गुहागर - आरजीपीपीएलच्या बालभारती पब्लिक स्कूलने शुल्कवाढ केल्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. १७ एप्रिलपर्यंत ही वाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पालक संघाने दिला आहे. याबाबतचे पत्र पालक संघाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी बालभारतीचे मुख्याध्यापक सुरचित चटर्जी, आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता व तहसीलदार प्रतिभा वराळे यांना दिले आहे. आरजीपीपीएल निवासी वसाहतीमधील सीबीएसई बोर्डाच्या बालभारती पब्लिक स्कूलने २०१९-२० नंतर पुन्हा २०२१-२२ मध्ये शुल्कवाढ केली. त्यामुळे प्रि स्कूल आणि प्रि प्रायमरीपासून पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४७ हजार ७०० रुपये, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ४९ हजार ५०० रुपये, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ५१ हजार ६६० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
कोरोनाचे संकट असूनही २०१९-२० मध्ये शाळा व्यवस्थापनाने ७३ टक्के शुल्क वाढवले. आज पुन्हा ८ ते ३३ टक्के वाढवले. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये दोन्ही वेळा पालक प्रतिनिधींनी विरोध केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही वाढ महाराष्ट्र शासनाच्या फी वाढीच्या धोरणाला सुसंगत नाही. त्यामुळे पालकांनी शाळा, कंपनी आणि प्रशासनाला निवेदन दिले आहे. व्यवस्थापन समितीच्या मार्च २०२२ मध्ये झालेल्या सभेतील निर्णयांप्रमाणे कार्यवाही करावी. तोपर्यंत विद्यार्थ्यांना विनाअट पुढील इयत्तेत बसण्यास मान्यता द्यावी. फी वेळत न भरल्यास करण्यात येणारी दंड आकारणी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी. पालकांच्या या मागणीचा योग्य विचार केला जात नाही, तोपर्यंत बालभारती स्कूलने शुल्क भरण्यासंदर्भात दबाव टाकू नये, जबरदस्ती करू नये. शुल्कवाढी संदर्भात १७ एप्रिलपर्यंत समविचाराने योग्य निर्णय न घेतल्यास पालक तीव्र आंदोलन करतील. त्यावेळी निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्र्नाची जबाबदारी आरजीपीपीएल कंपनी व बालभारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य व प्रशासनाची राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामपंचायतींना कर भरावा लागू नये म्हणून आरजीपीपीएल हा शासनाचा उपक्रम असल्याचे आरजीपीपीएल कंपनीद्वारे सांगण्यात येते. मात्र त्याच कंपनीतील शाळेचे शुल्क व धोरण ठरवताना शासकीय नियमांना बगल देवून खासगी शाळांप्रमाणे अंमलबजावणी केली जाते.
- सुनील पवार, पालक संघ अध्यक्ष, बालभारती विद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.