मंडणगड (रत्नागिरी) : गेल्या दोन दिवसांच्या अथक मेहनतीनंतर आज ता.७ जुलै रोजी दुपारनंतर पणदेरी धरणाची गळती रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. पाटबंधारे विभागाच्या विविध पथकांनी याठिकाणी दिवसरात्र काम करून गळती थांबवली. तसेच धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी मुख्य कालवा व सांडव्यातून पाणी सोडण्यात आल्याने धरणावरील धोका तूर्तास टळला असून प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. धरणातून विसर्ग होणारे सांडवा व कालव्याचा मुख्य दरवाजा खुलाच ठेवण्यात येणार असून धरण पूर्णपणे रिकामे करण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या वतीने सकाळी विसर्ग सांडव्याला सुरुंग लावून फोडण्याचे काम करण्यात आले. यावेळी पाण्याचा विसर्ग अधिक प्रमाणात होताना कोणतीही जीवितहानी होऊ नये या करिता पणदेरी, बहिरीवली, कोंडगाव या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, शेतीची कामे करण्यास जावू नये अशा सूचना देत बाजारपेठ बंद केली होती. धरण परिसरात सर्वसामान्य नागरिकांना बंदी केल्याने प्रशासनाला गळतीचे कामकाज करण्यास गती मिळाली. पावसाची कृपादृष्टी राहिल्यास पुढील आठ दिवसांत गळतीच्या ठिकाणी पिचिंगचे काम पूर्ण करता येणार असल्याची माहिती उपअभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिली. काल ता.६ जुलै रोजी सायंकाळी उशीरा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
आज सकाळपासून आमदार योगेश कदम व जिल्हाधिकारी मिश्रा हे पणदेरी धरणावर हजर होते. पणदेरी धरणाला लागलेली गळती बंद करण्यात प्रशासनाला दोन दिवसांच्या अथक प्रयत्ननंतर यश आले आहे. दरम्यानच्या काळात पाण्याचा विसर्ग करण्यासाठी सांडव्याची भिंत ५ मीटर रुंद व दीड मीटर उंची फोडण्यात आली. त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने मुख्य भिंतीला लागलेली गळती बुजवण्याच्या कामाला वेग आला. तसेच मुख्य भिंतीवर येणारा पाण्याचा दाब कमी होण्यास मदत झाली. या सर्व घडामोडी चालू असताना गळती लागलेल्या ठिकाणी सिमेंटच्या रिकाम्या पोत्यातून माती भरून त्या गोण्या गळती ठिकाणी भरण्यात आल्या. आतापर्यंत सुमारे ७० ते ८० ट्रक मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य भिंतीला लागलेली गळती थांबल्याचे चित्र दिसून आले. यानंतर कोल्हापूर येथून आलेल्या मॅकेनिकल विभागाच्या पथकाने कालव्याची पाहणी करून कालव्याद्वारे पाणी सोडण्यास टेक्निकल बाबींची पडताळणी करून कालव्याचा दरवाजा पहिल्या टप्प्यात काही अंशी उघडण्यात आला.
कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा स्वच्छ रंगाचा प्रवाह पाहून सुटकेचा निश्वास सोडला. दरवाजा उघडताना गळतीमुळे धरणाच्या भिंतीला धोका उद्भवणार नाही याची निरीक्षणाने खात्री झाल्याने दुपारनंतर हा दरवाजा ७५ टक्के खुला करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी धरणातून पाण्याचा २ क्यूब परसेकंद प्रवाहाने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा जलदगतीने कमी होत असल्याने धरणाच्या मुख्य भिंतीतील गळती थांबून धोका कमी झाला आहे. गळतीवेळी कालव्याच्या लगतच्या बाजूने भिंतीमधून झीरपुन ०.२ क्यूब.मी.परसेकंद पाणी बाहेर पडत होते. ते पूर्णपणे बंद झाले असून आता कालव्यातूनच पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्यस्थीतीत धरणातील जलाशयात ४ दशलक्ष घनमीटर पाणी होते. त्यातील सुमारे १ दशलक्ष घनमीटर पाणी कमी झाले असून पाऊस न झाल्यास पुढील पंधरा दिवसांत संपूर्ण धरणातील पाणीसाठा रिकामा होणार आहे. त्यामुळे गळतीमुळे धरण फुटीचा उद्भवलेला धोका सध्या टाळला आहे.
प्रशासनाच्या अथक प्रयत्नाला यश
दोन दिवस सातत्याने प्रयत्न करीत असलेल्या पाट बंधारे रत्नागिरी विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता सुजित पाटील, उपअभियंता गोविंद श्रीमंगले, स्थापत्य अभियंता बळवंत पवार, पुणे येथील ५ बटालियन एनडिआरएफचे सुदुंबर पुणे येथून सारंग कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ जवानांचे पथक, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, मंडणगड पोलीस निरीक्षक संजय आंब्रे, बाणकोट पोलीस निरीक्षक उत्तम पीठे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वराळे, पोलीस ठाण्याची संपूर्ण टीमसह उपस्थित राहून मेहनत घेत होती.
काल विस्थापित केलेल्या नागरिकांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेमध्ये सोयीसुविधांच्या अभावामुळे हे नागरिक आज पणदेरी बौद्धवाडी येथे सुरक्षित असलेल्या दोन घरामध्ये हलविण्यात आले आहेत. काल संपूर्ण दिवस प्रशासनाच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यावरून ग्रामस्थांच्या तक्रारी निर्माण झाल्याने आज प्रशासनाने विस्थापित ग्रामस्थांना त्यांच्या म्हणण्यानुसार रेशन व गॅस शेगडी देवून जेवणाचे साहित्य दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.