owl sakal media
कोकण

लक्ष्मीदेवीच्या वाहनाची शिकार होता कामा नये

काही वर्षात शिकारीची काळी किनार वेढत असल्याचे दिसून येत आहे. यात सर्वाधिक धोका घुबडाला. लक्ष्मीदेवीच्या वाहनाला वाचवले पाहिजे, असे प्रतिपादन करणारा हा लेख

प्रतीक मोरे

दिवाळीला खरंतर सणांचा राजा म्हटलं पाहिजे. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधीकालात हा सण येतो. सहा दिवस या सणाचे असतात. दिव्यांचा उत्सव असल्यामुळे संपूर्ण भारतवर्ष रोषणाईमध्ये न्हाऊन निघतो. गोठ्यातील गुरे-वासरे ते अगदी भाऊबीज सर्वच आनंदी. व्यापारीवर्गात लक्ष्मीपूजन आणि हिशेबाच्या वह्यांचे पूजन यामुळे या सणाला अपरंपार महत्व आहे. अशा मंगलमय सणाला मात्र काही वर्षात शिकारीची काळी किनार वेढत असल्याचे दिसून येत आहे. यात सर्वाधिक धोका घुबडाला. लक्ष्मीदेवीच्या वाहनाला वाचवले पाहिजे, असे प्रतिपादन करणारा हा लेख.

लक्ष्मीचे वाहन मानले जाणारे घुबड आधीपासूनच विविध अंधश्रद्धा आणि गैरसमजुतीने घेरलेले. त्यात दिवाळीच्या दरम्यान घुबड पकडून त्याचा बळी देण्याची प्रथा. ती मंगलमय वातावरणाचे औचित्य भंग करणारीसुद्धा आहे. घुबड एक विस्मयतेचे वलय असणारा पक्षी. मुख्यतः निशाचर असणारा, कडेकपारी, सोडलेल्या इमारती, वस्तीपासून विलग असणारे परिसर अशा ठिकाणी मुख्यतः वास्तव्य करत असल्यामुळे अनेक गैरसमजुती या पक्ष्यांबाबत लोकांच्या मनात घर करून आहेत. खरंतर काळे जादू करणारे भोंदू मांत्रिक, वैदू आणि इतर औषधी व्यवसाय करणारे मांत्रिक घुबडाला वर्षभर पकडून त्याचे अवयव, पिसे, हाडे यांचा वापर करतात. यामुळे अलीकडच्या काळात वर्षभर त्याची शिकार होते. दिवाळीच्या काळात ही शिकार सर्वाधिक असते, असे वन्यजीवप्रेमींचे मत आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लक्ष्मी घरात टिकून राहावी यासाठी घुबड बळी दिले जाते. उत्तर भारतामध्ये तर ही प्रथा अगदी खेडोपाड्यात पोचलेली आढळून येते.

कोकणातसुद्धा घुबडाविषयी अनेक समजुती आहेत. घुबडाचा घुत्कार ऐकला की मृत्यू येतो, अशा गैरसमजुतींतून दगड मारून हाकलले जात असल्याचे लहानपणी खूप वेळा पाहिले आहे तसेच घुबडाला दगड मारले की ते तो चोचीत पकडून घेऊन जातो आणि नदीवर नेऊन घासतो. जसे दगड झिजतात तसा माणूसही झिजून मरतो वगैरे. स्मशानात शांतता असल्यामुळे असणारे वास्तव्य यांना काळ्या जादूशी जोडते. शुभ-अशुभच्या संकल्पना आणि चालीरितींमध्ये घुबड दिसणे हे अपशकून मानले गेले असल्यामुळे त्याच्या वाट्याला सततची अवहेलनाच येते.

भारतात ३० प्रजातींची घुबडं

भारतात जवळजवळ ३० प्रजातींची घुबडं आढळतात. निशाचर असल्यामुळे अत्यंत तीक्ष्ण नजर, तीक्ष्ण ऐकण्याची क्षमता, उडताना आवाजसुद्धा येणार नाही असे पंख, नखे आणि चोच हे यांना घातक आणि यशस्वी शिकारी बनवतात. छोटे पिंगळे ते ईगल आऊल अशा विविध आकारात घुबडं आहेत. गव्हाणी घुबड, ठिपकेवाला पिंगळा तर अनेक शहरी भागातसुद्धा सहज दिसून येतो तर फिश आऊल देवराया नदीकाठच्या परिसरात दिसतात.

घुबड ही संरक्षित प्रजाती

घुबड ही संरक्षित प्रजाती आहे. अनेक वर्ष दुर्मिळ असलेला आणि नष्टप्राय मानण्यात आलेला वन पिंगळा अलिकडच्या काळात पुन्हा दिसून आला आहे आणि या वन पिंगळ्यास महाराष्ट्राचा राज्य पक्षी बनवावा, अशी चळवळसुद्धा आकाराला येते आहे. दिवाळीत मंगलमयसमयी दिवे लावताना अज्ञानाचा अंधकार दूर होऊन घुबड अंधश्रद्धेचा बळी ठरू नये, हीच प्रार्थना.

इंडियन ईगल आऊल हे सर्वाधिक शिकार आणि तस्करी होणारी प्रजाती असल्याचे पक्षी अभ्यासकांनी नमूद केले तर आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये ब्राऊन फिश आऊल आणि इंडियन स्कोप आऊल यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार इंडियन ईगल आऊल ही प्रजाती सर्वाधिक तस्करी होणारी प्रजाती ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT