चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसामुळे बिघडलेले वातावरण अजूनही सुरळीत झालेले नाही. त्यामुळे समुद्रातील मच्छीमारीवर वारंवार व्यत्यय आहे. त्याचा परिणाम मासळी विक्रीवर झाला आहे. चिपळुणातील मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.
चिपळूण शहरात बांगडा २०० रुपये किलो, सुरमई ७०० रुपये, मोडोसा ७५० रुपये किलो, सरंगा ४५० रु. किलो, पापलेट ७०० रु. किलो, टायनी कोंळबी १५० रु. किलो, कोळंबी २५० रु. किलो दराने विकली जात आहे. मासळीच्या वाढलेल्या दराबाबत येथील विक्रेते सरफराज बेबल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘यावर्षी मासेमारी सुरू झाली; परंतु हंगामावर पावसाचे सावट आहे. समुद्री भागात नेहमी वादळी पावसाचे वातावरण असल्यामुळे मच्छीमार समुद्रात जात नाहीत. काही दिवसांपासून वातावरण निवळले आहे; पण सातत्य राहत नाही. त्यामुळे मासे कमी प्रमाणात येत आहेत. नागरिकांना चांगले आणि ताजे मासे देण्यासाठी मुंबईतून मासे आणावे लागते. तेव्हा वाहतूक, बर्फ आणि इतर खर्च वाढतो. त्यामुळे मासे जास्त दरात विकावे लागतात.’
चिपळूण तालुक्यात बहादूरशेख नाका, मच्छीमार्केट, सावर्डे, अलोरे, पोफळी येथे मासळीविक्रेते आहेत. दापोली आणि रत्नागिरीच्या काही भागांतून मासळी विक्रीसाठी घेऊन येणारे विक्रेते गोवळकोटरोड, गुहागर बायपास, बहादूरशेख नाका आणि शहरात महामार्गालगत रस्त्याच्या कडेला बसतात. बहादूरशेख नाका येथील विक्रेते काविळतळी येथे मासळी विक्री करतात. अलोरे आणि पोफळीतील विक्रेते टेम्पोने गावोगावी मासे विकतात. मासे दीर्घकाळ ठेवण्याची व्यवस्था चिपळूणला नाही. त्यामुळे मासे खराब होऊ नयेत म्हणून विक्रेते गावोगावी जाऊन विकत असल्याचे चित्र आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.