या माध्यमातून स्थानिकांना वेगवेगळ्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून दिल्यास आर्थिक विकास होईल.

- महेश मयेकर, पर्यटन व्यावसायिक

नव्याने सुरू झालेल्या चिपी विमानतळाचा फायदा निश्चितच पर्यटनाला होणार आहे. त्यासाठी काही बदल आवश्यक आहेत. यात लागून आलेल्या सुटीच्या दिवशी किंवा पर्यटन मोसमात उदा. दिवाळी, ख्रिसमस, इयर एंड व इतर दिवसांत विशेष विमान फेऱ्या सुरू करण्याची गरज आहे. चार्टर्ड विमानसेवा बुकींग सुविधा सुटसुटीत व परवडणारी असायला हवी. मुंबईहून सुटणारे विमान शक्यतो सकाळी लवकर सुटावे आणि मुंबईला जाणारे विमान संध्याकाळी सुटावे जेणेकरून दोन दिवसांच्या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना या विमान सुविधेचा लाभ घेता येईल. मुंबई-सिंधुदुर्ग-बेंगलोर, अशी वन स्टॉप विमानसेवा सुरू व्हावी. विमानसेवेचे प्रवास दर स्थिर असावेत यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.

- रविकिरण तोरसकर, अध्यक्ष, नीलक्रांती मत्स्य, पर्यटन संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT