चिपळूण (रत्नागिरी) : मुंबईत अडकलेल्या चाकरमान्यांना गावात कसे आणता येईल याची योजना मी मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिषकुमार सिंह व जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना सांगितली. त्यांना माझी योजना पटली आहे. त्यामुळे दोन दिवसात चाकरमान्यांना गावात आणण्याचा निर्णय होईल. अशी माहिती गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली
ते म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्यात कोरोनाचे रूग्ण नाही असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मी तेव्हापासून कोकणातील चाकरमान्यांना गावी जाण्याची परवानगी द्या अशी मागणी करत होतो. आजही त्या मागणीवर मी ठाम असून सातत्याने पाठपुरावा करत आहे. चाकरमान्यांना गावात कसे आणता येईल याचा आराखडा मी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव श्री. सिंग आणि जिल्हाधिकार्यांकडे सादर केला. शिमगोत्सवानिमित्त जिल्ह्यात आलेले लाखाहून अधिक चाकरमानी गावातच अडकले आहेत. यातील काहींना मुंबईत जायचे आहे.
दोन दिवसात चाकरमान्यांना गावात आणण्याचा निर्णय
मुंबईतून गावात येणार्या लोकांना एसटीने ने-आण करता येईल. खासगी वाहतूक आणि रेल्वे पूर्णपणे बंद ठेवावी. सोशल डिस्टन्स ठेवून एका एसटीतून केवळ 30 प्रवासी गावात येतील. मुंबईतून निघताना त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. गावात आल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करावी. गावात दाखल झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरात न पाठवता सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करावी. असे मी सरकारी अधिकार्यांना पटवून सांगितल्यानंतर त्यांनी ते मान्य केले आहे. त्यामुळे दोन दिवसात चाकरमान्यांना गावात आणण्याचा निर्णय होईल. असे आमदार जाधव यांनी सांगितले.
तर मुंबईतील कोरोनाचे रूग्ण कमी होतील
जास्त लोकसंख्या असलेल्या भागात कोरोनाचा धोका अधिक आहे. हातावर पोट असलेले कोकणातील बहूतांशी चाकरमानी झोपडपट्टीत राहतात. ते कोकणात आले तर मुंबईतील लोकसंख्या कमी होईल आणि कोरोनाचा धोकाही कमी होईल. हे मी सरकारी अधिकार्यांना पटवून सांगितल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
चाकरमान्यांना गावातच येऊन मोकळा श्वास घेवूद्या
चाकरमान्यांना गावात आणण्याची मागणी केल्यानंतर माझ्या मागणीला विरोध झाला. नंतर मी संपूर्ण मतदार संघाचा दौरा करून प्रमुख लोकांची बैठक घेतली. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गावात परजिल्ह्यातून भाजीपाला, द्राक्षे, फळ, कांदा, बाटाटा विक्रीसाठी लोक येतात ते आपल्याला चालतात आणि ज्यांच्यावर आपले घर चालते अशा लोकांना गावात येण्यास बंदी घालणे चुकीचे आहे. चाकरमान्यांना गावात आणून होमक्वारंटाईन करताना लागणार्या सुविधा पुरवण्यात गावकरी मंडळी असमर्थ असतील तर मी पुढाकार घेवून त्यांना सर्वप्रकारची सुविधा देईल. पण चाकरमान्यांना गावातच येऊन मोकळा श्वास घेवूद्या अशी विनंती प्रमुख लोकांना केल्यानंतर माझ्या मतदार संघातील सर्व लोक तयार झाल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.