Kudal MIDC sakal
कोकण

कुडाळ एमआयडीसीला हवी संजीवनी

महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यमंत्री एस. एन. देसाई यांच्या प्रयत्नातून १९७५ मध्ये कुडाळ येथे एमआयडीसी आकाराला आली.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यमंत्री एस. एन. देसाई यांच्या प्रयत्नातून १९७५ मध्ये कुडाळ येथे एमआयडीसी आकाराला आली.

महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यमंत्री एस. एन. देसाई यांच्या प्रयत्नातून १९७५ मध्ये कुडाळ येथे एमआयडीसी आकाराला आली. सुरुवातीच्या टप्प्यात ‘वायमन गार्डन’, ‘मेलट्रॉन’, ‘महानंदा’ यांसारख्या मोठ्या कंपन्या सुरू झाल्याने जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले. मात्र, पुढील काही वर्षांत एमआयडीसीतील प्रकल्पांना जी घरघर लागली, ती आजपर्यंत कायम आहे. गेल्या ४८ वर्षांत एमआयडीसीमध्ये किरकोळ प्रकल्प वगळता एकही मोठा प्रकल्प होऊ शकला नाही. त्यामुळे कुडाळ एमआयडीसीचा विकास कोसो दूर राहिल्याचे चित्र आहे. सध्या सरकारमध्ये केंद्रात व राज्यात कार्यरत असलेल्या सिंधुदुर्गच्या दोन सुपुत्रांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवून नवीन उद्योग कार्यान्वित करून एमआयडीसीला नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी कुडाळवासीयांसह उद्योजक व सूज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.

- अजय सावंत

एमआयडीसीची मुहूर्तमेढ

सिंधुदुर्ग पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग होता. १ मे १९८१ ला स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा उदयास आला. तत्पूर्वी अखंड रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा असताना तत्कालीन राज्यमंत्री एस. एन. देसाई यांनी जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी १९७५ मध्ये कुडाळ एमआयडीसी आणली. त्यावेळी विकासाचे केंद्रबिंदू म्हणून एमआयडीसीकडे पाहिले जात होते.

मोठे प्रकल्प आले पण...

अनेक युवक-युवती रोजगार मिळेल, अशी अपेक्षा ठेवून होते. सुरुवातीला एमआयडीसीमध्ये वायमन गार्डन, मेलट्रॉन, महानंदा, महामँगो यासारखे प्रकल्प आकारास आले. त्या प्रकल्पांतून रोजगार निर्मितीही सुरू झाली. उषा इस्पात कंपनीच्या मोठ्या युनिटचे तत्कालीन केंद्रीय मंत्री अजित सिंग यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले; पण पुढील काही वर्षांत हे मोठे प्रकल्प बंद पडले आणि कुडाळ एमआयडीसीला घरघर लागली, ती आजही कायम असल्याचे चित्र आहे. एकूण जवळपास २७४ हेक्टरवर ९५८ भूखंड असलेल्या एमआयडीमध्ये सद्यस्थितीत कॅश्यू उद्योग, फिश नेट, गोदरेज, अ‍ॅक्युरेट इंजिनिअरिंग, बांबू (कॉनबॅक) चिवार, बजाज राईस मिल, सिंधुदुर्ग पाईप, ऑक्सिजन प्लॅन्ड, हिरोहोंडा, टीव्हीएस शोरूम, शिक्षण संस्था, टेलिफोन आदींसह २०९ भूखंडांवर उद्योग सुरू आहेत; पण ज्या गतीने उद्योग सुरू व्हायला हवे होते, तसे उद्योग सुरू झालेले दिसत नाहीत.

Mahamango Project

भूखंड अडकले

अनेक भूखंडांवरील उद्योग बंदावस्थेत आहेत. काही उद्योगांची अवस्था भग्न झालेली असून त्या ठिकाणी केवळ जुन्या जीर्ण इमारती दिसून येत आहेत. काही भूखंड उद्योजकांनी केवळ खरेदी करून नावावर ठेवले; मात्र त्या ठिकाणी कोणताही उद्योग सुरू केलेला नाही. काही भूखंडांवर निवासी बांधकामे असल्याचेही दिसून येते. काही भूखंड वजनदार राजकीय मंडळींचे असल्याने एमआयडीसी त्यांना जाब विचारू शकत नाही, अशी स्थिती असल्याचे उद्योजकांमधून बोलले जात आहे.

क्षमता आहेत; पण...

वास्तविक जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कुडाळ एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग होणे अपेक्षित होते. कुडाळमधून महामार्ग जातो, तर रेल्वेस्थानक हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे कच्चा व पक्क्या मालाच्या वाहतुकीसाठी उद्योजकांना कोणतीच अडचण नव्हती; पण तसे काहीच झाले नाही. आता तर अलीकडेच कुडाळहून २७ किलोमीटरवर असलेल्या चिपीमध्ये विमानतळ सुरू झाले आहे. त्या ठिकाणी कार्गो विमान सेवा तूर्त सुरू नसली तरी ती सुरू झाल्यानंतर मालाची ने-आण करण्यासाठी मोठा उपयोग होईल; पण तत्पूर्वी कुडाळ एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग सुरू होणे आवश्यक आहे.

संजीवनी मिळेल का?

आता केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. राज्यात शिवसेना (शिंदे गट) भाजपसोबत सत्तेत आहे. विशेष म्हणजे केंद्रात सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे केंद्रीय लघू मध्यम व सूक्ष्म मंत्रिपदावर आहेत. राज्याच्या सत्तेत सिंधुदुर्गचे दुसरे सुपुत्र माजी पालकमंत्री दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री आहेत, ही निश्‍चितच सिंधुदुर्गवासीयांसाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे. या दोन्ही सुपुत्रांनी ठरवले तर नवीन उद्योग आणून (४७ वर्षांनंतर उशिरा का होईना) कुडाळ एमआयडीसीला नवसंजीवनी देऊ शकतात. तेवढी क्षमता या दोन्ही नेत्यांमध्ये आहे; पण ही राजकीय इच्छाशक्ती हे दोन्ही नेते दाखवतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. खरे तर राजकीय प्रमुख मंडळींनी एमआयडीसीसारख्या उद्योग देणार्‍या केंद्रात स्वतः पुढाकार घेऊन वेगवेगळ्या व्यवसायांना गती देणे अपेक्षित आहे. असे असताना स्वतःच्याच कंपनीच्या नावे भूखंड घेऊन ते रिकामे ठेवल्यास त्यांचा उपयोग काय, असा सवाल सूज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक उद्योजकांची धडपड

कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने वसाहतीच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देऊन त्या मार्गी लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र देण्याची अनेक वर्षांची मागणी विशेष योजनेंतर्गत मान्य झाली. गेल्या २० वर्षांहून अधिक काळापूर्वी उभारण्यात आलेले पथदीप मोडकळीस आल्याने रात्री या परिसरात काळोखाचे साम्राज्य पसरत होते. यात अनेक गैरप्रकार घडत होते. औद्योगिक महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन सुमारे सहा कोटींच्या नूतनीकरण, देखभाल दुरुस्ती खर्चास मान्यता घेण्यात आली. उद्योजकांना महामंडळाच्या संदर्भातील प्रशासकीय पूर्तता करण्यासाठी रत्नागिरी येथे फेर्‍या घालाव्या लागत होत्या. त्यासाठी रत्नागिरी येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांची महिन्यातून दोन वेळा कुडाळ येथे उपस्थित राहण्याबाबत मान्यता घेण्यात आली आहे.

आशादायी प्रयत्न

संघटना स्तरावर बळकटी व सक्षमीकरण करण्यात येत असून, उद्योजकांसाठी कामगार कायदे, सकारात्मक ऊर्जा व्यवस्थापन, कामगारांच्या वैद्यकीय तपासण्या, नेत्रतपासणी शिबिर, उद्योजक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उद्योजकांना प्रेरित करणार्‍या उपक्रमांचे गेले सात महिने आयोजन करण्यात येत आहे. स्वच्छ व हरित औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी विशेष अभियान या वर्षात असोसिएशन होती घेणार असून, स्मृती उद्यानही उभारण्याचा मानस आहे. स्थानिक तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळावा व औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांना मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या दृष्टीने असोसिएशन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे नियोजन करीत आहे. रोजगार व मनुष्यबळ उपलब्धी अशा दुहेरी विकासाच्या या संकल्पनेला लवकरच सुरुवात होणार आहे.

कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सात महिन्यांपूर्वी कार्यभार स्वीकारल्यावर यापूर्वी अध्यक्ष व कार्यकारिणीने सातत्याने प्रयत्न केलेल्या या वसाहतीच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहणार आहे. याला यशही येत आहे. विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना पुढाकार घेत असून, सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छ व हरित औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी विशेष अभियान या वर्षात होती घेणार आहे. स्मृती उद्यानही उभारण्याचा मानस आहे. स्थानिक तरुणांना रोजगार स्थानिक स्तरावर मिळावा व औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांना मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या दृष्टीने असोसिएशन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे नियोजन करीत आहे. रोजगार व मनुष्यबळ उपलब्धी अशा दुहेरी विकासाच्या या संकल्पनेला लवकरच सुरुवात होणार आहे.

- मोहन होडावडेकर, अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन

एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग बंद आहेत. काही उद्योगांच्या जमिनी कित्येक वर्षे पडूनच आहेत. या जमिनी अन्य उद्योजकांना उद्योगासाठी दिल्यास खऱ्या अर्थाने नवीन उद्योग येतील. त्यामुळे येथील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असून, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आता नवीन अध्यक्ष मोहन होडावडेकर हेही चांगले उपक्रम राबवत आहेत.

- आनंद बांदिवडेकर, माजी अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT