चिपळूण : तालुक्यातील पिंपळी गजमल येथील एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. डांबर सप्लायर्स व सरकारी ठेकेदार मारुती चव्हाण यांच्या कुटुंबीयांवर ही दुर्दैवी वेळ आली. या दुर्घटनेत आई-वडील, मुलगा पद्ममन व स्वतः मारुती चव्हाण यांचेही निधन झाले. कोरोनामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
मूळचे कर्नाटक अथणी येथील बाळू चव्हाण आपल्या कुटुंबीयांसमवेत उदरनिर्वाहानिमित्त कोकणात खेड येथे आले. या ठिकाणी छोटी छोटी कामे करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत असताना मुलगा मारुती याला सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण दिले. यानंतर मारुती यांनी मागे वळून पाहिले नाही. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यास सुरवात केली. शासकीय कामे करीत असताना त्यांनी या व्यवसायात जम बसवला. यानंतर ते चिपळुणात पिंपळी येथे अधिक जम बसविण्यासाठी आले. पिंपळी येथे स्वतःचे घर बांधले.
चिपळुणात शासकीय कामे करताना डांबर पुरवठ्याचा व्यवसाय सुरू केला. या दोन्ही व्यवसायात मारुती चव्हाण यांनी जम बसवून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. मात्र, मारुती चव्हाण कुटुंबीयांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाने घेरले. प्रथम मारुती चव्हाण यांचे वडील बाळू यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची आई नंतर स्वतः मारुती चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली. या तिघांवर काही दिवस लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, या तिघांच्या प्रकृतीत तितकीशी सुधारणा झाली नाही. काही दिवसांच्या अंतराने तिघांचे निधन झाले. एकंदरीत चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.
आता मागे पत्नी व एक मुलगाच
दरम्यान, मारुती चव्हाण यांचा मुलगा पद्ममन हाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. पद्ममनवर मुंबई-ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते; मात्र पद्ममनची शेवटपर्यंत प्रकृती सुधारली नाही. १ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. चव्हाण कुटुंबीयातील चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला. या दुर्घटनेत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आता चव्हाण कुटुंबीयांमध्ये मारुती चव्हाण यांची पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.