रत्नागिरी : निळसर प्रकाशात चमकणाऱ्या समुद्र किनाऱ्यावरील आकर्षक लाटांच्या देखण्या सौंदर्यामागे निसर्गाने पर्यावरण ऱ्हासाची धोक्याची घंटा दिली आहे. प्रदूषण, ऑक्सिजन कमी होणे आणि कार्बनडाय ऑक्सईडची वाढ, वातावरणीय बदल आणि ग्लोबल वार्मिंग या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजेच निळसर प्रकाश देणाऱ्या प्लवंगांची (नॉकटील्युका) होणारी वाढ. ती किनाऱ्यावरील अन्नसाखळी ब्रेक करत असल्याचा धोका संशोधकांनी व्यक्त केला आहे.
रत्नागिरीसह सिंधुुदुर्ग किनारी रात्री दिसणाऱ्या निळ्या लाटा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. त्या निळ्या प्रकाशामागेही निसर्गाने धोक्याचा इशारा दिला आहे. याला ज्येष्ठ सागरी
जीव अभ्यासक प्रा. स्वप्नजा मोहिते यांनी दुजोरा दिला. २०१७ साली सचिन देसाई यांनी प्रथम या लाटांची माहिती पुढे आणली. त्यानंतर प्रा. मोहिते यांनी त्या प्लवंगांवर अभ्यास सुरू केला. त्याची माहिती घेतल्यानंतर हे प्लवंग पर्यावरणाला किती धोक्याचे ठरू शकतात यावर प्रकाश टाकला.
नॉकटील्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. डोळ्यांनी दिसू शकणारा हा सूक्ष्मजीव शरीरातून काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करतो. उसळणाऱ्या लाटांमुळे ते प्राणी उद्दीपित होतात आणि निळसर प्रकाशाने चमकू लागतात. नॉकटील्युका सिंटीलांस या शास्त्रीय नावाने त्याची ओळख असून, हा प्राणी सध्या समुद्रात दिसणाऱ्या निऑन लाईट्ससारख्या हिरव्या निळ्या प्रकाशामुळे चर्चेत आहे. त्याला सी स्पार्कल म्हणूनही ओळखले जाते.
जलचरांची सूक्ष्म पिल्ले, अंडी यावर उपजीविका करणारा हा प्राणी, म्हणूनच अन्न उपलब्ध नसेल तरीही जगू शकतो. त्यात मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या अमोनियामुळे जेलीफिश सोडल्यास इतर कोणी त्याला खात नाहीत. किनाऱ्याकडे सूक्ष्म खाद्याची उपलब्धता आणि वातावरण असल्याने नॉकटील्युकाचे थवे किनाऱ्याकडे सरकतात. या ब्लूम्समुळे समुद्रातील डायटम्सच्या प्रमाणात मात्र लक्षणीय घट झाली आहे. डायटम्स ही वनस्पती प्लवंग समुद्रातील प्राथमिक उत्पादक आहेत आणि समुद्रातील जैव साखळी ही या प्लवंगावर अवलंबून असते. तीच जैव साखळी या निळ्या प्लवंगामुळे खंडित होण्याची भीती संशोधकांकडून व्यक्त केली जात आहे.
नॉकटील्युका कमी ऑक्सिजनवर जगतात
नॉकटील्युका हा कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणातही राहू शकतो. त्याच्या शरीरातील शैवाल पेशी कार्बन डाय ऑक्साईडच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती करू शकतात. दुसरे कारण हे अप्रत्यक्षरीत्या नॉकटील्युकाला मदत करते. इतर खाद्य नसतानाही हा प्राणी त्याच्या शरीरातील शेवाळाच्या पेशींच्या मदतीने वर्षभरही जगू शकतो. समशीतोष्ण कटिबंधातील समुद्रात ह्या ब्लूम्स आढळत आहेत. याचा संबंध समुद्रातील अन्न साखळीशी आहे. त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.
संपादन- अर्चना बनगे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.