तारकर्लीलगतच्या समुद्रात आयएनएस ब्रह्मपुत्रा यासह अन्य जहाजे दाखल झाली असल्याचे दिसून आले. ७० मोठी जहाजे येथे दाखल होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
मालवण : पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्ताने तारकर्लीजवळ समुद्रात (Tarkarli Sea) काल (मंगळवार) आयएनएस ब्रह्मपुत्रासह (INS Brahmaputra Ship) अन्य दोन मोठी जहाजे दाखल झाली आहेत. अन्य जहाजेही येत्या दोन दिवसांत येथे दाखल होतील. सायंकाळी लढाऊ विमानांनी आपला सराव सुरू केल्याचे दिसून आले.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने चार डिसेंबरला दुपारी चार ते रात्री आठ यावेळेत मुख्य कार्यक्रमाकडे जाणाऱ्या मार्गावर अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त अन्य व्यक्तींनी ये-जा न करण्याचे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाट यांनी केले.
नौदल दिनानिमित्त नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगायची आहे, याबाबत पोलिस खात्यातर्फे सायंकाळी वायरी भूतनाथ ग्रामपंचायत येथे बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी, घनश्याम आढाव, निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यासह सरपंच भगवान लुडबे, प्राची माणगावकर, संजय लुडबे, भाई मांजरेकर, संतोष लुडबे, देवानंद लुडबे, ममता तळगावकर, पांडुरंग मायनाक, मुन्ना झाड, उदय तळगावकर, मिलिंद झाड, भूषण साटम यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम तारकर्ली एमटीडीसी येथील समुद्रकिनारी होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान, मुख्यमंत्री, नौदलचे वरिष्ठ अधिकारी, अन्य वरिष्ठ व्यक्ती यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देऊळवाडा ते तारकर्ली तसेच शहरातील तारकर्ली नाका ते तारकर्ली या मुख्य मार्गावर सोमवारी (ता. ४) दुपारी चार ते रात्री आठ यावेळेत नागरिकांनी ये-जा करू नये. या काळात अत्यावश्यक सेवेच्या दुकानाव्यतिरिक्त अन्य कोणतीही दुकाने उघडी ठेवू नयेत. नागरिकांनी आपल्या कुंपणाच्या ठिकाणी येऊ नये, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
नौदल दिनाच्या निमित्ताने सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी २ व ३ डिसेंबर या दोन दिवशी तारकर्ली मुख्य मार्गावर पोलिसांतर्फे रंगीत तालीम घेतली जाणार आहे, अशी माहिती शिरसाट यांनी दिली. एखाद्यास गंभीर रुग्णास अधिक उपचारासाठी हलवायचे असल्यास त्यांना योग्य तपासणी करून आवश्यक ते सहकार्य केले जाणार आहे, असेही शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, तारकर्लीलगतच्या समुद्रात आयएनएस ब्रह्मपुत्रा यासह अन्य जहाजे दाखल झाली असल्याचे दिसून आले. ७० मोठी जहाजे येथे दाखल होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार ही जहाजे दाखल होण्यास सुरुवात झाली आहेत. अन्य जहाजे येत्या दोन दिवसांत दाखल होतील. नौदल विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी तारकर्ली येथे दाखल झाले असून त्यांच्याकडून अंतिम आढावा घेतला जात आहे.
नौदलचे जवानही मोठ्या संख्येने दाखल झाले असून, त्यांच्याकडून रंगीत तालीम, कवायती केल्या जात आहेत. सायंकाळी लढाऊ विमानांनी आपल्या सरावास सुरुवात केली आहे. अधिकारी, जवानांमुळे सध्या तारकर्ली परिसरात दाखल किनारपट्टी भागात गजबज वाढली आहे. आजपासून जलक्रीडा व किल्ले प्रवासी वाहतूक सेवा बंद केली आहे. ती येत्या ६ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे.
चिपी विमानतळ मार्ग ते तारकर्ली या सर्व ठिकाणी सुमारे २० ते २५ सर्पमित्रांचीही नियुक्ती केली जाणार आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षित सर्पमित्रांनी पोलिस ठाण्यात छायाचित्रासह नावे द्यावीत, असे आवाहन कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू संस्थेला यावेळी करण्यात आले.
नौदल दिनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांना समुद्रमार्गे हॉटेल विसावा येथपर्यंत जाता येणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर २० हजार माणसे बसू शकतील, अशी व्यवस्था यासह जेवण, पाण्याची, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्य मार्ग वगळता नागरिक अंतर्गत मार्गाचा ये-जा करण्यासाठी वापर करू शकतील, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी रत्नागिरी, कोल्हापूर यासह अन्य जिल्ह्यातून खास पथके मागविण्यात आलेली आहेत. याशिवाय अन्य पाळीव जनावरे यात गायी, म्हैस, कोंबडी, मांजरे बांधून ठेवावीत. मुख्य रस्त्यावर कोणतीही जनावरे येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही शिरसाट यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.