महाड : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजही अनेक आदिवासी वाड्यांवर जाण्यासाठी पक्काच काय कच्चा रस्ता नसल्याने या वाड्या दळणवळणाच्या सुविधांपासून कोसे दूर आहेत.
इर्शाळवाडीत बुधवारी रात्री दरड कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. तर अनेकजण अद्याप ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने शोधकार्य सुरू आहे. या ठिकाणी मदतकार्य आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याने बचावकार्यात अडथळे आल्याचे समोर आले.
निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला सुविधांची गरज काय, अशा विचारधारेतूनच या वाड्या विकासापासून वंचित आहेत. दोन वर्षांमध्ये आदिवासी विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी येणाऱ्या कोट्यवधींच्या निधीपैकी केवळ पन्नास टक्के निधीच रायगड जिल्ह्यात वापरला गेला आहे.
बहुतांश आदिवासी वाड्यांमध्ये जाण्यासाठी केवळ पायवाटाचा आहेत. खालापूर तालुक्यातील या दुर्घटनेनंतर आदिवासी वाड्यांवरच काय परंतु अन्य दुर्गम भागातही रस्त्यांची सुविधा किती महत्त्वाची आहे, ही बाब समोर आली आहे.
जिल्ह्यात आदिवासी वाड्यांमध्ये राहणाऱ्यांची संख्या जवळपास तीन लाख ५० हजार इतकी आहे. एकूण लोकसंख्येच्या ११.५८% लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. कर्जत, खालापूर, पेण व सुधागड या तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाची वस्ती जास्त आहे.
अलिबाग तालुक्यात ७९, मुरूड ३६, रोहा १२०, पेण १६४, कर्जत १५२, माणगाव ११६, महाड ७२, पोलादपूर २७, म्हसळा २२, श्रीवर्धन ११, तळा १२, पाली-सुधागड ११०, खालापूर ९२, पनवेल ८०, उरण २० अशा आदिवासी वाड्या आहेत.
शहरालगतच्या काही वाड्यांमध्ये रस्त्याची सुविधा उपलब्ध आहे, परंतु डोंगरदऱ्यात राहणाऱ्या चाळीस ते पंचेचाळीस टक्के आदिवासी वाड्यांमध्ये जाण्यासाठी पायवाटेशिवाय पर्याय नाही.
घाटमार्गही धोकादायक
मुंबई-गोवा महामार्ग तसेच अन्य प्रमुख राज्य व राष्ट्रीय मार्गांवर असणारे महत्त्वाचे कशेडी, ताम्हिणी, वरंध - वाघजाई व आंबेनळी घाट वर्षोनुवर्षे पावसाळ्यात धोकादायक ठरत आहेत.
पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या दरडी व भूस्खलनामुळे दक्षिण रायगडला अन्य जिल्ह्याने जोडणाऱ्या मुख्य चार घाटातील प्रवास वाहनचालकांसह नागरिकांसाठी धोक्याचा झाला अाहे. आंबेनळी घाटात बुधवारी दरड कोसळली मात्र तत्पूर्वीच हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यता आला आहे.
दरडीला अतिवृष्टी कारणीभूत
पुणे जिल्ह्यातील माळीण, महाडमधील तळीये आणि आजच्या इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीस अतिवृष्टी कारणीभूत ठरत असल्याचे भूवैज्ञानिक तज्ज्ञांचे मत आहे. इर्शाळवाडी ज्या विभागात येते त्या माथेरान परिसरात मागील तीन दिवसात ५२० मिमी इतका विक्रमी पाऊस झाला.
बुधवारी दिवसभर इर्शाळगड परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसाच्या पाण्याने जमीन खचत गेली. यामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळला. दरडीखाली गाडली गेलेली ही तीनही गावे दरडप्रवण गावांच्या यादीत नव्हती.
त्यामुळे तिथे दरडी रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नव्हत्या. दरड कोसळल्यानंतर कोणती खबरदारी घ्यायची याचीही माहिती या तीनही गावातील ग्रामस्थांना नव्हती. त्यामुळे दरड कोसळल्यानंतर गोंधळाचे वातावरण, धावपळीमध्ये सुरक्षित जागा शोधता आली नाही. परिणामी बेसावध नागरिकांना बचावासाठी फारशा हालचाली करता आल्या नाहीत.
दरडप्रवण क्षेत्रात वाढ
1 रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांमध्ये दरवर्षी वाढ होत असून १५ वर्षांत १०३ वरून ही संख्या २११ वर गेली आहे. दरडीमध्ये मृत्यूमुखी होणाऱ्यांची संख्या अन्य नैसर्गिक आपत्तींपेक्षा मोठी आहे.
2 दरडी कोसळून रहदारी विस्कळित होण्याच्या घटनाही सातत्याने घडत असतात. मदतकार्य राबवण्यापेक्षा आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना केल्यास जीवित व वित्त हानी टाळणे शक्य आहे.
3 जिल्हा प्रशासन गांभिर्याने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील दरडींच्या घटना
गावे -मृत्यू
दासगाव- ४८
कोंडीवते -३३
जुई बु. -९४
रोहण -१५
कोतवाल- ९
लोयर चव्हाणवाडी- ३
तळिये -८७
साखर सुतारवाडी- ६
केवनाळे- ५
आदिवासी समाज रोजगारासाठी वणवण भटकणारा आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटत नसल्याने त्यांना आपल्या हक्कासाठी भांडता येत नाही. सरकारने त्यांना मूलभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत. आजच्या दुर्घटनेनंतर प्राधान्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.