रत्नागिरी : राजापुर तालुक्यातील कोदवलीचे ग्रामदैवत श्री शंकरेश्वर मंदिराच्या तटबंदीवर जतन केलेले दोन शिलालेख पेशवे काळातील व इंग्रजांच्या राजवटीतील असून तंटबंदी बांधकाम व मंदिर जीर्णोद्धाराच्या वेळचे आहेत, अशी माहिती पुण्यातील प्रसिद्ध इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी ‘सकाळ’ला दिली.
बंदर निविसी व पत्की या दोन वतनांचा शिलालेखात उल्लेख आहे. बंदर निविसी हा शब्द फारशा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळत नाही तसेच एका शिलालेखामध्ये नक्षत्राचा उल्लेख आहे सांगून शिलालेखांवर प्रकाशझोत टाकताना ते म्हणाले, शंकरेश्वर मंदिराभोवतीच्या तटाला (संरक्षक भिंत) असलेल्या दोन शिलालेखांचा फोटो जयेश विश्वासराव यांनी पाठवले. हे लेख झिजलेले आहेत. पहिला लेख इ. स. १७८८ सालचा सवाई माधवराव पेशवे यांच्या काळातील आहे. राजापूर बंदराच्या बंदर निविसी, पत्की (कर गोळा करणारा) ही वतनं असणाऱ्या ब्रह्मेश्वर गणाजी बोरवणकर यांनी तटबंदी उभारली. शके १७१० किलक संवत्सर, मार्गशीर्ष वद्य द्वितीया सोमवार (म्हणजे १५ डिसेंबर १७८८) अशी तारीख त्यावर आहे.
दुसरा शिलालेख १८४५ मधील म्हणजे इंग्रज राजवटीतील आहे. त्यावर शके १७६६, क्रोधीनाम संवत्सर, माघ शुद्ध दशमी, रविवार (१६ फेब्रवारी १८४५) असे कोरले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार व परिसराचे सुशोभीकरण चिमणाजी हणमाजी बोरवणकर यांनी केल्याचा उल्लेख आहे. सिंहेश्वर बाबा गोसावी यांनी श्री शंकरेश्वर देवालयाची स्थापना केल्याचा उल्लेख त्यात असल्याचे तेंडुलकर म्हणाले.
बंदर निविसी फक्त कोकणात
बंदर निविसी हा वतनाचा प्रकार फक्त कोकणातच आढळतो. निविसी हा फारसी व बंदर हा अरबी भाषेतील शब्द आहेत. याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये फारसा आढळलेला नाही. मोहम्मद आदिलशहाने कुडाळ परगण्याचा हवालदार आका इमाम कुली याला एप्रिल, मे १६४८ मध्ये लिहिलेल्या फर्मानात याचा उल्लेख आढळतो. १९व्या शतकात बांधकाम पूर्ण झाल्याचा व त्या दिवसाच्या मृग नक्षत्राचा ‘मृगशीर्षा’ असा उल्लेख आहे, अशी माहितीही तेंडुलकर यांनी दिली.
ठेवा संरक्षित व्हावा
कोकणातले शिलालेख दुर्लक्षित आहेत. ऊन, वारा पावसात ते झिजले आहेत. असे शिलालेख कोकणात कुठेही असतील तर ते वाचून, अभ्यासून लोकांसमोर मांडले पाहिजेत. ताम्रपट, नाणी ही जशी ऐतिहासिक अभ्यासाची साधने आहेत, तसेच शिलालेख आहेत. ते समकालीन व अस्सल विश्वसनीय पुरावे आहेत. परंतु ते सार्वजनिक ठिकाणी असल्याने दुर्लक्ष होत असून आपण ऐतिहासिक ठेवा गमावतो आहोत. हा ठेवा संरक्षित व्हावा, अशी भूमिका महेश तेंडुलकर यांनी मांडली.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.