खेर्डी परिसरात बांगला देशातून घुसखोरी करून आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच ढाका येथे पलायन करण्याच्या बेतात असलेल्या आणखी एका बांगला देशी घुसखोराला मुंबई विमानतळावर अटक झाली. जुमो शेख असे त्याचे नाव आहे.
बनावट पासपोर्टद्वारे देशाबाहेर चाललेल्या या संशयिताच्या कागदपत्रांवर चिपळूणचा पत्ता आहे. एजंटांच्या मदतीने बनावट जन्म दाखला, आधार, पॅन आदी कागदपत्रे तयार केली आणि त्या द्वारेच बनावट पासपोर्टही प्राप्त केला, असे पुढे येत आहे.
संशयित २०११ ला बांगला देशातून पश्चिम बंगालमार्गे भारतात दाखल झाला होता. त्यानंतर तो चिपळुणात आला व बांगला देशी घुसखोरांचे आणखी एक चिपळूण कनेक्शन पुढे आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणाही सतर्क झाल्या असून, अशा व्यक्तींच्या शोधासाठी आता कोकणावर करडी नजर वळण्याची शक्यता आहे.
स्वतःला अशोक चौधरी म्हणवून घेणारा हा संशयित ढाका येथे आजारी आईला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगत होता; मात्र त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळल्याने तेथील अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली. जन्म चिपळूणचा असल्याचे सांगणाऱ्याला मराठी समजत वा बोलता येत नसल्याने त्याच्याबद्दलचा संशय येऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
कागदपत्रांची चौकशी करता रोहा येथे १९९४ मध्ये जन्म झाल्याचा दाखला ज्या रुग्णालयाचा होता ते रुग्णालयच मुळात २००० ला सुरू झाल्याचे तपासात पुढे आले. अधिक तपासात ही व्यक्ती अशोक चौधरी नसून, बांगला देशातून घुसखोरी करून आलेला जुमो शेख (वय २९) असल्याचेही पुढे आले.
या बनावट पासपोर्टद्वारे त्याने या आधी दुबई वारी केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे; मात्र ढाका येथे जाण्यासाठी पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करताना त्याचा हा बनाव उघडकीस आला आहे. त्यानंतर जुमो शेख याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
महिन्याभरातच हे प्रकरण उघड
तीन बांगलादेशी घुसखोर आढळल्यानंतर महिन्याभरातच हे प्रकरण उघडकीला आल्याने अशा घुसखोरांनी चिपळूणसह कोकणात मोठ्या संख्येने वास्तव्य केले असण्याची शंका व्यक्त होऊ लागली आहे. १०-१२ वर्षे या भागात ही मंडळी कोणाच्या मदतीने राहत होती, याचाही शोध घेण्याची गरज आहे.
अशोक चौधरी (जुमो शेख) या बांगला देशी घुसखोराला मुंबई विमानतळावर पकडण्यात आल्याचे वृत्त आहे. अजून तो आमच्या ताब्यात आलेला नाही. या संदर्भातील तपास आमच्याकडे आल्यानंतर त्याची स्थानिक माहिती घेऊन पुढील तपास केला जाईल.
- रवींद्र शिंदे, चिपळूणचे पोलिस निरीक्षक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.