Problems of Ganesh sculptors konkan sindhudurg 
कोकण

गोव्याचे दरवाजे बंद, गणेश मूर्तीकारांवर गंभीर संकट

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून लॉकडाउन जाहीर झाले. गणेश चतुर्थीसाठी मूर्ती बनविण्याच्या काळाच्या तोंडावरच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने याचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील मूर्तींच्या मातीकामाला बसला. वाहतूक भाडे आणि मातीचे वाढलेले दर यामुळे मूर्तिकारांचे आर्थिक गणित कोलमडले. गोव्याचे दरवाजे बंद झाल्याने यंदा मूर्तीसाठी लागणाऱ्या जिल्ह्यातील मातीवरच समाधान मानावे लागले. 

सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्य अनेक आर्थिक बाबींसाठी एकमेकांवर अवलंबून असलेला भाग आहे. तळकोकणातील आणि गोव्यातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. पूर्वी गोव्यातील माती मूर्तीसाठी दर्जेदार समजली जात असल्याने अनेक मूर्तिकार, विशेषतः मध्यम व मोठ्या मूर्तिशाळांतील मूर्तिकार गोव्यात मिळणाऱ्या मातीतूनच मूर्ती घडवत असत. यामध्ये मांजरा, थिवी, वारखंड या ठिकाणांहून मूर्तिकामासाठी वाहतुकीने माती आणली जात असे. मूर्तिकाराला एक डंपर मातीमागे वाहतूक खर्चासह 13 ते 15 हजार रुपये मोजावे लागायचे; मात्र अलीकडे दीड ते दोन हजार रुपये अधिक मोजावे लागत आहेत. 

जिल्ह्यातील मूर्तिकार साठ ते सत्तर टक्के मूर्तिकामासाठी लागणारी माती गोव्यातून आयात करायचे तर 30 टक्के स्थानिक म्हणजे जिल्ह्यातून माती उपलब्ध करून घ्यायचे. जिल्ह्यात गोळवण-मालवण, पाडलोस-सावंतवाडी, दाभोली-वेंगुर्ले, सोनवडे-कुडाळ आदी भागामध्ये मूर्तिकामासाठी माती उपलब्ध होते. गोळवण या ठिकाणी मातीचा भरपूर साठा आहे. यंदा शासनाने लॉकडाउन जाहीर केल्याने मूर्तिकारांची दर्जेदार मातीसाठी परवड झाली.

दोन राज्यांतील व जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः बंद असल्याने मूर्तिकारांना जिल्ह्यातील मातीवर समाधान मानावे लागले. बरेच मूर्तिकार गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या डंपरमधून मातीची वाहतूक करायचे. यामुळे वाहतूक खर्चात बरीच सूट मिळायची; मात्र कोरोनामुळे जिल्ह्यातीलच मातीच्या किमतीत तसेच वाहतूक खर्चात थोडीफार वाढ झाल्याने मूर्तिकारांना दीड ते दोन हजार रुपये जास्त मोजावे लागत आहेत.

चार ते पाच वर्षांपूर्वी गोव्यातून आणण्यात येणाऱ्या मातीचा दर वाहतूक खर्चासह दहा ते अकरा हजार एवढ्या किमतीला मूर्तिशाळेपर्यंत पोच मिळायचा. त्यातच तीन ते साडेतीन हजार रुपये डंपर भाडेकरूला पूर्वी द्यावे लागत असायचे; मात्र आता त्यासाठी चार ते पाच हजार रुपये मोजण्याची वेळ मूर्तिकारांवर आली आहे. 

लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळातच वाहतूकबंदी होती; मात्र ई पासद्वारे वाहतूक सुरू होती. असे असताना लॉकडाउन काळात माती वाहतूक करणाऱ्या अनेक चालकांना समस्यांना सामोरे जावे लागले. ज्या जवळपास एक हजार मूर्ती घडविल्या जातात त्या ठिकाणी पाच ते सहा डंपर, 500 मूर्ती घडविल्या जातात तेथे तीन ते चार डंपर आणि 100 मूर्ती ज्या ठिकाणी घडवल्या जातात त्या ठिकाणी एक डंपर माती उपयोगात आणली जाते. सद्यःस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी गावाकडे पाठ फिरवली आहे. दरवर्षी महिनाभर ते पंधरा दिवस आधीच दाखल झालेले चाकरमानी स्वतःच्या आवडीनिवडीनुसार तसेच मोठ्या आकाराच्या गणपती मूर्ती शाळेत बनवण्यासाठी सांगत; मात्र यंदा चाकरमान्यांच्या उत्साहावर पाणी फिरल्याने मोठ्या आकाराच्या मूर्ती फार कमी संख्येने बनविल्या आहेत. 

मूर्तिकार अडचणीत 
चाकरमान्यांच्या रूपाने मूर्तिकारांना थोडाफार आर्थिक हातभार मिळायचा. जेवढ्या मोठ्या आकाराच्या मूर्ती तेवढी त्याची किंमतही जास्त असते; मात्र यंदा तशी कोणतीही स्थिती दिसून येत नाही. गणेश मूर्ती बनविण्याच्या काळातच लॉकडाउनचा प्रभाव राहिल्याने अनेक मूर्तिकारांना याचा फटका बसणार आहे. वाहतुकीचे आणि मातीचे वाढलेले दर, माती आयातीसाठी गोव्याचे बंद झालेले मार्ग आणि बऱ्याच चाकमान्यांची उत्सवाकडे फिरलेली पाठ, या गोष्टी पाहता मूर्तिकार यात भरडला गेला आहे. 

लॉकडाउनचा यंदा मूर्तिकारांना फटका बसला आहे. यामध्ये मध्यम व लहान मूर्तिकार भरडला गेला आहे. मातीचे दर आणि वाढलेले भाडे यामुळे मूर्तिकारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 
- उदय अळवणी, सिद्धिविनायक चित्रशाळा, सावंतवाडी 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी; भाजप-धजद युतीला धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचे दोन पुत्र पराभूत

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएलचा मेगा लिलाव आज! थोड्याच वेळात सौदी अरेबियात खेळाडूंवर बोली लागणार

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, पण.... अब्दुल सत्तार यांचा खोचक टोला

IND vs AUS 1st Test : विराट कोहलीचे १६ महिन्यांनंतर कसोटीत शतक! भारताचे यजमानांसमोर ५३४ धावांचे तगडे लक्ष्य

Oath Ceremony: महायुतीच्या बैठकांचा धडाका, पुढील रणनिती आखण्यावर चर्चा, शपथविधीबाबत मोठी माहिती समोर!

SCROLL FOR NEXT