चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्यातील गणेशखिंड येथील रस्त्याच्या जवळील शेतात हत्ती अवतरला आहे. शेतातील या हत्तीला पाहून लोक अचंबित होत आहेत. गेले काही दिवस हत्ती शेतातच ठाण मांडून आहे. पण, थांबा! हा हत्ती खराखुरा नसून भात रोपांच्या सहाय्याने साकारला आहे. कृषी पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेने हा उपक्रम राबविला आहे.
गणेशखिंड येथील रस्त्यालगतच्या शेतात सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्यावतीने हा हत्ती साकारलाय. शेत नांगरून पेरणी करतानाच हत्तीच्या आकारात पेरणी केली. हत्ती रेखाटण्याचे काम चिपळूणचे कलाकार संतोष केतकर यांनी केले आहे. पाचाडचे माजी सरपंच बारकूशेट खोपडे यांनी आपले शेत या कलाकृतीसाठी दिले. भात रुजून वरती आल्यावर इतर भागात तांबडा माठ पेरण्यात आला आहे.
ग्रामीण कृषी पर्यटनाला चालना;
अशा प्रकारची कलाकृती साकारून ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन वाढवावे, यासाठी हा प्रयत्न केला. जगात पॅडी आर्ट प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. तिचा प्रचार, प्रसार व्हावा व पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक स्रोत निर्माण व्हावेत, असा संस्थेचा प्रयत्न आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते राम मोने, भाऊ काटदरे, नितीन नार्वेकर, गजानन सुर्वे, सागर रेडीज, राजेंद्र हुमरे, सोहम घोरपडे, निकेत नार्वेकर यांनी परिश्रम घेतले. ही कलाकृती शेतात उभे राहून पाहिली तर फक्त वाढलेले भात दिसते; परंतु उंचावरून पाहिले तर कलाकृती उत्तम दिसते. यासाठी शेताशेजारी एका झाडावर मचाण
बनविण्यात आले.त्यावरून उत्तम फोटो काढले गेले आहेत.
सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे पॅडी आर्ट..
संस्थेच्यावतीने या वेळी फक्त एकाच रंगाच्या भाताचे चित्र साकारले आहे; परंतु पुढील वर्षी ३ ते ४ रंगांचे भात बियाणे वापरून उत्तम प्रकारचे चित्र साकारले जाईल. या प्रकारची कलाकृती गावात साकारण्याची इच्छा असणाऱ्यांनी सह्याद्री निसर्ग मित्रशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.