कुडाळ : उत्सवातील देखणेपणा व परंपरेची जपणूक यांचा सुरेख संगम म्हणजे नेरुर देऊळवाडा गाव. वर्षभर कोणत्या ना कोणत्या वाडीवर कार्यक्रम हे सुरुच असतात. त्यामुळे या गावाला उत्सव गाव म्हणूनसुद्धा ओळखले जाते. ग्रामदेवता श्रीदेव कलेश्वर मंदिरात साजरा होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवानंतर दसरा सणसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि त्यानंतर क्रमांक लागतो तो शिमगोत्सवाचा. नेरूर येथील ‘शिमगोत्सव’ हा आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा उत्सव साजरा करण्यात येतो.
या सोहळ्यात नेरूर सुतारवाडीत घराघरांतून पुराणातील कथानकांवर आधारित वेगवेगळे हलते देखावे अवाढव्य स्वरूपात तयार केले जातात. त्या देखाव्यातील एकेक कथानक तिथल्या मांडावर उत्तर रात्रीपर्यंत सादर केले जाते. उपस्थितांना नुसत्या देखाव्यावरून त्या मागच्या कथानकाची कल्पना येत नसल्यामुळे ते ध्वनिक्षेपकावरून सविस्तरपणे सांगितलेही जाते. हा कार्यक्रम होळीच्या तिसऱ्या दिवशी साजरा होतो. शनिवारी (ता १९) हा उत्सव होणार आहे.
जिल्ह्यातील लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या गावात नेरूर अग्रस्थानी आहे. ३२ वाड्यांचा गाव म्हणून नावारूपास आलेला हा गांव काही कारणाने तीन वाड्याचे विभाजन करून २९ वाड्यांचा करण्यात आला. तरीही अजूनही पूर्ण गांव धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी एकसंघ अनुभवायला मिळतो. ही त्या श्रीदेव कलेश्वर व श्रीदेव गावडोबाचीच कृपा असे ग्रामस्थ मानतात. नेरूर मधील शिमगोत्सव अशाच काही प्रथा परंपरेने लक्ष वेधुन घेत आहे. गावडे बांधवांचा गोडा रोबांट मांड उत्सवही खास आकर्षण. नेरूर गावचे ग्रामदैवत हे मुळातच ‘कलेश्वर’ म्हणून ओळखले जाते. श्रीदेव कलेश्वराच्या चरणी नतमस्तक होत प्रत्येक जण नोकरी, व्यवसाय, कुटूंब प्रपंच सांभाळत एखादी कला अंगिकारतांना दिसून येतो. याच गावाने दशावतार कलेतील रत्ने जगाला दिलीत.
त्यामध्ये (कै) बाबी कलीगण आणि त्यांचे सुपुत्र लोकराजा( कै) सुधीर कलीगण यांचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. होळीच्या दिवशी नेरूरमधील गावडे बांधवांच्या पाच वाडीतील सर्व गावडे बांधव मूळ घर नेरूर माडयाचीवाडी खालची येथे एकत्र येतात. त्यात गावडे यांचे मानाचे हे देवस्थान असून या घराला ‘मांड’ असे संबोधले जाते. हाच ‘मांडा’चा अधिकारी श्री कलेश्वराला येतो त्या सोहळ्यालाच गावडे समाजाचे गोड रोबांट म्हटले जाते.
देवाच्या नावाने तळी तयार केली जाते. ज्यामध्ये तांदूळ नारळ, हळद कुंकू , अबिर, निरंजन यांचा समावेश असतो. दुपारी सर्व गावडे बांधव मांडावर एकत्र होवून व तळी देवासमोर ठेऊन मांडाच्या अधिका-यास व होळख्यास गाऱ्हाणे करून ढोल ताशांच्या गजरात रोबटास दुपारी ४ च्या सुमारास सुरुवात होते. रोंबटात घोडेस्वार शंकासुर, मारूती, राक्षस , गरूड, भुत, वाघ सिंह अशी बरीच सोंगे समाविष्ट झाल्यावर हजारोच्या जनसमुदायाने रोबांट निघण्यास प्रारंभ होतो. वाद्याचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, अबीर गुलाल यांची उधळण व विविध सोंगाचा नाच बघण्यासाठी लोकांची झुंबड उडते.
वाजत गाजत रोंबाट श्री देव कलेश्वर मंदिरात आल्यावर देवासमोर तळी ठेवली जाते. तेव्हा मंदिरातील पुजारी तळीस धुपारत दाखवून तळीत नारळ ठेवतात व गाऱ्हाणे घातले जाते. गावडे बांधवाचे आदरातिथ्य म्हणून गुळ पाणी दिले जाते. परतीच्या प्रवासात रोबांट बाराच्या चव्हाट्यावर आल्यानंतर तेथे गाऱ्हाणी ला सुरुवात होते. जुने नवस फेडले जातात नवीन नवस याबाबत गाऱ्हाणी देण्याचा कार्यक्रम सुमारे दोन तास चालतो. नवसाला पावणारे रोबांट अशीही याची ख्याती आहे. त्याच वेळी सर्वाना प्रसाद म्हणून गुळ, साखर, पेढे केळी दिली जातात.
सर्व सेवक वर्गाला पोस्त दिले जाते व रोंबाट सायचे टेब येथे पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ होते. सायचे टेंब येथे आल्यानंतर रोंबाटचे स्वागत केले जाते व त्याठिकाणी गाऱ्हाणी घालण्याचा कार्यक्रम सुरू होतो. त्यानंतर सुरु होतो या संपूर्ण कार्यक्रमातील खास आकर्षण म्हणजे मांड उत्सव. या कार्यक्रमामुळे नेरूर गावची एक वेगळी ओळख सर्वत्र होत आहे. याच सायचे टेंब येथील मेस्त्री मडवळ यांची कुटुंबे गेली कित्येक वर्षे एकमेकांच्या आनंदाने वस्ती करून आहेत. त्यांच्यातील पाच ग्रुप आध्यात्मिक व पौराणिक कथावर आधारित बनविलेले देखावे भजनाच्या साथीने सादर करतात.
वेगळेपण जपण्याचा प्रयत्न
या मांड उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देखावे सादर करणारे आहेत. ते यावर्षी आपण काय सादर करणार याची पुसटशी कल्पनही देत नाहीत. प्रत्येकजण देखाव्यातील वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करीत असतो. या उत्सवाला दिवसेंदिवस वाढणारी गर्दी ही देखावे सादर करणाऱ्याच्या कलेस प्रोत्साहन देते. जागेची कमतरता असताना पुन्हा हजारो लोक स्वयंशिस्त पाळून शांततेत कार्यक्रम पार पाडतात. हा कार्यक्रम साधारणपणे रात्री दहाला सुरू होतो व एक पर्यंत चालतो. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर शिरसोसवाडी येथे एका ठिकाणी रोंबाट थोडावेळ थांबून सर्व पाहुण्यांना प्रसाद म्हणून श्रीफळ दिले जाते.
सर्व मानकरी सेवकवर्ग अधिकारी व गावडे बांधवांव्यतिरिक्त ज्या वाड्या आहेत त्यांना गावडे बांधवांच्या वतीने श्रीफळ देऊन आदरातिथ्य केले जाते. नंतर रोंबाटला ज्या मांडावरून प्रारंभ झाला तेथेच सांगता होते. रोंबटाचे खास वैशिट्य म्हणजे प्रारंभापासून सांगता होईपर्यंत तळीतील निरांजनाची ज्योत अखंड पेटत राहते.
- प्रसाद पोईपकर, माजी सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.