गेल्या सहा महिन्यांच्या काळात पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झालाय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पराभूत माजी आमदाराला पालकमंत्री परब यांनी निधी दिला. दापोली नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच माझ्या तालुकाप्रमुखांसह सर्वच पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून येथे राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली. त्यामुळे पालकमंत्री अनिल परब यांच्या त्रासाला कंटाळूनच मी बंड केले, असा खुलासा दापोलीचे बंडखोर आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांत माझे वेळोवेळी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही कदम यांनी केला आहे. (konkan political news)
खेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कदम यांनी बंडामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. यावेळी ते म्हणाले, गेल्या सहा महिन्यांच्या काळात पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून माझे खच्चीकरण करण्याचा वेळोवेळी प्रयत्न झाला. दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला डावलून पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांकडे आणि नेहमीच शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. त्यामुळे गेली सहा महिने माझ्यावर अन्याय झाला आहे.
परंतु मी आजही शिवसैनिकच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे माझे आजही कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. परंतु रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि पक्षप्रमुखांच्या आजूबाजूला असणाऱ्या चौकडीमुळे मला हा निर्णय घेणे भाग पडले, असेही आमदार योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
आमदारांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी वेळ दिला नाही. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या पराभूत उमेदवारांना देण्यात येणारे बळ, त्यामुळे शिवसैनिकांवर होणारा अन्याय या संदर्भात वेळोवेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, स्थानिक नेतृत्व खासदार विनायक राऊत यांच्या कानावर घालूनसुद्धा त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे कदम म्हणाले.
दरम्यान, आगामी निवडणूक मी शिवसेना म्हणूनच लढणार आणि जिंकणार आहे, असा विश्वास आमदार कदम यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांच्यासमवेत खेड तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील शिवसेनेचे पदाधिकारी, खेड पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि खेड नगर पालिकेचे निवडक माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.