राजापूर (रत्नागिरी) : चपलांनी मारण्याची भाषा करणाऱ्या खासदारांनी माफी मागावी, अन्यथा ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी चपलांनी मारू, अशा आक्रमक शैलीत खासदार विनायक राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाणार रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी डोंगरतिठा येथे प्रकल्प समर्थनार्थ झालेल्या सभेत केला.
तालुक्यातील डोंगरतिठा येथे कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने आज प्रकल्प समर्थनार्थ मेळावा झाला. या वेळी माजी आमदार राजन तेली, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, उल्का विश्वासराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, शिवसेनेचे देवाचेगोठणे विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील राणे, नीलेश पाटणकर यांच्यासह प्रकल्पसमर्थक उपस्थित होते.
नाणारसह अन्य प्रकल्पांची गरज
श्री. जठार म्हणाले, पेपरच्या पोटापाण्याचा प्रश्न म्हणून जाहिराती, मग लोकांच्या पोटापाण्याचे काय. खासदारकी वा आमदारकीच्या माध्यमातून लोकांच्या रोजगारासाठी काय करता येत नसेल तर ती आमदारकी, खासदारकी काय कामाची. भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी काम केले म्हणून खासदार झालात. प्रकल्पांना विरोध करताय ना मग पाहू पुन्हा कसे खासदार होता ते. आमदार राजन साळवींनी नाणारचे समर्थन केल्यास पुन्हा आमदार होतील. अन्यथा त्यांच्या नावामागे माजी कायम राहील. कोकणच्या विकासासाठी नाणारसह अन्य प्रकल्पांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे प्रकल्प होणार. ॲड. शशिकांत सुतार, ॲड. यशवंत कावतकर, व्यापारी संघटनेचे मजीद पन्हळेकर यांनी कोकणच्या विकासासाठी नाणार प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
राजीनामा देऊन जनतेचा कौल घ्या : तेली
माजी आमदार तेली म्हणाले, शिवसैनिक कोणाला घाबरत नाही. त्यामुळे कोणी त्यांना गृहमंत्र्यांमार्फतच्या चौकशीची धमकी देऊ नये. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या खासदार, आमदार यांनी राजीनामा देऊन जनतेचा कौल घ्यावा, मग कळेल समर्थन किती आणि विरोध किती. प्रकल्प होणे गरजेचे असून प्रकल्प समर्थच्या मागणीची मुख्यमंत्री निश्चितच दखल घेतील.
नाणारमधील जागा ठाकरेंच्या नातेवाईकांच्या
नाणार रिफायनरीचा विरोध कायम आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात सांगितले होते. मात्र, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. डोंगरतिठा येथील सभेत ते म्हणाले, की सिंधुदुर्गचे पालकमंत्री येथे सांगून गेले की नाणार येथील जागा कुणी घेतल्या, त्याचा शोध लावण्यासाठी गृह मंत्रालयाला कामाला लावणार आहे. गृह मंत्रालयाची गरज नाही, मी सांगतो कुणी जागा घेतल्या आहेत ते. हिंमत असेल तर पकडून दाखवा त्यांना. ज्यांनी जागा घेतल्या ते ठाकरे बंधूंचे नातेवाईक आहेत. त्यांनीच दीड ते दोन एकर जागा घेतल्या आहेत. हवे असल्यास त्याबाबतचे पुरावे द्यायलाही मी तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.